Last Updated: Wednesday, September 26, 2012, 22:25
www.24taas.com, मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…
विजय पांढरेंनी एक अशी बाब उघड केलीय ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना राजीनामा द्यावा लागलंय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय आणि तो सहाजीकच आहे कारण अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्य सरकारलाच घरघर लागलीय. अजित पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बड नावं... राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांची पकड मजबूत आहे... आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत... राजकारणात आजपर्यंत त्यांनी अनेकांना शिंगावर घेण्यास मागेपुढे बघितलं नाही... पण अखेर अजित पवारांवरही मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आलीय आणि त्याला कारणीभूत ठरलेत मुख्य अभियंता विजय बळवंत पांढरे...
गेल्या काही दिवसांपासून या एकाच नावाची राज्यात चर्चा होतेय. कारण राज्याच्या राजकारणात या एका नावामुळे मोठी उलथापालथ झालीय. पांढरे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात जणू राजकीय वादळचं आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. राज्यात सुरु असलेल्या जलसिंचन प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत पांढरे यांनी आपल्या पत्रांच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांवर कारवाई काही झाली नाही. उलट त्यांना गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला. अधिकारी पातळीवर कोणीच दाद देत नसल्यामुळं पांढरेंनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता केली. पांढरेनी राज्यपालांना पत्र लिहून तक्रार केली. तसेच राज्यातील जलसिंचन प्रकल्पात सुरु असलेल्या अनागोंदीचा पाढाच त्यांनी वाचला. त्यामुळे जलसिंचन खात्यातील छुपा कारभार जगासमोर आला. प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण लावून घरल्यानंतर सरकारवर दबाव वाढत गेला आणि अखेर अजित पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे विजय पांढरे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेत.
काय होतं पांढरेंच्या अहवालात... गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पांच्या कामावर विजय पांढरे यानी शास्त्रशुद्ध अहवाल देत सर्वांवरच कोरडे ओढले. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या नेत्याना आता मात्र पांढरेच्या प्रत्येक शब्दाची भीती वाटू लागली. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराला विजय पांढरेंनी वाचा फोडल्यानंतर त्यांच्यावर आरोप होणार हे उघडच होतं. कारण त्यांनी वादळ अंगावार ओढावून घेतलं होतं. सरकारी नोकरीत राहून त्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीलाच आव्हान दिलं होतं. विशेष म्हणजे आघाडी सरकारमधील वजनदार नेत्याच्या कार्यशैलीवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांढरेवर आरोप होणं सहाजिकचं होतं. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी तर त्यांना थेट मनोरुग्ण ठरविण्यापर्यंत मजल मारली. जलसंपदा विभागाच्या विविध तांत्रिक सल्लागार समितीवर कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ आणि जबाबदार अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने टीका करण्यात आली होती. पण, त्या टीकेमुळे विजय पांढरे काही मागे डगमगले नाहीत. तसेच अध्यात्मात रुची असल्यामुळे त्यांनी आपला संयमही सोडला नाही. गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पांच्या कामाच्या दर्जाविषयी पांढरे यांनी सवाल उपस्थित केला. तसेच आपला हा दावा शास्त्रीय चाचण्यांवर आधारीत असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकीकडं विजय पांढरे यांनी शास्त्रशुद्ध अहवालाच्या आधारे आरोप केले आहेत तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याचा प्रतिवाद करतांना पांढरेंच्या प्रश्नांना उत्तर देण्यऐवजी विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पांढरे यांनी ज्या शास्त्रीय अहवालाचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे त्यावर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडं कोणतच उत्तर नाही. खुद्द अजित पवारांनीही राजीनाम्याची घोषणा करताना पांढरेंच्या आरोपाविषयी कोणताच खुलासा केला नाही हे विशेष.

