चित्रपट समीक्षा : धम्माल... `मटरु की बिजली का मन्डोला`, Matru ki bijlee ka mandola

धम्माल... 'मटरु की बिजली का मन्डोला'

धम्माल... 'मटरु की बिजली का मन्डोला'
www.24taas.com, मुंबई

‘मटरु की बिजली का मन्डोला’... नावानरूनच सिनेमा हटके वाटतोय ना!... पण, फार अपेक्षा घेऊन जाऊ नका! एकदा बघा... आणि सिनेमाचं वेडेपण एन्जॉय करा. मटरु की ‘बिजली का मंन्डोला’ एक राजकारणावर आधारीत कॉमेडी फिल्म आहे. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावलीय ‘गुलाबो’ नावाच्या एका म्हशीनं आणि दारूनं...

‘मटरू की बिजली का मन्डोला’ नक्कीच वेगळा आहे पण म्हणावा तितका प्रभावी तो ठरत नाही. काही काही ठिकाणी एक ‘रफ एन्ड टफ’ कॉमेडी मात्र यात पाहायला मिळेल. दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा गुणवत्तेत थोडा कमी पडतो, हे मात्र निश्चित.

जुन्या जमान्यातल्या स्टाईलमध्ये विशाल भारद्वाजनं मटरु, बिजली, मन्डोला आणि एक हटके गाव उभं केलंय. भरपूर ‘ढोसलेली’ लोकं, शिव्या आणि एका छोट्या गावावर आधारित या सिनेमाचं कथानक... पण, कलाकारांच्या झक्कास भूमिका मात्र या सिनेमाला थोडीफार बघण्यालायक बनवतो.

‘मटरू की बिजली का मन्डोला’ या सिनेमात सुरुवातीलाच हिरपूल ऊर्फ हॅरी मंन्डोला (पंकज कपूर) अत्यंत श्रीमंत पण नेहमी नशेच्या धुंदीत असणारा एक बिल्डर दिसतो. मटरु (इमरान खान) आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी मंन्डोला कुटुंबीयांच्या सेवेत रुजू होतो. हरियाणातल्या मंन्डोला नावाच्या एका छोट्या खेड्यात या सिनेमाचं कथानक फिरत राहतं. जिथं आपल्या व्यक्तीगत फायद्यासाठी राजकीय नेत्याच्या भूमिकेतली शबाना आझमी मन्डोलाशी हातमिळवणी करून गरिब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या विविध योजना आखताना दिसते.

भ्रष्ट राजकारणी शबाना उद्योगपती मन्डोला यांची मिलीभगत सुरू असते ती शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला विकण्यासाठी... पण, त्यांच्या योजना माऊ नावाचा एक व्यक्ती उद्ध्वस्त करतो. त्यानंतर समोर येतं ते एक हायप्रोफाईल लग्न.... त्यानंतर भरपूर गुंतागुंतीची एक प्रेमकहाणी आणि गुलाबो नावाची एक म्हैस...

पंकज कपूर आपल्या अभिनयातून सिनेमातील पहिल्या सिनपासूनच प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. दारुच्या आहारी गेलेल्या मंन्डोलाची व्यक्तीरेखा त्यानं उत्तमरित्या सादर केलीय. ‘बिजली’ अनुष्कानं सिनेमातील आपल्या नावाप्रमाणेच अभिनयाचीही बिजली सादर केलीय. हॉट अनुष्कानं आपल्या ‘बिजली’च्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय दिलाय. उत्तम संवादफेक आणि अभिनय यामुळे ती सतत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. पण, तिथंच ‘मटरु’च्या भूमिकेतला इमरान खान कमी पडतोय की काय, असं सारखं वाटत राहत. सिनेमात त्याचा प्रभाव फारसा दिसून येत नाही. शबाना आझमीनं मात्र एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका उत्तम पार पाडलीय. आपल्या व्यक्तिरेखेतून सिनेमा जिवंत ठेवलाय. पंकज कपूरसोबत चित्रीत झालेले काही सीन्स उस्त्फुर्त वाटतात.

First Published: Friday, January 11, 2013, 17:32


comments powered by Disqus