Last Updated: Saturday, September 22, 2012, 00:13
www.24taas.com, मुंबईका दुभंगली टीम अण्णा ?
राजकीय महत्वाकांक्षेने केला घात ?
सामाजिक चळवळीचं कसं झालं नुकसान ?
काय असेल आंदोलनाचं भवितव्य ?
एक होती टीम अण्णा ! आंदोलनाचा पूर ओसरला खरा पण किती जमीन ओली झाली याचं उत्तर टीम अण्णाकडही नाही.. कारण टीम अण्णा आता दुभंगलीय.... अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग आता मोकळे झालेत.... अण्णांनी तसं स्पष्टपणे सांगितल्यानं केजरीवालही हैराण आहेत.... अण्णांशिवाय टीमचं भवितव्य काय असेल याची चर्चाही त्यामुळे रंगू लागलीय.... जनलोकपाल आंदोलनाचा पूर ओसरल्यानंतर टीम अण्णांनी काय साधलं? असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर अण्णांच्या या प्रतिक्रीयेत आहे...भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या उद्देशातून जनलोकपालचं आंदोलन उभारण्यात आलं...कधी जंतरमंतर तर कधी रामलीला मैदानावरुन सरकारला खंडीत पडकण्याचा प्रयत्न केला गेला...राजकारणात मुरलेल्य़ा काँग्रेस नेत्यांनी टीम अण्णाला चांगलंच खेळवलं...आणि आपल्याला जे हवं तेच केलं...या दरम्यान टीम अण्णामध्ये बरचं काही घडलं...आता तर टीम अण्णाही इतिहास जमा झालीय... आणि अण्णा आणि त्यांच्या अलिकडच्या काळातील सहकार्यांमधले संबंधी पूर्वी सारखे राहिले नाहीत..
टीम अण्णाचा विषय निघताच अण्णा उद्विग्न होतात.. भ्रष्टाचाराविरोधात देशात सर्वात मोठ्या आंदोलनाचं रणशिंग फुंकणारे अण्णा हजारे आणि या आंदोलनाचा ब्रेन मानले गेलेले अरविंद केजरीवाल यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. यात आता काही शंका राहिली नाही, ना कोणतंही प्रश्नचिन्हं.... राजकीय पर्यायाला भ्रष्टाचाराच्या समस्येवरचा इलाज मानण्यास नकार देत अण्णांनी केजरीवालांशी नातं तोडलंय... पण अण्णांनी आधीच टीमशी फारकत घेतलीय.... त्यामुळे अण्णांच्या टीमचे अन्य सदस्य आता काय करणार याचीही उत्सुकता आहे... सहका-यांकडून अपेक्षाभंग झाल्यानेच अण्णांनी आपला वेगळा रस्ता निवडला आहे काय ? आणि देशाला राजकीय पर्याय देण्याचा दावा करणा-या केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीला अण्णांशिवाय जनसमर्थन मिळू शकेल का ? असे प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेत.... टीम अण्णा का फुटली ? टीम अण्णाला कोणी फोडलं ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत....

असं काय घडलंय की अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या संबंधांवर उत्तरच मिळू नये..... असं काय घडलंय की दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात.... दोघांनीही देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ घेतली होती.... दोघंही देशाला नवी दिशा देण्याचा दावा करत होते..... दोघांच्या एका आवाजानं देश भ्रष्टाचाराविरोधात लढ्यासाठी उभा राहिला.... मग असं काय घडलं की अण्णा आणि केजरीवाल यांना वेगवेगळा मार्ग पत्करावा लागला ? अण्णा म्हणतात सगळं दिवसाढवळ्या घडलं, काही लपूनछपून नाही.... टीमपासून का दूर गेले अण्णा ? काय आहे पहिली शक्यता ? टीम केजरीवालच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे ? जंतरमंतरवर ज्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याची घोषणा केली, तेव्हा देश आवाक झाला....
