24taas.com - babhalgaon to babhalgaon

बाभळगाव ते बाभळगाव,

बाभळगाव ते बाभळगाव,
www.24taas.com,मुंबई

महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये.

केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लाखोंच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यात त्यांच्या बाभळगाव या मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला.. विलासरावांचं गारुड मराठवाड्यावर कशा प्रकारे होतं याची प्रचितीच यानिमित्तानं आली..पंतप्रधान, सोनियांसह दिग्गज नेते विलासरावांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

वेळ - पहाटे 5.30 वा
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं पार्थिव चेन्नईहून लातूरच्या दिशेनं विमानानं रवाना झालं.

वेळ सकाळी 9.00 वा..
लातूर विमानतळावर लाखोंचा जनसमुदाय मराठवाड्याच्या या लाडक्या सुपुत्राच्या अखेरच्या दर्शनसाठी पहाटेपासूनच उपस्थित होता.. दिवसभरात अनेक दिग्गज नेते येणार असल्यानं विमानतळ परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली.

वेळ सकाळी 10 वाजता
विमानतळावरुन फुलांनी सजवलेल्या रथातून विलासरावांच्या पार्थिवाचा त्यांच्या बाभळगाव या मूळ गावी अखेरचा प्रवास सुरु झाला.. यावेळी रस्त्यावर दुतर्फा गर्दी होती.. लातूर शहरावर या लाडक्या नेत्याच्या मृत्यूनं मंगळवारपासूनच शोककळा पसरली होती..त्यामुळं विलासरावांचं पार्थिव बाभळगावला रवाना होताना, रस्त्यांवर असा हजारोंचा जनसुमदाय जमा होता.

वेळ सकाळी 11 वाजता
बाभळगावातील विलासरावांच्या वडिलोपार्जित गढीवर विलासरावांचं पार्थिव आणण्यात आंल.. यावेळी वैशालीताई, अमित, रितेश, धीरज यांच्यासह सा-यांच कुटुंबीयांना शोक अनावर झाला. बाभळगावातली देशमुखांची गढी पोरकी झाल्याचं दु:ख सा-यांच्याच चेह-यावर जाणवत होतं.. बाभळगावातील रहिवाशांनाही अश्रू अनावर झाले.

वेळ सकाळी 12 वाजता.
विलासरावांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बाभळगावच्या दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आलं.. याच दयानंद विद्यालयातून विलासरावांनी शिक्षण घेतलं होतं.. यावेळी विलासरावांच्या अंत्यदर्शनासाठी अक्षरश लाखोंच्या जनसमुदायानं रीघ लावली.. केवळ लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतूनही नागरिकांनी इथं गर्दी केली होती.. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यपाल शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रटिंनीही अंत्यदर्शन घेत, देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं.

वेळ दुपारी 2 वाजता
विलासरावांचं पार्थिव दयानंद महाविद्यालयातून पुन्हा त्यांच्या गढीवर नेण्यात आलं... यावेळी अक्षरश: लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

वेळ दुपारी 4 वाजता
विलासरावांचा अखेरचा प्रवास सुरु झाला.. लाखोंच्या उपस्थितीत बाभळगावातील वडिलोपार्जित आंब्याच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले...यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेदतेमंडळी आणि बॉलीवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते.. जनसमुदायाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.. विलासरावांच्या आठवणी मनात होत्या..आणि मराठवाड्याचा हा उमदा नेता आता पुन्हा दिसणार नाही, हसणार नाही ही खंतही.. आपल्या हिकमतीने आणि लोकशाहीच्या बळावर बाभळगावातून सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदाला गवसणी घालणारे विलासराव अखेर अनंतात विलिन झाले.. बाभळगावातून जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करणा-या विलासरावांची अखेर बाभळगावात अशी लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत झाली.


बाभळगाव ते बाभळगाव,

विलासराव अनंतता विलिन झाले...पण आपल्या कर्तृत्वाची छाप मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर ते कायमचीच सोडून गेलेत..ते एक उत्तम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी होते.


