Last Updated: Friday, November 9, 2012, 00:05
www.24taas.com, मुंबईआजच्या तरुण पिढीला दारुच्या व्यसनाने आजगरी विळखा घालण्यास सुरुवात केली असून हळूहळू ही पिढी व्यसनाच्या खाईत ढकलली जात आहे. कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंगकन ड्रायईव्ह या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं असून त्यातून जी माहिती समोर आलीय ती अत्यंत धक्कादाय आहे. हे सर्वेक्षण दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आलं आहे.
सरासरी वयाच्या १५ व्या वर्षी मुलांनी दारूची पहिल्यांदा चव चाखल्याचं कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंगकन ड्रायईव्ह या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून उघड झालंय...दारु पिण्यात मुलीही काही मागे नाहीत. सरासरी वयाच्या १७ व्या वर्षी मुलींनी दारूचा पहिला घोट घेतलाय.
युवा भारतातील ३३% मुले आठवड्यातून २ - ३ वेळा दारूची पार्टी झोडतात. तर जवळपास २८% मुली महिन्यात १० - १२ वेळा दारूची पार्टी करतात. पॅकेट मनी म्हणून दर महिन्याला आई-वडील काही रक्कम मुलांना देतात परंतु त्यातील २५% कॉलेज तरुण २ हजार रुपये दारूवर खर्च करतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ७४% तरुण दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं उघड झालंय. पण इथंच हे सगळं काही थांबत नाही तर यापूढेही आजची तरुणाई गेलीय. मुंबईपासून दिल्लीपर्यंत हेच चित्र तुम्हाला पहायला मिळेल.
दारु ही शरीराला अपायकारक असल्याचा संदेश शहरापासून खेड्यापर्यंत पहायला मिळतो. बार,पब आणि डिस्कोमध्ये प्रवेश दिला जाण-या व्यक्तीच्या वयासंदर्भात सूचनाही लिहिलेली असते. पण हे सगळं काही केवळ त्या सूचना फलका पुरतंच मर्यादीत असतं. दिल्लीत ‘कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्राईव्ह’ या संस्थेनं कॉलेज तरुणांमध्ये सर्वेक्षण केलं तेव्हा बार, पब आणि डिस्कोचं वास्तव उघड झालं..
पब आणि डिस्को थेक मध्ये २५ पेक्षा कमी वय असलेल्या मुला-मुलींना कायद्याने प्रवेश दिला जात नाही. पब आणि डिस्को थेकमध्ये जाणा-या मुलांच वय किती असावं हा वादाचा मुद्दा असला तरी कधी मित्राच्या घरी तर कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी चालत्या कारमध्ये दारु पिऊन ते बेधुंद होतात.
दिल्ली विद्यापीठातील जवळपास ३० कॉलेजमध्ये कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्राईव्ह या संस्थेनं सर्वेक्षण केलं असून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली.
जवळपास ५४ % मुलांनी वयाच्या १५ ते १६ व्या वर्षी दारूला स्पर्श केल्याचं मान्य केलंय..तर ४१ % मुलींनी वयाच्या १७ ते १८ व्या वर्षी पहिल्यांदा दारूची चव चाखल्याची कबुली दिलीय. ३३ % मुलं आठवड्यातून ४ वेळा दारुच्या नशेच झिंगतात...तर २७ % मुली हाच मार्ग अवलंबतात. एका बैठकीला किती पेग घेता असं विचारल्यावर ७३ % मुलांनी एकावेळी ५ पेक्षा जास्त पेग रिचवत असल्याचं सांगितलं...तर ३८ % मुलींनी एकावेळी ५ पेक्षा जास्त पेग घेत असल्याचं मान्य केलं. यावरुन मुलांप्रमाणेच बेधुंद होण्यात मुलीही मागे नसल्याचं तुमच्या लक्षात येईल.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे नुकतेच दहावी सुटलेले आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेलेली ही पिढी दारुचा खर्च कसा भागवते असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही..जेव्हा या तरुण- तरुणींना या बाबत विचारलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर मोठं धक्कादायक होतं...
रोजचा लागणारा खर्च भलेही किरकोळ असला तरी २५ % तरुणांनी आठवड्याला २ हजार रुपये दारुवर खर्च केल्याचं मान्य केलंय. तर ४५ % तरुणींनी आठवड्याला १ हजार रुपये दारुवर खर्च केले आहेत..हादरुन सोडणारी बाब म्हणजे ७४ % तरुणांनी नशेत वाहन चालवल्याचं सर्वेक्षणातून उघड झालंय...तसेच ३५ % तरुणींनी वाहनात किंवा सार्वजनिक ठिकाणी दारु प्यालाचं मान्य केलंय.
ही आकडेवारी बघीतल्यानंतर महानगरांमध्ये ८१ टक्के मुलांनी वयाची १८ वर्ष पूर्ण होण्या आधीच दारुची चव चखलीय. तर मुलींमध्ये हेच प्रमाण ६० टक्के इतकं आहे...कुणी ताणतणावाच्या नावाखाली तर कुणी फॅशन म्हणून दारुचा ग्लास ओठाला लावतो...आणि त्यामुळेच युवा पिढी दारुच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता निर्माण झालीय..
