काळा खजिना! Black Treasure

काळा खजिना!

काळा खजिना!
www.24taas.com, झी मीडिया,

मुंबई सेंट्रल स्थानकावर एनआयए आणि आयकर खात्यानं मध्यरात्रीनंतर केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी पोलिसांनी ४७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नोटा मोजण्याचं काम सुरू असून ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

याच चार ट्रकांकडे आता अवघ्या मुंबईचं लक्ष वेधून घेतलय. कारण मालवाहू असणा-या या ट्रकात चक्क नोटांच्या बॅगा भरल्या होत्या.. या ट्रकांची ज्यावेळी तपासणी झाली तेव्हा सगळेच जण हादरुन गेलं..

४ ट्रक

१५० बॅगा

२५०० कोटी रूपये ?

हे ट्रक याघडीला मुंबईच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या बाहेर उभे करण्यात आले.. ट्रका या क्षणाला रिकामे असले तरी अजुनही त्याच कुतूहलाने पाहिलं जातेय.. याच ट्रकातून या तब्बल १५० बॅगांमधून गुजरातला पाठवले जात होते २५०० कोटी रूपये... ज्या शहरात एक एक नोट कमवण्यासाठी चाकरमानी अहोरात्र घाम गाळतात त्य़ा शहरात चार ट्रकात चक्क पैशांच्या बॅगा भरुन ट्रेनमधून दुस-या राज्यात पाठवला जातोय.. आणि असा पैसा कि ज्याचा मालक कोण याबद्दलच प्रश्नचिन्ह अजुनही कायम आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातच्या वेगवेगळ्या शहरात या बॅगा पोहोचणार होत्या.. मात्र त्याआधीच नॅशनल इन्विसिटीगेशन एजन्सी..आणि इन्कम टॅक्स विभागानं ही संयुक्त कारवाई केली.. आणि याच संय़ुक्त कारवाईत भलीमोठी रक्कम पकडण्यात आलीय. चार ट्रकमध्ये भरून या बॅगा आणण्यात आल्या होत्या.. गुजरात मेलने या बॅगा रवाना होण्याची तयारी सुरू होती. मात्र त्याच आधी एनआयए आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापा मारून या बॅगा ताब्यात घेतल्या. दोन्ही डिपार्टमेंटना याबाबत टीप मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये १०० पेक्षा जास्त ऑफीसर सहभागी झाले. ट्रकच्या ड्रायव्हर क्लिनर्ससह एकूण ४७ जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आली. हवाला रॅकेटमधून ही रोकड जमल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मात्र अजूनही कॅमेऱ्यासमोर थेट प्रतिक्रिया देण्यास अधिकारी तयार नाहीत.

सुत्रांच्या माहितीनुसार ही २५०० कोटींची रक्कम आहे. मात्र एनआयए आणि इन्कमटॅक्स विभागाने अजून काही स्पष्ट केलंलं नाही. ट्रक आणि ट्रेनच्या माध्यमातून इतकी मोठी रक्कम पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र पैसा कोणत्या शहरात चालला होता.. कोणाला मिळणार होता.. कशासाठी हा पैसा चालला होता या प्रश्नांची उत्तरं चौकशीतूनच बाहेर येतील. पण तोपर्यंत या भल्यामोठ्या रकमेभोवती फिरणार प्रश्नचिन्ह कायमच राहणार आहे...

मुंबईत सुमारे १५० बॅगांमध्ये भरलेल्या त्या नोटा आणि दागदागिने कोणाचे आहेत हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय. ही सगळी माया कोण आणि कुठे पाठवत होता.ही रोकड ब्लॅकमनी होती का आणि हवालाच्या मार्फत पाठवली जात होती की, यामागे एखादी दहशतवादी लिंक होती... एनआयए आणि इन्कमटॅक्स विभाग याच प्रश्नाचं उत्तर आता शोधतोय..

