Last Updated: Thursday, January 9, 2014, 22:25
www.24taas.com, झी मीडिया, मावळलोकसभा मतदारसंघात की जो निम्मा ग्रामीण आणि निम्मा शहरी असा आहे. २००८ च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ. तो आहे, मावळ लोकसभा मतदारसंघ. २००८ च्या पुनर्रचनेनंतर तयार झालेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ... पुणे आणि रायगड जिल्ह्याचा निम्मा भाग जोडून तो तयार झालाय. पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले कर्जत, उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मिळू्न तयार झालेला हा मतदारसंघ. भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास हा मतदारसंघ मुंबईच्या लगत आहे.
हा भाग विविधतेने नटलाय... पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक तर मावळ भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कर्जत, उरण आणि पनवेल हे कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे विभाग. पिंपरीतलं मोरया गोसावी मंदिर राज्यातल्या गणेश भक्तांच श्रद्धास्थान तर लोणावळ्याजवळची एकवीरा देवी अनेकांचं कुलदैवत. लोकांना आकर्षित करणारी लोणावळा-खंडाळा ही पर्यटनस्थळं, कार्ल्याची प्रसिद्ध लेणी याच मतदारसंघात आहेत. मतदारसंघात ६० टक्के लोकं ग्रामीण भागात राहतात तर उरलेले ४० टक्के निमशहरी आणि शहरी भागात राहतात.
- २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १६ लाख ४ हजार ८८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही ८ लाख ५० हजार ९७२ होती तर ७ लाख ५३ हजार ९१७ महिलांनी मतदान केलं होतं.
- २००९ मध्ये नव्यानंच तयार झालेल्या मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. मतदार संघातल्या जिल्हा परिषदा असोत, वा पंचायत समित्या, राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व याठिकाणी आहे. परंतु इथला खासदार मात्र शिवसेनेचा आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेसला आता हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणायचा आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी तुल्यबळ रंगतदार लढत इथं पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.
मावळचे शिवसेनेचे शिलेदार म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन बाबर. कुठलाही राजकीय वारसा नसताना, केवळ कट्टर शिवसैनिक ही गजानन बाबर यांची ओळख... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासामुळेच राजकारणातील थक्क करणारा प्रवास ते करू शकले. पिंपरी महानगरपालिकेत नगरसेवक, सलग दोनदा विधानसभेत आमदार आणि आता मावळचे खासदार अशी त्यांची आजवरची राजकीय वाटचाल... पिंपरी चिंचवडमधील बहुतांश लोकांना खासदार गजानन बाबर हे नाव परिचित आहे. पालिका विरोधी पक्ष नेता ते खासदार असा प्रवास पिंपरी चिंचवडच्या लोकांनी जवळून पाहिलाय.
1 मार्च 1943 रोजी जन्मलेल्या गजानन बाबर यांनी सुरुवातीची वर्ष अतिशय संघर्षात घालवली. पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या नेतृत्वानं भारावून जात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी केवळ शिवसेनेचा प्रसारच केला नाही, तर नगरसेवक ते विरोधी पक्षनेता अशी भरारीही घेतली.
2009 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ एवढी मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांना २ लाख ८४ हजार २३८ मते मिळाली होती. गजानन बाबर यांनी तब्बल ८० हजार ६१९ मतांनी पानसरेंचा पराभव करत लोकसभा गाठली.
1995 पासून राजकारणात प्रवेश करणा-या खासदार गजानन बाबर यांच्या नावावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. खासदार बाबर यांची एकुण मालमत्ता ही 6 कोटी 78 लाख 31 हजार 434 रूपयांची आहे. यांपैकी 5 कोटी 83 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 95 लाख 31हजार 434 रूपयांची जंगम मालमत्ता बाबर यांच्या नावे आहे.
बाबर यांच्याबाबत मतदारसंघातील जनमत जरी चांगलं असलं तरी त्यांना स्वपक्षीयांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये जोरदार चुरस आहे. खासदार गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे यांच्यात शिवसेनेकडून तिकीट कोणाला दिलं जातं हे पाहणं रंजक असणार आहे. बाबर यांना मात्र पुन्हा एकदा आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळेल असा विश्वास आहे.
मतदारसंघातील समस्यामावळ मतदारसंघाला विविध समस्यांनी ग्रासलंय. खासदार गजानन बाबर यांचा पिंपरी चिंचवडवर प्रभाव असल्यानं हा भाग वगळता मतदारसंघातील अन्य विभाग दुर्लक्षितच राहिले. खासदार बाबर यांनी कोणत्याही स्थानिक समस्येसाठी रस्त्यावर उतरण्याचं धोरण ठेवलं. आणि नेमकी हीच बाब त्यांच्यावर टीकेसाठी कारणीभूत ठरली. गजानन बाबर यांनी स्थानिक प्रश्नांकडे अधिक लक्षं देताना, केंद्रात जे प्रश्न उपस्थित करणं आवश्यक होतं, त्या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता केला जातोय.