हे सगळं बघितल्यानंतर हे कोवळी मुलं मुली दारुच्या आहारी का जात आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आजच्या आधुनिक समाजात दारु पिणं ही फॅशन बनलीय? की बदलत्या जीवनशैलीमुळे ही पिढी ताणतणावाला नशेत बुडवू पहातेय? कोवळ्या मनावर दारुनं अशी काय मोहिनी घातली? कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्राईव्ह या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात उघड झालेली माहिती पालक तसेच शिक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे..
या सर्वेक्षणादरम्यान कॉलेज तरुणांना काही प्रश्न विचारण्यात आले...त्यामध्ये तुम्ही दारु कुठून खरेदी करता असं विचारलं असता ३७% मुलांनी पब आणि बारमधून दारु घेतल्याचं सांगितलं. तर ६० % मुलींनी पब, बार, डिस्कोमध्ये हार्ड ड्रिंक्स घेतल्याचं सांगितलं..
दारु पिणं फॅशन बनलीय का ?
कधी बिअरच्या फेसात तर कधी दारुतल्या बुडबुड्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न आजची युवा पिढी करत आहेत. सगळा ताण-तणाव नशेत बुडवून टाकण्याचा प्रयत्न तरुणाईकडून केला जातोय. तर कधी फॅशन, कल्चर,ट्रेंडच्या नावाखाली दारुचे पेग रिचवले जातात. या सगळ्या मागचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.आजच्या युवा पिढीचं हे वास्तव असून त्याकडं दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
दारुची झिंग आणि वाहानाचा वेग याचं जेव्हा तरुणाईनं कॉकटेल केलं तेव्हा ते जीवघेणं ठरलंय .ड्रिंक अँड ड्राईव्ह मोठ्याशहरात नेहमीच घातक ठरलं आहे...पण या विषयी नव्या पिढीला काय वाटतंय ? ते ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...
दारु पिऊन वाहन चालवणं अयोग्य असल्याचं ८९% तरुणांनी मान्य केलं, मात्र ७४% तरुणांनी नशेत वाहन चालवल्याचं मान्य केलंय. दारु पिऊन वाहन चालविणा-यांविरोधात दिल्लीपासून मुंबईपर्य़ंतच्या पोलीसांक़डून दरवर्षी कारवाई केली जाते...मात्र ९९% तरुणांना एकदाही पोलिसांनी हटकलं नसल्याचं या सर्वेक्षणातून उघड झालंय...विशेष म्हणजे नशा करुन वाहन चालविणा-यांविरोधात पोलिसांकडून केली जाणारी कारवाई पर्याप्त नसल्याचं ९०% तरुणांनी सांगितलंय.
दिल्ली पोलीसांकडून मोठमोठे दावे केले जात आहेत त्याप्रमाणे बंगळुरु आणि मुंबई पोलिसांकडूनही दावे केले जात आहेत.नशेत बेधुंद झालेली ही तरुणाई जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा ती स्वत:प्रमाणेच रस्त्याने जाणाऱ्यांच्या जिवासाठीही धोकादायक ठरु शकते. कडक कायदे करुनही हा प्रश्न जसाच्या तशाच असून ही जबाबदारी केवळ पोलिसांवर ढकलून चालणार नाही. अशा प्रकाराला पालकही तेवढेच जबाबदार असून त्यांनी या सगळ्यावर अंकुश ठेवल्यास अशा प्रकारांना आळा बसेल..
पब, डिस्को, बार यांची भलेही नावं वेगळी असतील. शहरांची नावंही वेगळी असतील पण हे चित्र मात्र सगळीकडं एकसारखंच पहायला मिळेल. वेगवान झालेलं आयुष्य आणि पुढे जाण्याच्या नादात तरुणाई दिवसरात्र एक करायला मागे पुढे पहात नाही. या वेगवान जीवनशैलीत सुखाचा क्षण शोधण्यासाठी मग ते नशेचा आधार घेतात.
काही तरुण मात्र वेगळे आहेत. एका वीस वर्षीय तरुणाला दर महिन्याला दीड हजार रुपये पॉकेटमनी घरातून दिला जातो. त्याचे मित्र त्याला पबमध्ये घेऊन जाण्यास उत्सुक आहेत पण त्याचे पालकच त्याचे मित्र बनल्यामुळे त्याला पबमध्ये जाण्याची आवश्यकता वाटत नाही. तो पबमध्ये जाण्याऐवजी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण पसंत करतो..
आयुष्यात पुढे जाण्याचा चढाओढीत तुमचा मुलगा किंवा मुलगी चूकीच्या मार्गावर तर जात नाही ? याकडं लक्ष देण्याची आज आवश्यकता निर्माण झालीय..
First Published: Thursday, November 8, 2012, 23:21