`मॅव-मॅव` ड्रग्जनं वाढवली पोलिसांची डोकेदुखी, MAV MAV DRUGS IN MUMBAI

`मॅव-मॅव` ड्रग्जनं वाढवली पोलिसांची डोकेदुखी

`मॅव-मॅव` ड्रग्जनं वाढवली पोलिसांची डोकेदुखी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत आता एका नव्या ड्रगने उच्छाद मांडलाय. `मॅव मॅव` असं या नव्या ड्रगचं नाव आहे. त्याची लोकप्रियता तुफान वाढलीय. त्याची उपलब्धताही सहज असल्यामुळे मुंबई अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची डोकेदुखी वाढलीय. त्यातच, कायद्यात प्रतिबंधक पदार्थ म्हणून `मॅव`चा समावेश नसल्यामुळे ते घेणाऱ्यांवर कारवाई काय करावी? असा प्रश्न पोलिसांना पडलाय.

मुंबईसह देशभरात अनेक रेव्हपार्ट्यात वापरल्या जाणाऱ्या ड्रग्जवर बंदी असल्यामुळे या पार्ट्यांना खीळ बसली. पण, आता अशा पार्ट्यांमध्ये `मॅव मॅव` नावाच्या एका नव्या ड्रगची भर पडलीय. या ड्रगवर भारतात बंदी नाही. त्यामुळे त्याच्या पार्ट्या जोरात होऊ लागल्या आहेत. कायद्यात या ड्रगची प्रतिबंधक द्रव्य म्हणून नोंद नसल्यामुळे पोलिसही संभ्रमात आहेत, असं सीनिअर पीआय राजेंद्र सांगळे यांनी म्हटलंय.

पूर्वी पार्ट्यांमध्ये कोकेन, एम्फेटामाईन्स ही ड्रग्ज घेतली जायची. त्यावर बंदी आली. त्याला पर्याय म्हणून आता मॅव मॅव बाजारात आलंय. औषधी भाषेत हे `मेफेड्रोन` म्हणूनही ओळखलं जातं. अवघ्या दीडशे रूपयात `मॅव मॅव` उपलब्ध आहे. किंमतीत कोकेनपेक्षा हे स्वस्त असलं तरी कोकेनपेक्षा जास्त नशा येते.
 
२००८ साली इस्राएलने, २०१० साली युरोपने या `मॅव-मॅव` ड्रग्सवर बंदी आणली होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात थेट बंदी नाही, पण तो नियंत्रित पदार्थ आहे. तर अमेरिकेत हे ड्रग नियंत्रित पदार्थ अधिनियमाखाली नियंत्रित औषध आहे.

भारतात मात्र याविषयी कोणतीही नोंद नाही. त्यामुळे बंदीही नाही. त्यामुळे ते सध्या सर्रास विकलं जातंय. अशा प्रकारच्या या ड्रगवर तातडीने बंदी आणण्याची गरज व्यक्त केली जातेय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 10:32


comments powered by Disqus