गोडव्यानंतर राज ठाकरे यांचा मोदींबाबत `यू टर्न`, Narendra Modi on Raj Thackeray`s criticism

गोडव्यानंतर राज ठाकरे यांचा मोदींबाबत `यू टर्न`

गोडव्यानंतर राज ठाकरे यांचा मोदींबाबत `यू टर्न`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अगदी कालपरवापर्यंत नरेंद्र मोदींच्या कामाचे गोडवे गाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मोदीविरोधी `यू टर्न` घेतल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्यात. या `घूमजाव`मागचे नेमके कारण काय? एक विशेष रिपोर्ट.

राजकारणात कुणीही कुणाचा कधीच कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो... मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकेमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यंतर आलाय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदींना पाठिंबा नसल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर थेट हल्ला चढवलाय.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, मोदींनी गुजरातपुरतं मर्यादित राहून चालणार नाही असं वक्तव्य करत राज ठाकरेंनी मोदींवर थेट हल्ला केलाय. तसंच मुंबईत महागर्जना रॅली घेऊन त्यामध्ये गुजराती लोकांचे गोडवे कशासाठी गायले, असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख का केला नाही असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. तर महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.

नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीरही झालं नव्हतं, तेव्हापासून त्यांच्या विकासकामांचे गोडवे राज ठाकरे गात होते. ऑगस्ट २०११ मध्ये मोदींनी केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते आपल्या लवाजम्यासह गुजरात दौ-यावर गेले होते. अगदी सप्टेंबर २०११मध्ये मोदींच्या सद्भावना यात्रेलाही राज ठाकरेंची उपस्थिती होती. डिसेंबर २०१२ मध्ये मोदींनी मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक केल्यानंतर राज ठाकरे आवर्जुन शपथविधीला हजर होते.

परंतु आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोस्त दोस्त ना रहा, अशी परिस्थिती आहे. कायम मोदींचं गुणगान करणा-या राज ठाकरेंच्या `इंजिना`ने आता तोंड वळवलं असून, नाशिक मुक्कामी त्यांनी मोदींवरच हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी अचानक मोदीविरोधी घूमजाव करण्याची विविध कारणं आता पुढे येतायत... जेव्हा राज आणि मोदींची मैत्री घट्ट होती, तेव्हा शिवसेना नेतृत्व त्यावरून खट्टू होतं. अगदी `सामना`मधून मोदींवर अधुनमधून टीकेचे बाण सोडले जायचे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन आणि मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली.

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे आली. त्यावेळी मोदींनी केवळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे सांत्वन केले. पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतर ते जेव्हा जेव्हा मुंबईत आले, तेव्हा ते उद्धव ठाकरेंना भेटले. परंतु एकदाही त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली नाही. मोदींना सध्या पंतप्रधानपदाचे वेध लागले असल्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दुखावणं त्यांना महागात पडलं असतं. शिवसेनेकडे सध्या ११ खासदार आणि ४५आमदार आहेत. याउलट मनसेचा एकही खासदार नाही आणि केवळ १२ आमदार आहेत. त्यामुळं दिल्लीची गादी जिंकण्याचं स्वप्न साकारण्यासाठी मोदींनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं आणि राज ठाकरेंपासून ते अंतर ठेवू लागले. त्यामुळंच राज यांनी संधी मिळताच मोदींवर तोफ डागायला सुरूवात केलीय.

यापूर्वी उत्तर भारतीयांना टार्गेट करून मनसेने मराठी लोकांची मने आणि मते जिंकली. आता मोदींच्या रूपाने गुजराती लोकांची भलामन होऊ लागलीय.. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी मतं जिंकण्यासाठी गुजरातींना सॉफ्ट टार्गेट करण्याची व्यूहरचना कदाचित मनसेनं आखली असावी. राज ठाकरेंच्या मोदी विरोधाला ही राजकीय किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाहीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 18:34


comments powered by Disqus