एक नजर पांढरे यांच्या कारकिर्दीवर... विजय पांढरे या नावानं आपल्या सडेतोड आणि स्पष्ट बोलण्याने वादळ निर्माण केलंय. राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्वस्थता निर्माण करणारा हा अधिकारी प्रत्यक्षात मात्र अध्यात्माशी नात सांगणारा आणि पाण्याच्या थेंबा-थेंबावर प्रेम करणारा असाच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वावटळीनं उडवलेल्या धुरळ्यात एक व्यक्तीमत्व पुर्णपणे ठसठसशीत उठून दिसतोय आणि त्याचं नाव आहे... विजय बळवंत पांढरे... मेटाचे मुख्य अभियंता आणि तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय पांढरे यांच्या खळबळजनक पत्रामुळे ते चर्चेत आलेत. जलसंपदा विभागात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारावर घणाघात करुन त्यांनी राजकीय वादळ निर्माण केलं असलं तरी व्यक्तीगत जीवनात ते अत्यंत शांत मृदू आणि अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा पगडा हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि कारकिर्दीवरही पडल्याचं तुम्हाला पहायला मिळेल. १९८० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरळसेवा भरतीद्वारे पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर पांढरेनी आपल्या करीअरला सुरुवात केली. १९९० मध्ये जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता पदावर त्याना बढती मिळाली. पांढरेनी केलेल्या वेगवेगळ्या जलसिंचनविषयक प्रकल्पाच्या उल्लेखनिय कामाची दखल घेत २००३मध्ये महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात मेरीत अधिक्षक अभियंता या पदावर त्यांना बढती मिळाली. सप्टेंबर २०११ पासून मेरीचे मुख्य अभियंता म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यातील धरणांचा अभ्यास करताना विजय पांढरे यानी विशेष रुची दाखवत सर्वेक्षण, नियोजन, बांधणी, डिझाईन, दर्जा नियंत्रण, संशोधन, चाचणी अशा सर्वच पातळीवर त्यानी अभ्यासपूर्ण कामगिरी केलीय. पांढरे याच्या कामाच्या धडाक्यामुळेच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीवरही नियुक्ती करण्यात आली. जलसंपदा खात्यातील अनागोंदीवरुन पांढरे यांनी वादळ निर्माण केलं असलं तरी त्यांना आध्यात्माती गोडी आहे. रुक्ष सरकारी काम करत असतानाही पांढरेनी आध्यात्मिकतेचाही पिंड जपलाय हे विशेष. विजय पांढरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव आणि चांगदेव पासष्ठीला स्वानुभावाची सांगड घालत आजच्या मराठी भाषेत ओव्याची रचना केली. पांढरेंची ही कारकिर्द बघितल्यानंतर त्यांना मनोरुग्ण ठरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न किती बालीश होता, हे कुणाच्याही लक्षात येईल.

पाठिशी उभं राहिलंय गाव... विजय पांढरे.. क्लास वन अधिकारी... तरीही पदाशी आणि कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या सरकारी कार्यालयातला शिस्तीचा खाक्या दाखवत भल्याभल्यांची झोप उडवलीय. पण पांढरेच्या या प्रवासाला साधेपणाची किनार आहे. सरकारी खात्यातील बडा अधिकारी म्हटलं की कुबेराची श्रीमंती आठवते. पण विजय पांढरेंनी या सगळ्यापासून स्वत:ला दूर ठेवलंय. तसंच आपल्या कुटुंबालाही त्यांनी हिच शिकवण दिलीय. पांढरेंचं कुटुंब आजही बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावात राहातंय. शेती हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. त्याचं गावातील घर हे अत्यंत साधं आहे. पांढरे यांना विशाल आणि अभिषेक ही दोन मुलं असून त्यांच शिक्षण जेमतेम १०वी पर्यंत झालं आहे. उच्च शिक्षण न घेतल्याबद्दल त्यांना कोणतीच खंत नाही. जीवनाला आध्यात्माची जोड देवून जीवन जगलं पाहिजे असा पांढरे यांचा आग्रह असून त्यांच्या मुलांनीही तोच मार्ग निवडला आहे. विजय पांढरेंनी जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराला वाचा फोडली आणि त्यामुळे राजकीय भूकंप आला. आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर मुलाला अभिमान आहे. पांढरेंना मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला खरा पण त्याचे पडसाद पांढरेंच्या गावी उमटलेत. गावक-यांना विजय पांढरेंच्या कामाचा अभिमान असून सगळ गाव त्यांच्या पाठीशी उभ राहिलंय. तसेच पांढरे यांच्यावर आऱोप करणा-या मंत्र्यांचा गावक-यांनी निषेध केलाय.
First Published: Wednesday, September 26, 2012, 22:22