विलासराव देशमुख.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत राजकारणी. फर्डा वक्ता. हजरजवाबी... दिलखुलास व्यक्ती अशी कितीतरी विशेषणं त्यांच्या नावा समोर लावली तर ते वावगं ठरणार नाही..कारण हा नेताच तसा होता....एक बहूआयामी व्यक्ती म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवला होता.

महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच गुंतागुंतीचं राहीलं आहे...पण असं असतांनाही विलासरावांनी आपल्या धोरणी आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर एक चांगला प्रशासक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली...राज्याच्या राजकारणात मोठी स्पर्धा असतांनाही विलासरावांनी दोन टर्म महाराष्ट्राचं मुख्यमंत्री भूषवलं.

खरं तर ज्या काळात त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्विकारलं तो काळ आघाडी सरकारचा होता..१९५ साली विधानसभेची निवडणुक हरल्यानंतर त्यांनी १९९६मध्ये विधानपरिषादेच्या निवडणुकीसाठी मोठा जोर लावला...मदतीसाठी ते तो श्रीवरही गेले होते...पण त्यांना परभाव रोखता आला नाही...बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली..पण पुढे त्यांनी पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करुन १९९९मध्ये काँग्रेसमध्ये कमबॅक केला...आणि ते थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.. विजनवासातून परतलेल्या विलासरावांसाठी ही मोठी संधी होती आणि त्यानी त्या संधीच सोनं केलं..संकट मोचक म्हणून त्यांनी अनेक वेळा भूमिका बजावली...राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे विरोध म्हणून त्यांच्याकडं बघीतलं जात असे...पण असं असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी सरकारची स्थपाण करतांना विलासरावांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली हे विशेष.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही विलासरावांच्या नावाला पाठींबा दिला होता...त्या काळात विलासरावांच्या मुत्सद्दीगिरीचा अनुभव त्यांच्या सहकार्यांना आला...सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्याकड कला होती...तसेच सहकारी पक्षाशी समन्वय साधन्यात त्याचा हतखंडा होता... प्रशासनावरही त्यांचा वचक होता... दुष्काळ असो अतिवृष्टी ... प्रत्येक प्रसंगाला ते खंबीरपणे सामोरे गेले...तिथल्या तिथ निर्णय घेण्याची त्यांच्याच क्षमता होते...त्यामुळेच अनेक प्रसंगात त्यांनी नियम वाकवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम केलं......एक चांगला प्रशासक म्हणून त्यांच्याकडं बघीतलं जातं होतं... मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं...पण त्यानंतर ते जास्त काळ मंत्रीपदापासून दूर राहिले नाही... पुढे त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालं...विलासारावांचा हा राजकीय प्रवास पहाता महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुत्सद्दी नेता म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल..

आपल्या राजकीय जिवनात विलासरावांनी अनेक पदं भूषवली...त्यांचा हा राजकीय़ प्रवास मोठा थक्क करणारा आहे..कारण गावच्या सरपंचापासून ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांनी केलाय.

विलासराव देशमुखांचा राजकीय प्रवास थक्क करणार होता. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत विलासरावांनी पद भूषवलं ....विलासरावांचा जन्म लातूरच्या बाभूळगावात झाला. पुण्यातल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमधून त्यांनी बी.एस्सीचं शिक्षण घेतलं तसेच आय़एलएस लॉ कॉलेजमधून कायद्याच शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीचा काही काळ पुण्यात त्यांनी वकीलीही केली होती...त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

१९७४ साली ते बाभळगावचे सरपंच म्हणून निवडून आले...आणि त्यानंतर ख-या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली..जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समीतीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक अशी स्थानिक पातळीवरची अनेक पदं त्यांनी सांभाळली....१९८०साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले...आणि अवघ्या दोनच वर्षांनी त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकण्यात आली....पुढची १५ वर्ष विलासरावांनी आपल्या राजकीय प्रवासात मागे वळून बघीतलं नाही..पण १९९५मध्ये मात्र त्यांना मोठा राजकीय धक्का बसला.... विधानसभेच्या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं होतं.

