महानायक सहस्त्रकाचा, Amitabh Bachchan: The 70-year young ‘B’!

महानायक सहस्त्रकाचा

महानायक सहस्त्रकाचा
www.24taas.com,मुंबई

अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू उलगडले आहेत ‘महानायक सहस्त्रकाचा’, यातून.

डोळ्यात अंगार आणि शब्दात आगीची धग ही अमिताभ यांच्या संवादाची खासीयत. खर्जातला आवाज ही तर बॉलीवूडच्या शहेनशाह लाभलेली ईश्वरदत्त देणगी आहे..त्यांच्या अनेक सिनेमाचे संवाद म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी जणू सुभाषितचं.

अमिताभ कोण आहे? अमिताभ तुम्ही आम्ही सगळेचं म्हणजे अमिताभ. अमिताभ म्हणजे जिद्द , अमिताभ म्हणजे एल्गार. प्रत्येकाच्या मनात धुमसणारा संताप म्हणजे अमिताभ. प्रत्येक तरुणाच्या विचारांचं एक असं रुप आहे, जे कालही होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण त्यासाठी अमिताभ यांना फार मोठा संघर्ष करावा लागलाय. आणि या संघर्षाची सुरुवातही तुमच्या आमच्यासारखीच.

आपल्या पित्याच्या सांगण्याप्रमाणे अमिताभ यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज ते अशा ठिकाणी येवून पोहोचलेत जिथं त्यांची बरोबरी करणं कोणालाच शक्य नाही. आपल्या सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास लिहिला आहे.

बॉलीवूडच्या या शहनशाहचा पहिला प्रवासही शाही होता. अलाहाबादच्या ज्या हॉ़स्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला तेथून त्यांच्या घरी जाण्यासाठी अमिताभचे पिता हरीवंशराय बच्चन यांनी एक टांगा भाड्याने घेतला होता..खरं तर त्या काळात ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे.

हरिवंशराय बच्चन यांनी या नवजात मुलाचं नाव काही तरी वेगळ ठेवण्याचं ठरवलं होतं..त्याप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव इन्कलाब असं ठेवलं..मात्र समित्रानंदन पंत यांना ते नाव काही आव़डलं नाही..त्यामुळे त्यांनी मुलासाठी नवं नाव शोधलं आणि ते नाव होतं अमिताभ.

कधीही लुप्त न होणारा प्रकाश असा त्या नावाचं अर्थ. १९६३ साली अमिताभ बच्चन कलकत्त्यातील एका शिपिंग कंपनीत नोकरी करत होते. त्यावेळी त्यांचा पगार होता महिना २७० रुपये. कोलकत्त्याच्या याच हवडा ब्रीजवरुन रोज घरी जातांना अमिताभला मुंबईची आठवण होतं असे. पण त्यासाठी त्यांना आणखी काही काळ कलकत्त्यात घालवावा लागणार होता.
सिनेमात करिअर करण्याची अमिताभ यांची इच्छा होती..पण त्यासाठी परिस्थिती त्यांच्या बाजूने नव्हती..त्यामुळे अमिताभ यांनी नोकरी बरोबरच नाटकात काम करणंही सुरु ठेवलं होतं. अमिताभ यांनी सिनेमात करिअर करावं असं त्यांचे छोटे बंधू अजिताब यांची इच्छा होती. त्यामुळेच अमिताभ यांनी मुंबईच्या व्हिक्टोरीया मेमोरिअलमध्ये काही फोटो काढले होते. तेच फोटो अजिताब यांनी माधुरी सिने हंट स्पर्धेसाठी पाठवली होती..पण त्यावेळी त्याचा काही फायदा झाला नाही..

महानायक सहस्त्रकाचा

१९६८मध्ये कलकत्यात अमिताभ यांचा पगार वाढून तो १६४० रुपये इतका झाला होता...त्याच सुमारास मनोज कुमार यांच्या एका सिनेमासाठी छोटाशी भूमिका अमिताभ यांना चालून आली होती..मात्र त्या छोट्या भूमिकेसाठी नोकरी सोडणं अमिताभ यांना परवडणारं नव्हतं.

