Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षे नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम म्हाडा करतंय. गेल्या आठ वर्षांपासून सायनच्या प्रतिक्षानगरात ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग बांधून तयार आहे. परंतु करोडो रूपये खर्च करून बांधलेली ही इमारत ओस पडून आहे.
हे वास्तव आहे सायनच्या प्रतिक्षानगरमधलं... म्हाडानं २००५ मध्ये टी-६४ नावाची तयार इमारत तुम्हाला दिसेल पण ती अजूनही रिकामीच आहे... आणि दुसऱ्या बाजुला बैठ्या चाळीतील कचरा, घाण, पडक्या इमारती, तिथं वाईट अवस्थेत राहणारे रहिवासी पाहिले तर तुम्हाला हे भयाण वास्तव उमजून येईल.
वर्षानुवर्षें बकाल अवस्थेत राहणाऱ्या रहिवाशांना प्रतिक्षा आहे ती चांगल्या घरांची... एकीकडे म्हाडानं ट्रान्झीट कॅम्पसाठी बांधलेल्या इमारतीतील सर्व ७५ फ्लॅटस गेल्या आठ वर्षांपासून रिकाम्या अवस्थेत पडून आहेत. तर दुसरीकडं बैठ्या चाळीत रहिवाशी अक्षरशः सडत आहेत. म्हाडाच्या या उफराट्या कारभारावर रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या, पण वापरात नसलेल्या टी-६४ इमारतीतल्या अनेक वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. कडी-कोयंडे, वायरिंग,लाईट बोर्ड अशा अनेक वस्तू गायब आहेत. तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर ‘शिर्के बिल्डर्स’चे कामगार तात्पुरत्या स्वरुपात इथं राहत आहेत. ही घरं सध्या बिडी, सिगारेट, दारू तसेच गर्दुल्यांच्या वापरासाठी ठेवलीय की काय? अशीही शंका तुम्हाला येऊ शकते. वापरात नसल्यानं अत्यंत जीर्ण झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
म्हाडाचे अधिकारी याविषयी बोलण्यास टाळाटाळ करतायत. गरजूंना तिथे न हलवता, तब्बल आठ वर्षे इमारत रिकामी ठेवण्यामागे म्हाडाचा नेमका उद्देश तरी काय आहे... हा प्रश्न या परिसरात राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांना पडलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 28, 2013, 20:01