तब्बल ३५ हजार मतांनी झालेला पराभव विलासरावांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता....पण पराभवाने खचून न जाता त्यांनी विधानपरिषदेचा मार्ग चोखळण्याचा प्रयत्न केला..त्यासाठी शिवसेनेची मदत घेतली मदत घेतली....पण या बंडखोरांचा त्यांना फायदा झाला नाही...विधानपरिषदेतही त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आधी विधानसभा आणि नंतर विधानपरिषद आशा दोन्ही निवडणुकीत अपयश आल्यानंतर विलासराव काही काळ शांत राहिले...मात्र ते जास्तकाळ स्वस्थ बसणा-यांपैकी नव्हते त्यांनी दिल्लीतील बड्यानेत्यांच्या मध्यस्थीने पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला.

महाराष्ट्राच्या राजकारणातून विलासराव संपले असं त्यांच्या विरोधकांना वाटत असतांनाच फिनिक्स पक्षा प्रमाणे त्यांनी भरारी घेतली आणि...१९९९च्या विधानसभा निवडणूकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर विक्रमी मतांनी निवडून आले....ते केवळ निवडूनच आले असं नाही तर राज्याचे मुख्यमंत्रीही बनले...२००३ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं पण पुढे पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरुन त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं.

२००४च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले...२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता...ताज हॉटेलात पहाणी करण्यासाठी गेले असतांना सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि पुत्र रितेश याला ते सोबत घेऊन गेले होते..त्यामुळे त्यांच्यावर बरीच टिका झाली होती...त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतार व्हाव लागलं होतं.

बाभळगाव ते बाभळगाव,

विलासरावांची दिल्लीतली साडेतीन वर्षांची कारकीर्द त्यांच्या राजकीय जीवनाचा अखेरचा टप्पा ठरला. राज्यात जसे विलासराव रमले, तसे ते दिल्लीत रमले नाहीत. मात्र विलासरावांना दिल्लीची राजकीय हवा ओळखायला फार वेळ लागला नाही.

विलासरावांनी 2008 साली राज्याच्या राजकारणातून एक्झिट घेतली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते दिल्लीतच राहिले. विलासरावांची दिल्लीतली कारकीर्द होती उण्यापु-या साडेतीन वर्षांची. मुंबईवर झालेल्या 26-11 च्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत त्यांना महारष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि 2008 ते 2009 हे वर्षभर ते राजकीय विजनवासात गेले. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती पुन्हा देशाची सत्ता आली आणि विलासरावांना दिल्लीच्या राजकारणात पाचारण करण्यात आलं. विलासरावांना दिल्लीतून आलेलं बोलावणं, हा इतरांबरोबर स्वतः विलासरावांसाठीदेखील आश्चर्याचा धक्का होता.

2009 साली मे महिन्यात केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या दुस-या टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. विलासरावांकडं अवजड उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. या खात्याचं नाव अवजड उद्योग असं असलं, तरी ते अगदीच लाईट खातं असल्याचा विनोद विलासराव नेहमी करायचे. `लाईट अवजड उद्योग खातं` असा उल्लेख त्यांच्याकडून दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी आणि पत्रकारांनी ऐकलेला आहे.

जानेवारी 2001 पर्यंत त्यांनी या खात्याची जबाबदारी सांभाळली. या खात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली असली, तरी या खात्यात त्यांचं मन रमत नव्हतं. त्यानंतर विलासरावांकडं ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. या जबाबदारीवर विलासराव खुष होते. प्रत्यक्ष लोकांना भेटण्याची संधी मिळत असल्यामुळं आणि ग्रामीण विकास हा आवडीचा विषय असल्यामुळं विलासरावांची निराशा या नव्या जबाबदारीमुळं कमी झाली. मात्र हे खातं विलासरावांकडं फार काळ टिकलं नाही.

अवघ्या 7 महिन्यांत त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान या नव्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ग्रामीण विकास खातं अचानक काढून घेतल्यामुळं नाराज झालेल्या विलासरावांनी नाराज मनानंच या नव्या खात्याची जबाबदारी घेतली. मात्र अखेरपर्यंत या खात्यात त्यांचं मन रमलं नाही.