आणि जेव्हा खुद्द अण्णांनीच राजकीय पर्याय देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं तेव्हा आणखीच आश्चर्य वाटलं.... दुसरी शक्यता अशी आहे की अण्णा आणि बाबा रामदेव यांच्या जवळीकीमुळे टीममध्ये दरी निर्माण झाली असावी.... रामलीला मैदानात जेव्हा पहिल्यांदा रामदेव अण्णांच्या मंचावर दिसले तेव्हा बाबा आणि अण्णा नवी ताकद बनतील असा अंदाज बांधला गेला.... पण लवकरच रामदेव आणि टीम अण्णामध्ये मतभेदांच्या बातम्या आल्या.... रामदेवांना भेटण्यास अण्णा सहका-यांसह हरिद्वारला गेले पण टीमबाबत बाबांची नाराजी समोर आली..... तिसरी शक्यता अशी आहे तो टीम दिल्ली आणि टीम राळेगणमधला संघर्ष..... दिल्ली आणि राळेगणमधलं अंतर आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या टीम असणं अण्णा आणि केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण होण्यात कारणीभूत ठरलं ? अण्णा दिल्लीत जाताच टीमच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागले अशी चर्चा अनेकदा झाली....

राळेगणमधल्या अण्णांच्या जुन्या सहका-यांची नाराजी अनेकदा समोर आली.... आंदोलनातील पैशांच्या हिशोबावरून अण्णांनी जाहीर कानपिचक्या दिल्या..... अण्णांच्या सहका-यांवर अनेक आरोप केले गेले पण अण्णा मात्र स्वच्छ राहिले.... त्यामुळे कदाचित टीमबरोबर राहिल्यानं आपली प्रतिमा डागाळेल असं तर अण्णांना वाटू लागलं नसेल ? जे लोक राजकीय नेत्य़ांना पाण्यात पहात होते तेच आता नेते होणार आहेत...अण्णांनी राजकीय पर्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं..राजकीय पर्याय बनण्याची घोषणा कधीच केली नव्हती..त्यामुळेच जनतेचा अण्णांवर विश्वास होता...
पण आता ना अण्णांचं नाव असणार आहे...ना त्याचा फोटो असणार नाही ...ना व्यासपिठावर अण्णा असणार आहेत.. जंतरमंतरवर राजकारणात उतरण्याचा संकल्प घेऊन अण्णा आणि त्यांच्या टीमने नुकतेच उपोषण संपवलं होतं... पण शेवटी त्याच संकल्पामुळे अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या... आपण राजकारणात जाणार नसल्याचं अण्णांनी सांगितलंय तसेच अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या उमेदवारांचाही प्रचार करण्यासही त्यांनी साफ नकार दिलाय.. अशा परिस्थितीत अण्णा नेमकी कोणती भूमीका घेणार ? टीम केजरीवालशी फारकत घेतल्य़ानंतर अण्णा देशभर दौरा करतील...
त्याचाच एक भाग म्हणून अण्णांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पुण्यातील काही सामाजीक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली.. संपूर्ण देशाचा दौरा करुन अण्णा विविध समाजीक कार्यकर्त्यांचं मत जणून घेतील..अरविंद केजरीवालांच्या राजकीय पक्षाला अण्णा डोळे झाकून पाठींबा देणार नाहीत..ते निवडक उमेदवारांचाच प्रचार करणार आहेत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलना दरम्यान आपण राजकारणापासून दुर राहणार असल्याचं अण्णा सतत सांगत होते..
ऑगस्ट महिन्यात जंतरमंतरवर उपोषण संपल्यानंतर अण्णांनी राजकारण्याच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले खरे पण त्यामुळे एकच खळबळ उडाली होती..अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपूढे अण्णांचा नाईलाज झाल्याचा आरोप करण्यात आला..पण आता सगळं काही स्पष्ट झालंय.. अण्णा राजकारणात प्रवेश करणार नाहीत.. तसेच ते अरविंद केजरीवालांचा राजकीय मार्गाही चोखळणार नसल्याचं खुद्द अण्णांनीच स्पष्ट केलंय..
First Published: Saturday, September 22, 2012, 00:13