मुंबई, लोणावळ्याला जाण्यासाठी जादा ट्रेनची मागणी पिंपरी चिंचवडकर करतायत, पण बाबर यांनी त्याबाबत केंद्र सरकारकडं पाठपुरावा केला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घरं संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोनमध्ये येतात. हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्यानं गजानन बाबर यांनी तो दिल्लीत मांडणं आवश्यक होतं. पण तोही त्यांनी कधी मांडला नाही. हिंजवडीजवळील आयटी पार्कमध्ये स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा यासाठी ठोस पावलं उचलताना बाबर दिसले नाहीत. मावळ पाइपलाइन योजनेला असणा-या शेतक-यांच्या विरोधावर तोडगा शोधून काढण्याचा किंवा सुवर्णमध्य साधण्याचा साधा प्रयत्नही त्यांनी केला नाही, असा आरोप विरोधक त्यांच्यावर करतायत.
रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये तर खासदार बाबर यांच्यावर अधिकच टीका होतेय. बाबर यांनी या भागात रस्ता, रेल्वे, वीज अशा कोणत्याही प्रश्नाला हात घातला नाही. आदिवासी भागात ते फिरकलेच नसल्यानं आदिवासी लोकांच्या जमिनीसंदर्भातला प्रश्न असो, वा इतर गोष्टी, बाबर त्याबाबतीत अनभिज्ञ असल्याची टीका त्यांच्यावर होतेय.
गजानन बाबर हे मावळचे नाही तर केवळ पिंपरी चिंचवडचे खासदार आहेत, अशी उपरोधिक टीका त्यांच्यावर होते. स्वत: बाबर मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. खासदार निधी पूर्णपणे खर्च केल्याचं सांगताना, संसदेत प्रश्न विचारण्यात नंबर वन असल्याचंही ते सांगतात. गजानन बाबर यांच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला हे मान्य करावं लागेल. पण केंद्र सरकारशी निगडीत एकाही प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला नाही. रायगडमध्ये तर ते क्वचितच फिरकले असं जनतेचं मत आहे. त्यामुळं बाबर हे केवळ पिंपरी चिंचवड पुरतेच मर्यादित राहिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
परिस्थिती कठिण2009मध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गजानन बाबर हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र ही किमया बाबर यांना यावेळी साधता येणार की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आपलं वर्चस्व सिद्ध करणार त्याचा आढावा.
मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर खासदार म्हणून निवडून आले ते केवळ जातीच्या राजकारणामुळे. या मतदारसंघात मनसेने उमेदवार न दिल्याने शिवसेनेचे गजानन बाबर विरूद्ध राष्ट्रवादीचे आझम पानसरे अशी सरळ लढत होती. मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहता सरशी राष्ट्रवादीचीच होणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र या ठिकाणी मुद्द्यावर निवडणूक न होता जातीच्या आधारावर लढली गेली. त्यामुळे पक्षातूनच सहकार्य न मिळाल्यामुळे मुस्लिम असणा-या पानसरेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
यावेळी मावळमधून लोकसभेचं तिकिट मिळवण्यासाठी शिवसेनेचे श्रीरंग बारणेही उत्सुक आहेत. त्यामुळे बाबर आणि बारणे यांच्यापैकी सेनेचं तिकीट कुणाला मिळतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. गेल्यावेळी पक्षाने पुढील वेळी लोकसभेचं तिकीट मिळेल असं आश्वासन दिल्याचं बारणे यांच म्हणणं आहे. तर बाबर यांनाही पुन्हा खासदार म्हणून निवडून येऊ असा विश्वास वाटतोय. मात्र यावेळची मावळ लोकसभा निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण मावळ मतदार संघावर वरचष्मा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. तर रायगडमधील उरण, कर्जत आणि पनवेलमध्ये शेकापची बाजू मजबूत आहे. स्थानिक पातळीवर शेतकरी कामगार पक्ष सेनेच्या बाजूने असल्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बरीच मेहनत करावी लागणार आहे.
पिंपरी मध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडमध्ये राष्ट्रवादी समर्थक आमदार लक्ष्मण जगताप तर मावळमध्ये भाजपचे बाळा भेगडे आमदार आहेत. रायगडमधल्या पनवेलमध्ये काँग्रेसचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे आमदार आहेत, उरणमध्ये शेकापचे विवेकानंद पाटील आमदार म्हणून निवडून आलेत. तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे आमदार आहेत.
शिवसेनेमध्ये ही रस्सीखेच असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकिटासाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं नाव आघाडीवर आहे. लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. असं असलं तरी 2009 मध्ये जगताप यांनी आझम पानसरे यांच्या विरोधात काम केलेलं असल्याने, आझम पानसरेही सव्याज परतफेड करण्यास निश्चितच उत्सुक असणार आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना आझम यांनी आपणही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेमधील रस्सीखेच सर्वश्रुत आहेच, पण खासदारांची संख्या वाढवण्यास उत्सूक असणा-या राष्ट्रवादीमध्येही गटबाजी समोर येऊ लागलीय. शरद पवारांचे निकटवर्तीय आझम पानसरे आणि अजितदादा समर्थक लक्ष्मण जगताप यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. यावेळची इथली निवडणूक पक्षापेक्षा उमेदवारांच्या निवडीसाठी अधिक गाजणार यात शंका नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, January 9, 2014, 22:25