ऑगस्ट 2011 मध्ये अण्णा हजारेंनी पुकारलेलं आंदोलन आणि त्याला देशभरातून मिळालेला पाठिंबा यामुळं सरकारवरचा दबाव वाढत होता. अशावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि अण्णा हजारेंची उपोषणं हाताळण्याचा गाढा अनुभव असलेल्या विलासरावांनाच पाचारण करण्यात आलं होतं. अनेक राजकारण्यांना दिल्लीची हवा समजायला वर्षानुवर्षं लागतात. विलासराव दिल्लीच्या राजकारणात लगेच रुळले. मात्र विलासरावांच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्ण उपयोग करून घेता आला नाही. थोडक्यात, विलासरावांना जितक्या लवकर दिल्ली समजली, तितक्या लवकर दिल्लीला विलासराव समजले नाहीत.

विलासराव देशमुख एक शालीन आणि दिलखुलास नेते होते. राजकारणात त्यांचे विरोधक अनेक होते. मात्र शत्रू एकही नव्हता. त्यामुळंच विलासरावांच्या निधनाच्या बातमीनंतर आपला मित्रच हरपल्याची भावना राजकीय वर्तुळात निर्माण झाली.

राजकारणात विरोधक आणि शत्रू यांत एक पुसटशी सीमारेषा असते आणि ती सीमारेषा न ओलांडण्याचं भान सदैव ठेवावं लागतं, हे तत्व विलासरावांनी आयुष्यभर सांभाळलं. विलासरावांचे विरोधक काँग्रेससह सगळ्याच पक्षात होते. वारंवार त्यांनी विलासरावांना अडणीत पकडण्याचा, त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्नही केला. मात्र या सगळ्याला पुरुन उरलेल्या विलासरावांनी विरोधक दुखावणार नाहीत, याची नेहमीच काळजी घेतली. त्यामुळं विलासरावांचा एकही विरोधक त्यांच्या शत्रू बनला नाही.

विलासरावांच्या निर्णयाला अनेकदा विरोध झाला, मात्र एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर कधीच कुणी हल्ला चढवला नाही. विलासरावांची धोरणं वादाच्या भोव-यात अडकली, मात्र विलासरावांवर कुणीही कधी डूख धरला नाही. आणि त्यामुळंच विलासरावांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर प्रत्येकालाच एक द्रष्टा नेता आणि जवळचा मित्र हरपल्याचं दुःख झालं.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्यासोबत तर विलासरावांची खास मैत्री होती. पुण्यातून लातूरपर्यंत बाईकवरून जाणा-या विलासरावांपासून ते विरोधी पक्षात असूनही मैत्रीचे धागे तुटू न देणा-या गोपीनाथ मुंडेंपर्यंत विलासरावांच्या तमाम मित्रांना त्यांच्या निधनानंतर गहिवर आवरणं कठीण झालं.

राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. विलासरावांचं वर्णन करताना मात्र हे वाक्य थोडंस बदलून घ्यावं लागतं. विलासरावांचा कुणीही शत्रू नव्हता आणि जे मित्र होते ते कायमचे आणि जीवलग होते. त्यामुळं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना `यारों का यार` हरपल्याची खंत कायमच वाटत राहणार, यात शंका नाही.

विलासराव देशमुख हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं...राजकारणापासून ते कला क्षेत्रापर्यंत त्य़ांचा वावर होता....त्य़ामुळेच कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्य़ाचे संबंध होते. विलासराव देशमुख.. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहातलं एक अविस्मरणीय व्यक्तीमत्व . चांगला नेता..कुशल प्रशासक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली असली तरी कलागुणांना वाव देणार नेता म्हणूनही ते कलाक्षेत्राला परिचित आहे.....राजकारणाबरोबरच त्यांचा कलाक्षेत्रातही वावर होता... कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला..चहूबाजूने संकटांनी घेरलं असताना डोक्यावर बर्फाचा तुकडा असल्यासारखं शांत वागणे, आणि अडचणीतल्या प्रत्येक प्रश्नाला हजरजबाबीनं उत्तर देत त्या वातावरणाचा नूर बदलवण्याची हातोटी विलासरावांकडे होती.. त्यांच्यातला असलेला कलाप्रेमी हा नेहमीच एखाद्या मित्रासारखा त्यांच्यातल्या नेत्याला मदत करत असल्याचं वारंवार जाणवायचे.