या त्याच नोटा आहेत, ज्य़ा सोमवारी मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर असलेल्या ट्रकात साप़डल्या होत्य़ा.. सोमवारी रात्री एनआयए आणि आयकर विभागाने घातलेल्या धाडीत दिडशे बॅगेत ही कोट्यवधींची माया जप्त करण्यात आलीय. चार ट्रकातून सापडलेली ही रक्कम मोजण हे आता एक मोठं आव्हान तपासयंत्रणेसमोर ठाकलय.. आयकर विभागाचे एक दोन नाही तर तब्बल १८० कर्मचारी टेलर मशीनने ही सगळी रक्कम मोजण्यात गुंतले आहेत. या क्षणापर्यंत मोजलेल्या रकमेची मोजदाद २०० कोटीपर्यंत गेलीय. बॅगामध्ये साप़डलेले हिरे दागदागिने यांची मोजगाग करणे अजुन बाकी आहे. या धाडीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार ही सगळी बेहिशेबी मालमत्ता सराफ आणि हिरे व्यापा-यांची असू शकते.. आणि ही सगळी रक्कम आंगडिया मार्फत पाठवली जात होती..

आतापर्यंत सुमारे २५ आंगडिया ऑपरेटर समोर आलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार साप़डलेल्या थैल्यात त्यांची कन्साईनमेंट होती. त्या ऑपरेटरनी केलेल्या दाव्यानुसार ते सोने आणि हि-यांची डिलिव्हरी करतात. पण ते पैशाची वाहतूक करत नाहीत असा त्यांचा ठाम दावा आहे

एनआयए आणि आयकर विभागानं मारलेल्या या धाडीनंतर हा प्रकार पहिलाच नसून या अगोदरही असे प्रकार घडले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा सुरु झालीय. या बॅगा सापडल्य़ानंतर ज्यावेळी त्या उघडल्या गेल्या त्यावेळी ती प्रचंड रक्कम पाहून सारेच जण चक्रावले होते. या प्रकरणात चौकशीसाठी सात ट्रक ड्रायव्हरांबरोबरच ४७ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय..

कोट्यवधीच्या या संपत्तीमागे हवाला कनेक्शन असल्याचं आता स्पष्ट होत चाललय. पण यामागे एनआयए कारवाई केल्यानं दहशतवादी लिंक असल्याची शक्यताही वाढलीय...त्यामुळेच या कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आपल्याबरोबर अनेक चेहरे प्रकाशात आणणार आहे हे मात्र नक्की..

मुंबईत झालेल्या या कारवाईनंतर हे पैसे हवालाच्या मार्फत हे पैसे पाठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. हे पैसे जरी गुजरातला पाठवण्यात येत असले तरी हवालामार्फत चालणारा कारभार अवघ्या जगभर चालतो.. एक नजर टाकूया हा बहुचर्चित हवाला नेमका चालतो कसा..

चार ट्रकमध्ये कोट्यवधींची माया !

गुजरातला पोहचवण्यात येत होती रक्कम !

पकडलेल्या रक्कमेमागे हवाला ?

सर्वसामान्यांना पैसे पाठवण्यासाठी मनी ऑर्डर, कॅश ट्रान्सफर, चेक आणि डिडी एवढीच मर्यादीत साधन आहेत.. अर्थात या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत.. कायदेशीर आहेत आणि म्हणूनच त्या मर्यादीतही असतात..