पण पुढे अमिताभ यांनी त्याच वर्षी नोकरीला रामराम केला आणि ते मुंबईत दाखल झाले. फॅमिली फ्रेंड नर्गिस यांनी मोहन देसाई यांच्या एका सिनेमासाठी अमिताभचं नाव सुचवलं होतं.. स्क्रीन टेस्ट झाली खरी पण त्यात अमिताभ यांना रिजेक्ट करण्यातं आलं..अमिताभ यांची पहिली कमाई अभिनयातून नाही तर सिनेमासाठी दिलेल्या आवाजातून झाली होती. मृणाल सेन यांच्या एका सिनेमासाठी अमिताभ यांनी आपला आवाज दिला होता....करिअरच्या सुरुवातीच्या काळात अमिताभ यांनी छोट्यामोठ्या जाहिराती केल्या..त्यासाठी त्याकाळी त्यांना ५० रुपये मानधन मिळत असे..पण अमिताभ यांचं स्वप्न मोठं होतं..त्यामुळेच ते चित्रपट निर्मात्यांकडं चकार मारीत असतं याच दरम्यान एकदा ते राजश्री प्रॉडक्शनचे ताराचंद बडजात्या यांच्याक़डं गेलं होतं..पण तिथंही त्यांचा हिरमोड झाला..असं उत्तर त्यांना मिळालं होतं.

सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही तर पुन्हा घरी न जाता टॅक्सी चालविण्याचा निश्चय अमिताभ यांनी केला होता. पण त्याच वेळी अमिताभ यांच्यासाठी हिंदी सिनेसृष्टीनं दार उघडलं होतं..अजिताब यांनी अमिताभ यांचे जे फोटो टॅलेंट हंटसाठी पाठवले होते त्या फोटोंनी अमिताभसाठी महत्वाची भूमिका बजावली.. ख्वाजा अहमद अब्बास हे आपल्या सिनेमासाठी एका मुस्लीम तरुणाचा शोध घेत होते...शिडशिडीत शरिरयष्टी आणि नवीन चेहरा त्यांना हवा होता..त्यामुळेच त्यांना अमिताभचे फोटो आवडले आणि त्यांनी आपल्या सिनेमासाठी अमिताभची निवड केली...आणि येथून शतकातील महानायकाच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.

अमिताभ यांना सात हिंदूस्तानी सिनेमा मिळाला खरा पण सिनेमाचं शुटिंग रेंगाळलं होतं..त्यामुळे अमिताभ यांना मुंबईत आपलं घर चालवणं कठीण होवून बसलं होतं... इतरांच्या देखी जो धीर खचण्याचा काळ ठरला असता त्या ठिकाणी प्रत्येक अपयश निर्माण करत होतं एक अभिनयाचं खणखणीत नाण.

अभिनेता मेहमूद यांचे लहान बंधू अन्वर अली आणि टिनू आनंद यांनी सुरुवातीच्या काळात अमिताभला साथ दिली. सिनेमात काम मिळविण्यासाठी हे तिघेजण एकत्र फिरत असतं..पण अमिताभ यांची अवस्था पाहून अन्वर अली यांनी आपले बंधू मेहमूद यांच्याशी अमिताभची भेट घालून देण्याचा निर्णय घेतला..त्यावेळी मोहमूद बॉम्ब टू गोवा या सिनेमाची तयारी करीत होते..या सिनेमात अभिनेता जितेंद्र यांना घेण्याची विचार मेहमूद यांनी केला होता..पण जितेंद्र यांनी नकार दिल्यानंतर मेहमूद यांनी अमिताभकडं भूमिकेविषयी विचारणा केली.

महानायक सहस्त्रकाचा

डान्स करता येतो असं मेहमूद यांनी अमिताभला विचारलं होतं..त्यावर आपण थोडा बहूत डान्स करु शकतो असं अमिताभने मेहमूद यांना सांगितलं होतं..त्यानंतर एके दिवशी मेहमूद यांनी अमिताभला ताज हॉटेलच्या डान्सिंग फ्लोअरवर डान्स करण्यास सांगितलं..अमिताभने तिथं डान्स केला आणि त्याच डान्स फ्लोअरवर अमिताभ यांना बॉम्बे टू गोवा हा सिनेमा मिळाला..या सिनेमासाठी अमिताभ यांना आठ हजार रुपये मिळाले होते..तर त्याच सिनेमासाठी जितेंद्र यांनी तब्बल तीन लाख रुपये मागितले होते.

या सिनेमाबरोबरच अमिताभच्या करिअरची गाडी पुढे सरकली..सिनेमातली भूमिका लहान असली तरी करिअरच्या दृष्टीने ती अत्यंत महत्वाची होती..खरं तर या सिनेमामुळे अमिताभ यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला...बॉम्बे टू गोवा या सिनेमानंतर ख्वाजा अहमद अब्बास अमिताभ यांनी ऋशीकेश मुखर्जींकडं घेऊन गेले..त्यांना सात हिंदुस्तानी हा सिनेमा दाखवला आणि त्यानंतर मुखर्जींना त्यांना आनंद सिनेमाची ऑफर दिली.