बाभळगावमध्ये देशमुख कुटूंबात जन्मलेल्या विलासरावांचे आयुष्य जस एश्वर्यसंप्पन होत तेवढचं ते एका पंरपरेशी नाते सांगणारे होते.. विलासराव यांच्या वडीलांना शास्त्रीय संगीताची आवड होती तीच आवड विलासरावांना होती.. 40 च्या दशकात गावा-गावात दुमदुमणारी भजन किर्तन आणि टाळ मृदूगांचा निनाद देशमुखांच्या गढीतील विलासरावांच्या मनावर कायमचंच घर करुन गेला.. पुण्यात एलएलबीच्या शिक्षणाच्या निमित्तानं विलासरावांच्या मनातला श्रोता आणि प्रेक्षक सुजाण होता गेला.. अनेक चित्रपट आणि नाटक पाहता पाहता विलासरावांच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्याचा प्रचंड प्रभाव पडत गेला.. पुढे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समाविष्ट झाल्यावर त्यानी सांस्कृतिक कार्य या विभागाची धुरा सांभाळत नाट्यव्यवसायाला उर्जिता आणण्यासाठी अनेक योजना आखल्या..त्यातूनच विलासरावांशी अनेक नाट्यकलावंतांचे जिव्हाळ्याचे संबध निर्माण झाले होते.. रुबाबदार अशा भासणा-या या नेत्यानं बॉलिवुडच्या कलाकारांवरही आपली छाप सोडली होती.. महाराष्ट्राची कलासंस्कृती हे महाराष्ट्राचे खरं वैभव आहे या विचारसरणीवर विलासरावांचा विश्वास होता..

शास्त्रीय संगीतापासून ते नाट्य़ संगीतापर्यंत विलासरावांना आवड होती..तसेच त्या कलांबद्दलचे विलासरावांचे प्रेम नेहमीच दिसून यायचे.. अनेक संगीत महोत्सवाला विलासरावांच्या उपस्थिती म्हणजे सत्तापद बाजूला ठेवत केवळ एक श्रोता म्हणून असायची.. आपल्या मतदारासंघातील कलावंताना चालना मिळावी आणि दिग्गज कलावंताचा कलाविष्कार पाहण्याची संधी त्यानी लातूरकराना लातूर महोत्सवाच्या निमित्तानं मिळवून दिली होती.. गेल्या अनेक नाट्यसंमेलनाच्या सांगता सोहळ्यात देशमुखांची फटकेबाजी हा एक पाहण्यासारखा सोहळा असायचा.. नाट्य चित्रपट आणि साहित्यावर भरभरुन प्रेम करणारा आणि हे सारं एका दिलखुलास नजरेनं पाहणारा नेता यानंतर कधीच श्रोतेगृहात दिसणार नाही हे एक अटळ वास्तव बनलय.

कला क्षेत्राप्रमाणेच क्रिकेटमध्येही विलासरावांना रुची होती...आपल्या कामातून विलासराव देशमुखांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये वेगळा ठसा उमटवला होता. क्रिकेटवर प्रेम करणार एक सच्चा चाहता हरपल्याची खंत भारतीय क्रिकेटविश्वात व्यक्त केली जातेय.

विलासराव देशमुखांची मुबई क्रिकेट असोसिएशनची कारकीर्द तशी लहानच होती. 2009 ते 2011 पर्यंत ते एमसीएच्या उपाध्यक्षपदी विराजमान होते. उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. त्यानंतर जुलै 2011 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांनी दिलीप वेंगसकरांना पराभूत करत बाजी मारली. या निवडणुकीत त्यांनी 329 मतांपैकी 182 मतं मिळवली. वेंगसकरांचा त्यांनी 47 मतांनी पराभव केला. शरद पवार आणि मनोहर जोशी यांच्य़ानंतर एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते तिसरे मुख्यमंत्री होते. या विजयानं त्यांनी राजकरणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपली दादागिरी सिद्ध केली.