पण ज्या पैशाला ब्लॅक मनी संबोधतात किवा ज्याला कुठलाही कायदेशीर आधार नसतो त्या पैशाला मात्र हवालाचाच आधार असतो. हवालाच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज पैसे पाठवता येतात. जर एखाद्या व्यक्तीला परदेशात पैसे पोहचते करायचे असतील तर त्याला हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात. एका देशातून दुस-या देशात पाठवण्यात येणा-या या पैशाचा हिशेब दर तीन तीन अथवा सहा महिन्यानी दिला जातो. जेव्हा हा हवालाच्या माध्यमातून व्यवहार होत असतो तेव्हा ते पैसे पुन्हा पाठवण्यासाठी कॅरियरची मदत घेतली जाते. या सगळ्या काळ्या धंद्यात कॅरियरची भुमिका फार महत्वाची असते. कारण याच कॅरियरना प्रत्यक्ष काम तडीस न्यायचं असतं आणि सगळ्या यंत्रणेला फसवून हा बिनबोभाट व्यवहार पुर्ण करायचा असतो.

हवालाचा पैसे ने आण करण्यासाठी अनेक लोकांचा वापर कऱण्यात आल्याचं समोर आलंय.. यामध्ये राजकारणी, खेळाडु, आणि सिनेस्टारचा वापर झाल्याचं अनेक वेळा उघ़ड झालय.. इव्हेट मॅनेजमेंटमधील लोक कार्यक्रमासाठी एका देशातून दुस-या देशात प्रवास करत असतात. या लोकांचाच बहुतांशी कॅरियर म्हणून वापर केला जातो. इव्हेट मॅनेजमेंटमधील लोक कार्यक्रमासाठी ज ता असल्यामुळे त्यांना पैसे देण्याची गरज नसते. मात्र हवाला एजंट यांच्याकडे परदेशी चलन देतात.. जे पैसे देशात पोहोचल्यावर तेथील हवाला एजंट स्वताच्या ताब्यात घेतात..

हवाला एजंट कडून काळ्या पैशाच्या या खेळासाठी नवनवीन कल्पना वापरल्या जातात.. पण या सगळ्यातही यंत्रणाना जरी फसवून हे व्यवहार होत असले तरी यंत्रणेतले सगळेच याबद्दल अनभिज्ञ असतात अशातला भाग मुळीच नसतो..


मुंबईत मुंबई सेंट्रल येथे एनआयए आणि आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात कोट्यावधीचं घबाड हाती लागल्यानंतर हवालामार्फत केले जाणारे व्यवहार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेत. हवाला मार्फ़त कसे व्यवहार केले जातात, मुंबईत कुठे असे व्यवहार चालतात,

हवाला म्हणजे का़य?

कसे पोहोचवले जातात कोट्यावधी रुपये हवालामार्फत ?

देशात कसं पसरलय हवाला ऑपरेटर्शचं जाळं ?

एक दोन नाही तर तब्बल 150 बॅगांमधून अंगडीयांमार्फत हवालाने

पाठवले जाणारे २०० कोटी रुपये एनआयए आणि आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात मिळालेत. या छाप्यामुळे अंगडियांचा हवाला व्यवहार पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय. अंगडिया म्हणजे एका अर्थी कुरीअर सर्विस पण, या कुरिअर सर्विस मध्ये अंगडिया लाखो करो़डो रुपये कमावतात. हंगामात या अंगडियांना खुप मागणी असते. याकाळात एक लाख रुपये पोहोचवण्याच्या बदल्यात, २०० रुपये ते ८०० हे अंगडिया घेतात. दिवसा अंगडियांमार्फत फक्त महाराष्ट्रातून १०० कोटींच्या जवळपास व्यवहार होतात. तर १ लाख कोटी हिरे व्यापारी आणि ७० हजार कोटी सोने आणि चांदी व्यापारी या अंगडियांमार्फत व्यवहार करतात. मुंबईतील गिरगाव, मालाड, आणि अंधेरीसह डझनभर ठिकाणी या अंगडियांचे व्यवहार चालतात. पण, आता काही अंगडिया पैशांच्या हव्यासापोटी हवाला ऑपरेटर झालेत.