सुरुवातीच्या काळात सुनिल दत्त यांनीही अमिताभला बरीच मदत केली..मात्र रेश्मा और शेरा सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी अमिताभ सुनिल दत्तवर नाराज झाले. सुनील दत्त यांनी अमिताभला भोलाची भूमिका दिली होती..या सिनेमात अमिताभचा मोठी भूमिका आणि संवाद होते..मात्र सुनिल दत्त यांनी सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल केला..भोला मुका असल्याचं दाखविण्यात आलं त्यामुळे अमिताभ नाराज झाले होते..याविषयी अमिताभ यांनी सुनिल दत्त यांना जाब विचारला होता.

अभिनेता शशी कपून यांनीही अमिताभ यांना अशाच पद्धतीने खडसावलं होतं....सुरुवातीच्या काळात लहान मोठ्या भूमिका करतांना अमिताभ यांना अशा अनुभवातून जावं लागलं होतं. तो पर्यंत अमिताभचा एकही मोठा सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता...त्यामुळे त्यांच्या सगळ्या आशा सात हिंदूस्तानी सिनेमावर टिकून होत्या..जेव्हा तो सिनेमा प्रदर्शीत झाला त्यावेळी अमिताभ जैसलमेर मध्ये रेश्मा और शेराचं शुटिंग सुरु होतं..अमिताभ यांचे आईवडिल सात हिंदुस्तानी पाहण्यासाठी खास सुट्टी काढून दिल्लीला आले होते. दिल्लीतील याच शिला टॉकीजमध्ये अमिताभ आपल्या मातापित्याला घेऊन सात हिंदुस्तानी पाहण्यासाठी गेले होते.

सात हिंदूस्तानीमुळे अमिताभ यांच्यासाठी बॉलिवुडचे दरवाजे किलकिले झाले होते.. पण दारावर लाथ मारुन एण्ट्री मारणा-या एग्री यंग मॅनची एण्ट्री व्हाय़ला अजून वेळ होता.. सात हिंदूस्थानीनंतरची दोन वर्षा अमिताभ यांच्या नावावर फ्लॉप स्टारचा शिक्का कायमच होता..पण पुढे हाच फ्लॅप स्टार सूपरस्टार बनला.

१९७२ ते १९७२ पासून अमिताभचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले.. त्यावेळी अशा परिस्थीतीत काम मिळणंही जिकीरीच बनलं होतं.. याविषय़ी अमिताभ यांनी आपले मित्र अन्वर अलीला यांना सांगितलं. होय. त्याचवेळी अमिताभला गरज होती आधाराची.. आणि निराशा दाटलेल्या परिस्थीतीचा आशेचा किरण बनून आली, त्यावेळची मोठी अभिनेत्री जया भादूरी..

अमिताभ बच्चन आणि जया भादूरीची पहिली भेट झाली पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्युटमध्ये... सात हिदूस्तानीच्या सेटवर ही भेट झाली. जयासोबत अमिताभला पाहून जयाच्या मैत्रिणीनी अमिताभची चेष्टाही केली होती.

महानायक सहस्त्रकाचा

सिनेमाच्या सेटवर जया आणि अमिताभ यांच्यातील दोस्ती अधिकच घट्ट होत गेली. पण या सिनेमात छोट्याशा शुटीगंनंतर अमिताभची सेटवरुन सुट्टी झाली खरी बॉलीवूडच्या गुड्डीने मात्र अमिताभच्या आयुष्यात प्रवेश केला होता..त्यावेळी अमिताभकडे आनंदशिवाय दुसरा कोणतीही मोठ्ठा चित्रपट नव्हता.. जया भादूरीच्या बावर्चीने मात्र बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता.

अमिताभचं नैरा्श्य पाहून जयाने ऋषीकेश मुखर्जी यांना एका भूमिकेसाठी अमिताभचं नाव सूचवले.. अमिताभ आणि जया यादोघांनी त्यावेळी सा-या परिस्थीतीवर तोडगा काढण्यासाठी एक कंपनीही स्थापन केली.. त्या कंपनीचे नाव ठेवण्यात आलं होतं अमिया.. अमिताभ आणि जया या दोघांच्या नावातली अक्षरं एकत्र करुन या कंपनीचं नाव तयार करण्यात आलं होतं.. त्यावेळी ऋषीकेश मुखर्जी किशोर कुमार यांच्या आयुष्यावर अभिमान नावाचा चित्रपट तयार करीत होते.. .. अमिताभ आणि जया भादूरी यांची जोडी असलेला पहिला चित्रपट सेटवर गेला.. हळुहळू बच्चन या नावाला एक वलय निर्माण होवू लागलं होतं....तो पर्यंत सुपरस्टार पदाचा प्रवास सुरु झाला नव्हता..पण ख-या आर्थाने तो प्रवास सुरु झाला तो जंजीर पासून.