विलासरावांनी अनेक युवा क्रिकेटपटूंना विलासराव स्पोर्टस फाऊंडेशन ग्रुपच्या अंतर्गत स्कॉलरशिपही मिळवून दिली. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं मुंबआ क्रिकेट असोसिएशनला जबरदस्त धक्का बसला आहे.

आपल्या वाणीनं भल्याभल्यांची भंबेरी उडवताना महाराष्ट्रानं विलासरावांना अनेकदा पाहिलंय. विलासरावांना निसर्गतःच लाभलेली वक्तृत्वाची शैली आणि त्याला त्यांनी दिलेलं अभ्यासाचं कोंदण यामुळं विलासरावांचं भाषण ही श्रोत्यांसाठी पर्वणी असायची.

विलासरावांचं भाषण ऐकताना जांभई देणारा किंवा सभागृहातून बाहेर पडणारा श्रोता अख्ख्या महाराष्ट्रात सापडणं कठीण आहे. मुद्दे आणि गुद्दे या दोन्ही आयुधांचा लिलया वापर करत विलासरावांनी फक्त बोलत राहावं आणि एका विनोदावरचं हसू संपण्याआधी पुढच्या टोमण्यासाठी श्रोत्यांनी तयार राहावं.
बाभळगाव ते बाभळगाव,

विलासरावांनी आपल्या वाणीनं अनेकांना चिमटे काढले, गुद्देही घातले. मात्र कधी कुणाला रक्तबंबाळ केलं नाही किंवा कधी कंबरेखाली वारही केला नाही. विलासरावांची अशी खुमासदार, अभ्यासपूर्ण आणि मार्मिक व्याख्यानं इथून पुढं ऐकता येणार नाहीत, याची खंत सगळ्यांनाच आहे. मात्र विलासरावांनी निर्माण केलेली राजकीय भाषणांची सभ्य संस्कृती नव्या राजकीय पिढीसाठी आयुष्यभराची शिदोरी ठऱलीय, हे नक्की.


विलासरावांची राजकीय कारकिर्दीला वादांचीही किनार होती. सानंदा प्रकरण, आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरण किंवा सुभाष घईंना जमीन देण्याचं प्रकरण. विलासराव अशा प्रकरणांमुळं अडचणीत येत गेले.. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता कायम राहिली. कुशल प्रशासक ...चतुरस्त्र.... उमेदी...दिलखुलास... अशी ओळख राज्याच्या राजकारणात विलासरावांनी निर्माण केली असली तरी...त्यांच्या या कारकिर्दीला वादाची किनारही होतीच.

काही प्रकरणांमुळे ते चांगलेच अडचणीत आले होते...सानंद सावकारी प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगाशी आलं होतं...काँग्रेस आमदार सानंद आणि त्यांच्या वडिलाविरोधात कर्जबाजारी शेतक-याच्या आत्महत्येप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती..त्या प्रकरणात विलासरावांनी आपलं राजकीय वजन वापरुन हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता...हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने विलासरावांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली होती ..तसेच त्यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

सानंद प्रकरणामुळे विलासरावांवर बरिच टीका झाली होती...तसेच सर्वाधिक बदनामी त्यांना सहन करावी लागली..... सानंद प्रकरणाप्रमाणेच आदर्श सोसायटी घोटाळ्यातही विलासरावांच्या नावाची चर्चा झाली. मुंबईच्या फिल्मसिटीतील कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन सिनेदिग्दर्शक सुभाष घाई यांना कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप विलासरावांवर झाला...त्यांचा हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला होता...लातूरच्या एमआयडीसीतील जमीन स्वताच्या संस्थेला देण्याचा निर्णयही वादात सापडला होता.

First Published: Wednesday, August 15, 2012, 22:21


comments powered by Disqus