व्यापाऱ्यांना या अंगडियांवर इतका विश्वास असतो की हे, व्यापारी अंगडियांमार्फत कोट्यावधींचे व्यवहार करतात. कर चुकवण्यासाठी व्यापारी या अंगडियांचा वापर करतात, पण, आता अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संगठनाही या अंगडियांचा वापर करु लागलेत म्हणून या अंगडियांना हवाला ऑपरेटर म्हणून जास्त संबोधलं

नुकतच आयपीएल बेटींग प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचंनं अलपेश पटेल या अंगडिया अटक केली होती. बुकी रमेश व्यास अल्पेश पटेल याच्या मार्फत हवालाने बेटींचे पैशे देशात आणि परदेशात पोहोचवत होता. एवढचं नाही तर अनेका दहशतवादी संघटना या अंगडियांचा वापर करुन दहशतवादासाठी पैसे मिळवतात हे देखील पोलीस तपासात उघड झालय. आणि मुंबई सेंट्रल येथे पकडण्यात आलेल्या शेकडो बॅगांमध्ये अब्जावधी रुपये पकडण्यात आले, हे पैशे दहशतवाद्यांना पुरवले जाणार असल्याची माहिती एनआयए या तपास यंत्रणेला मिळाली होती. म्हणून एनआयएननं आयकर विभागाच्या मदतीनं या छापा टाकून हे पैसे हस्तगत केलेत. आता हे पैशे नेमके कोणी कोणासाठी पाठवले होते. याचा तपास आता एनआयए करत आहे.

अंगाडियाचा व्यवहार कसा असतो याची कल्पना तुम्हाला आली असेल.. पण अंगाडियाचा सगळा धंदा हा विश्वासावर अवंलबून असतो.. पण अंगाडिया विश्वासावर काम करत असतील कदाचित, पण तो पैसा देणारे हवालाचेही असू शकतात किवा दहशतवादीही..

अंगडिया म्हणजे रोकड, सोनं-चांदी आणि हिरे ऐका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहचवणारी देशी कुरिअर सर्विस...राजा महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या या कारभारात सुरवातीला हुंडी द्वारे रक्कम पाठवली जायची...त्यानंतर सोनं चांदी आणि हिरे पाठवण्याचा कारभारही सुरु झाला...अंगडिया आपलं कमिशन घेऊन तुमचं कन्साईटमेन्ट तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहचवण्याचं काम करतो. या धंद्याचं आणि अंगडियांच वैशिष्ट म्हणजे कन्साईटमेन्ट काय आहे हे अंगडीया कधीच विचारत नाही किंवा माहित करुन घेण्याच्या भानगडीतही पडत नाही..

वर्षानूवर्ष हा कारभार फक्त आणि फक्त विश्वासावरच चालतो. तुमची कन्साईटमेन्ट गहाळ झाल्यास त्याला पूर्णपणे अंगडीयाच जबाबदार असतो...अंगडीया म्हणजे एक प्रकारची बँक सिस्टमच आहे. यांच्या मार्फत कोट्यावधी रुपये काही वेळातच एका शहरातून दुस-या शहरात पाठवले जाऊ शकतात..पैसे पाठवणा-याला अंगडीयाकडे आपली रक्कम जाऊन द्यावी लागते. आणि अंगडीया दुस-या शहरात तेवढीच रक्कम संबंधित व्यक्तीकडे पाठवण्याची व्यवस्था करतो..आणि याच्याच मोबदल्यात तो 0.20 ते .50 टक्के कमीशन घेतो...

अंगडीया कारोबा-यांवर वेळोवेळी काळा पैसा इकडून तिकडे करण्याचा आणि तस्करीचा माल पाठवण्याचाही आरोप केले जातात..यात किती तथ्य आहे हा तर तपासाचा विषय आहे.. असं असलं तरी आजही हजारो-लाखों व्यापारी या यंत्रणेवर विश्वास ठेऊन आहेत. आणि देवाण घेवाणासाठी अंगडीयाची मदत घेतात...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013, 23:38


comments powered by Disqus