Last Updated: Friday, May 24, 2013, 23:23
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली फणीश मूर्ती यांनी ऑफिसमधली लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. त्यांना सीईओ पदावरुन जावं लागलंय. मूर्ती हे आयटी क्षेत्रातील आयगेट य़ा कंपनीचे सीईओ होते.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हटलं जातं. पण कधी कधी महिलांविषयीच्या आकर्षणापायी यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. आयटी क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक समजल्या जाणाऱ्या फणीश मूर्तीलाही अशाच प्रकरणाला सामोरं जावं लागतंय. आयटी क्षेत्रातीची उत्तम जाण असलेल्या फणीश यांनी ऑफिसमधील लक्ष्मरेषा ओलांडली. पण त्यामुळे त्यांना आयगेट कंपनीच्या सीईओपदावरुन पायउतार व्हावं लागलंय. आयगेट ही आयटीक्षेत्रातील मोठी कंपनी आहे. फणीश यांचे आपल्याच ऑफिसातील एका महिलेशी मधूर संबंध होते. त्याची माहिती त्यांनी आयगेट कंपनीच्या संचालक मंडळाला दिली नाही. आता त्या महिलेनं फणीश यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. पण फणीशवर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. २००२मध्ये फणीशला अशाच एका प्रकरणामुळे इन्फोसिसमधून काढून टाकण्यात आलं होतं. खरं तर फणीशचं हे प्रकरण काही अनोखं नाही. अशी अनेक प्रकरणं तुमच्या आजूबाजूला होतात आणि पुढे ती दडपलीही जातात. पण आज आम्ही या प्रकरणाचे सर्व कांगोरे उलगणार आहोत कारण अशा प्रकरणात कुणीच उघडपणे बोलत नाही. काहींना अशा कटू अनुभवातून जावं लागलं असेल. त्यामुळे अशा विषयावर चर्चा घडवून आणणं ही एक समाजिक गरज आहे.
एक चूक समजू शकतो ..पण एखाद्याने पुन्हा तिच चूक केली तर त्याला काय म्हणाल? फणीश मूर्तीने दुसऱ्यांदा ऑफिसातील लक्ष्मणरेषा ओलांडलीय. तसंच आता या लैंगिक शोषण प्रकरणातील एक-एक माहिती उघड होवू लागलीय.
फणीश मूर्तीची प्रेम कहाणी एखाद्या बॉलीवूडपटाच्या स्क्रिन प्ले पेक्षा कमी नाहीय. या कहाणीत रोमांस, सेक्स आणि धोका या सगळ्यांचं कॉकटेल आहे आणि ही प्रेम कहाणी आता कोर्टाच्या उंबरठ्यावर जावून पोहोचलीय. मूर्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या अर्सेली रोईजने वकिली फर्म आईमान स्मिथ अँड मर्सीच्या वतीने गंभीर आरोप केलेत.
रोईजशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचं फणीश मूर्तीनी मंगळवारी कॉन्फ्रस कॉलमध्ये कबूल केलं. पण आपले हे संबंध अवघ्या काही महिन्यापूर्वीचे होते असा दावा फणीशने केलाय. रोईजच्या म्हणण्यानुसार २०१० पासून फणीशसोबत तिचे संबंध होते. तसेच मूर्तीने तिला गर्भपात करायला भाग पाडलं होतं. मात्र, फणीश मूर्तीच्या म्हणण्यानूसार पैशाच्या आमिषापायी त्याला ब्लॅकमेल केलं जात आहे.
रोईजच्या म्हणण्यानुसार मूर्ती यापूर्वीही अशा प्रकरणात अडकला असून जाणूनबूजून तो माझ्य़ावर आरोप करत आहे. मूर्तीच्या म्हणण्यानुसार याप्रकरणाविषयी त्यांनी आयगेटच्या चेअरमनला यासंदर्भात अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, रोईजने मूर्तीचा दावा फेटाळला असून सगळ काही झाल्यानंतर मूर्तीने संचालक मंडळाला माहिती दिलीय. तसेच रोईजने कोर्टात जाण्याची धमकी दिल्यानंतर मूर्तीने संचालक मंडळाला याविषयी माहिती दिल्याचा दावा रोईजने केलाय.