१९७३साली अमिताभला जंजीर ही योगायोगानं मिळालं होत.. देवानंद, राजकुमार, धर्मेदं यांनी जंजीरचा रोल नाकारला होता.. तेव्हा सलीम जावेद यांनी प्रकाश मेहरा यांना अमिताभ बच्चन यांचे नाव सूचवले.. जंजीरच्या शुटींगच्या पहिल्या दिवशीच अमिताभमधला सुपरस्टार हेरला होता अभिनेते प्राण यांनी.. अभिनेता प्राण यांनी हा उद्याचा सुपरस्टार आहे अस त्यावेळी दिग्दर्शक मेहरा यांना सांगितले होत.

जंजीर पडद्यावर झळकला आणि नवा सुपरस्टार जन्माला आला.. जंजीरच्या यशानंतर अमिताभ आणि जया सुट्टीसाठी परदेशी जाणार होते.. पण त्यावेळी अमिताभ यांचे वडिल हरीवंशराय बच्चन यांनी या प्रेमीयुगुलाला अगोदर लग्न करण्यास सांगितले..
तीन जून १९७३ ला अमिताभ बच्चन आणि जया भादूरी विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्यात अतिशय मोजकेच पाहूणे उपस्थित होते.. लग्नानंतर अमिताभ आणि जया परदेश दौ-यावर गेले.. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्यासाठी पायघङ्या घालून उभ होते बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोपडा.

अमिताभ यांना यश चोप्रानीं एका सिनेमासाठी करारबद्ध केल..आणि तो चित्रपट होता दिवार.. हीच ती व्यक्तीरेखा ज्यामुळे अमिताभ बनला विजय..आणि विजय बनला एंग्री यंग मॅन. त्यावेळच्या आणिबाणीमुळे समाजातील प्रत्येक तरुणात एक विजय दडला होता.. आणि तोच विजय अमिताभ यांनी आपल्या अभिनयातून साकार केला होता..त्यामुळे सगळ्यांनाच तो भावला. आणि येथून अमिताभ बच्चन यांचा सुपरस्टार पदाकडचा प्रवास सुरु झाला...त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.

अमिताभ यांनी आपल्या आय़ुष्यात अनेक चढ उतार पाहिले...एबीसीएल कंपनी त्यांनी स्थापन केली होती पण पुढे ती कंपनी डबघाईस आली...त्याच दरम्यान ते सिनेमापासून दूर गेले होते.त्यामुळे त्यांच सर्वस्व पणाला लागलं होतं..त्यामुळे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्याशिवाय त्यांच्या समोर दुसरा पर्याय उरला नव्हता..या सगळ्या संकटावर बीग बीने कशा पद्धतीने मात केली त्यावर एक नजर.

अमिताभ यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली....पण यावेळी ७० च्या दशकातील रुपेरी पडद्यावरचा विजय नव्हता. ना अँग्री अँगमॅन होता. अमिताभचं हे वेगळंच रुप होतं. पण त्यांचा अंदाज मात्र नेहमीचाच होता...नव्या इनिंगमध्ये अमिताभ यांनी अनेक भूमिका केल्या. पुढे स्टारडमची लढाई जी पूर्वी मोठ्या पडद्यावर लढली जात होती ती छोटा पडद्या अर्थात टीव्हीवर येवून पोहोचली होती..त्याची दखल घेत बॉलीवू़डच्या शहेनशाहने छोट्यापडद्यावर एन्ट्री घेतली.

मोठा आणि छोटा पडदा यातलं अंतर आता कमी झालं होतं. बॉलीवूडच्या या सिकंदरमुळेच पुढे अनेक बॉली़वूड तारे तारकांना छोट्यापडद्याकडं आपला मोर्चा वळवावा लागला होता...याच दरम्यान अमिताभ यांनी अभिनयात नवनवे प्रयोग केले...वय वाढत असतांनाही त्यांनी ब्लॅक आणि पा सारख्या आव्हानात्मक भूमिका साकरल्या...गेल्या पाच दशकात त्यांची काम करण्याची जिद्द आणि वक्तशीरपणा यात जराही बदल झाला नाही.

आपल्या आईवडिलांकडून मिळालेले संस्कार त्यांनी तंतोतंतपणे आपल्या जीवनात लागू केले. त्यामुळेच नव्या पिढीवरही अमिताभ यांची मोहिनी कायम असून चाहत्यांसाठी आजही ते अँन अँग्रीमॅन आहे. बॉलीवूडच्या या महानायकाचा प्रवास आजही सुरु आहे.

First Published: Thursday, October 11, 2012, 21:08


comments powered by Disqus