मात्र, आयगेटच्या म्हणण्यानूसार मूर्ती यांनी कंपनीच्या नियमांचा भंग केला नाही. अमेरिकेच्या कायद्यानुसार सीईओच्या वर्तनाला कंपनी जबाबदार असते. त्यामुळेच या प्रकरणाची जबाबदारी आता आयगेटवर आलीय. वास्तविक पाहता आयगेट या प्रकरणाचा तपास करतेय. पण आता हे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे बराचकाळ न्यायालय़ीन लढाई सुरु राहणार आहे. तसेच आयगेट आणि मूर्ती या दोघांनाही मोठी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी लागण्याची शक्यता आहे.
बिल क्लिंटन आणि मोनिका लेविन्स्कि ऑफिसमधील लक्ष्मणरेषा ओलांडणाऱ्यांमध्ये केवळ फणीश मूर्तीच आहेत असं नाही तर जगात अनेक दिग्गज आहे ज्यांनी यशाच्या शिखरावर असताना लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. १३ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या राजकारणात मोनिका लेविन्स्कि नावाचं वादळ आलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय एका इंटर्नने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची खुर्ची हादरवून सोडली होती. त्या सेक्स स्कँन्डल प्रकरणात क्लिंटन यांच्यावर प्रचंड दबाव वाढला आणि त्यामुळेच त्यांना देशातील जनतेची माफी मागावी लागली होती.
१९९५ मध्ये मोनिका लेविन्स्किने प्रशिक्षणार्थी म्हणून व्हाईट हाऊसमध्ये कामाला सुरुवात केली आणि काही दिवसातच राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या नजरेत भरली. तिला व्हाईट हाऊसच्या स्टाफमध्ये सहभागी करुन घेण्याची शिफारस क्लिंटन यांनी केली होती. त्यामुळे प्रशिक्षण काळ संपल्यानंतरही त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. मोनिकाला नोकरी मिळाली पण तिने ती नाकारली. जानेवारी १९९८ मध्ये क्लिंटन आणि मोनिका यांचे संबंध जगासमोर आले आणि क्लिंटन यांना त्याची किंमत मोजावी लागली. त्यांचा वकीलीचा हक्क काढून घेण्यात आला तसेच खोटा जबाब दिल्याप्रकरणी ९० हजार डॉलरचा दंड भरावा लागला.
डॉमिनिक स्ट्रास आणि सेक्स स्कँडल फ्रान्सच्या डॉमिनिक स्ट्रास यांना २००७ मध्ये अंतराराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं होतं. पण २००८ मध्ये अंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कार्यालयातील एका महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं.. न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात काम करणाऱ्या महिलेचं लैंगिक शोषण केल्याचं २०११ मध्ये समोर आलं. त्यामुळेच त्यांना अटकही झाली. पण पुढे पुराव्या अभावी त्यांची सुटका झाली.
डेव्हिड पेट्रियस आणि पाऊला अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक डेव्हिड पेट्रियस यांना विवाहबाह्य संबंधामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाऊला ब्रॉडवेलशी त्यांचे प्रेमसंबंध होते. ती डेव्हिड यांच्या कार्यालयात कामाला होती. अमेरिकेतील तपास संस्था एफबीआयने हे प्रकरण बाहेर काढलं होतं. एका प्रकरणाचा तपास करत असतांना एफबीआयला ही माहिती मिळाली.
गोपाळ कांडा आणि गितीका भारतातही अशी अनेक प्रकरणं झाली आहेत. गोपाळ कांडाने आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या २३ वर्षीय गितीकाची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. पण कांडाने तिचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली. गितीकाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कांडा तसेच त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या अरुण चढ्ढाला जबाबदार धरलं होतं. त्या कारणामुळेच कांडाला हरियाणाच्या गृहराज्यमत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं
First Published: Friday, May 24, 2013, 23:23