www.24taas.com, मुंबईभारतीय चित्रपट म्हणजे जणू आपलं जीवनच, आपला श्वास म्हणजे चित्रपट... दादासाहेब फाळके या मराठी माणसानं 1913 साली राजा हरिश्चंद्र चित्रपटाव्दारे रुपेरी पडदा उजळवून टाकला... या प्रवासाला शंभर वर्ष होताहेत...आणि या शंभर वर्षात चित्रपट म्हणजे फाळकेंच नाही तर प्रत्येक सर्वसामान्यांच स्वप्न झालं.. आणि समोर दिसणारा रुपेरी पडदा म्हणजे आपलं आयुष्य बनलं..
अध्यात्म म्हणजे आपल्या भारतीय जीवनाचा पाया.. आपल्या नसानसांमध्ये वाहणारा धर्म म्हणजे आपल्या समाजाचा प्राणवायू..त्यामुळं राजा हरिश्चंद्रच्या रुपानं 1913 साली रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा अवतरल्या त्या आपल्या देव देवता आणि संस्कृती..आपली मूल्य.. जीवननिष्टा.. सगळं सगळं काही चित्रपटांव्दारे दिसायला लागलं.. हजारो वर्षांची आपली परंपरा अनेक परकीय आक्रमणांमधून आपण जीवंत ठेवली आणि सुरवातीच्या काळातल्या चित्रपटांव्दारे ती पडद्यावर आली. सुरवातीला मूक असलेला चित्रपट पुढे बोलू चालू लागला... आलमआराच्या रुपानं....१९३१मध्ये आलम आरा रुपेरी पडद्यावर झळकला... त्यानंतर पुढे चित्रपट गाऊ लागला आणि चित्रपट म्हणजे जणू आपल्या मर्मबंधातली ठेव बनली... सुरवातीला कृष्मधवल असलेला चित्रपट मग रंगीत बनला आणि भावभावनाचं इंद्रधनुष्यच आपल्यासमोर खुलं झाल..
आपला समाज जसा बदलत गेला तस तसा आपले चित्रपटही बदलत गेले... समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात उमटत गेलं तसचं समाजाला दिशा देण्याचं कामही चित्रपटांनी केलं... चित्रपटांनी आपल्याला काय शिकवलं नाही ? आईची माया...भावाबहिणीचं प्रेम... आयुष्यात येणा-या संकटांवर मात करण्याची जिद्द... असत्यावर सत्यानं.. वाईपणावर चांगूलपणानं केलेली मात.. मानवी आयुष्याचं भावभावनाचं इंद्रधनुष्य... आपल्या आयुष्यातला चांगल्या आणि वाईट प्रवृती चित्रपटांमध्ये दिसल्या... अन्यायाविरुद्ध लढणा-याला अखेर न्याय मिळतो हा विश्वास जागा ठेवला तो आपल्या चित्रपटांनी.. चित्रपट संपायच्या आत खलनायकाचा अंत होत न्यायासाठी लढणारा विजयी होणारा नायक म्हणजे जणू आपणच होतो... चित्रपटांनी आपल्या जीवनातले हळवे क्षण टिपले...आशा निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावणारे आपले आयुष्य रुपेरी पडद्यावर साकारतांना आपण रंगून गेलो. प्रेम करायला शिकवलं ते चित्रपटांनी...आयुष्यातल्या आनंदी क्षणी आपल्या ओठांवर चित्रपटांमधली गाणी येतात... . पुरती शंभर वर्ष... चित्रपटांनी आपल्या समाजातला चांगलूपणा जपला... स्त्री शक्तीची जाणिव करुन दिली.. स्त्रीयांचा सन्मान करायला शिकवला.. आपल्या परंपरेनं दिलेला स्त्री म्हणजे देवी हा संस्कार आधुनिक काळात जिवंत ठेवला तो आपल्या चित्रपटांनी.... जातीव्यवस्थेच्या पलीकडे जात मानवतेवर प्रेम करायला शिकवलं ते रुपेरी पडद्यानचं.. काळ बदलला समाज बदलला पण चित्रपट म्हणजे आपलं जीवनं हे समीकरण कायम राहिलं...3 मे 1913 ते 3 मे 2013 पर्यंत... तब्बल शंभर वर्ष...
राजा हरिश्चंद्रने भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली..आणि बघता बघता सिनेमाने सिनेरसिकांच्या जीवनाचा भाग बनला.. ब्लॅक व्हाईटच्या जमान्यातल्या त्या सुपरस्टार कलावंतानी प्रेक्षकांना स्वप्न वाटली ती मात्र रंगीत आणि मखमली.. त्या काळी सिनेमाची गाणी , संवाद सिनेरसिकांच्या ओठी रुळले आणि आजही त्या ओळी आपण गुणगुणतोय तो वैभवशाली वारसा जपत...
आलम आरा प्रदर्शित झाला आणि मुका असलेल्या भारतीय सिनेमाला वाचा आली..सिनेमातील संवाद हे सिनेरसिकांच्या ओठी रुळण्यास सुरुवात झाली आणि आजही तो सिलसिला कायम आहे...प्रेक्षकांना भावना-या संवादावर थियटरमध्ये हमखास शिट्या आणि टाळ्या पडणार ...
पुढच्या काळात काही अभिनेत्यासाठी खास संवाद लिहिले जाऊ लागले... चाळीस ते साठ ही दोन दशकं म्हणजे भारतीय सिनेमाचा सुवर्ण युगच म्हणावा लागेल...तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता...देशप्रेमाबरोबरच सिनेमातून प्रेमकथाही पडद्यावर साकारल्या गेल्या..१९४८मध्ये आर.के बॅनरची स्थापना झाली...आवारा, श्री४२० मधून कष्टकरी समाजाचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर उमटलं...राजकपूर आणि नर्गिंस या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली...
१९५७ साली गुरु दत्त यांचा प्यासा आला.... गुरु दत्त यांनी प्यासामधून शहरी जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता..याच काळात हिंदी सिनेमातील काही कलाकृतींची निर्मिती झाली... मेहबुब खान यांचा मदर इंडिया याच वर्षी रुपेरी पडद्यावर झळकला. या सिनेमाने भारतीय सिनेरसिकांच्या मनावरमोहिनी घातली होती..त्यावर्षी सर्वाधिक चाललेल्या सिनेमांपैकी मदर इंडिया हा एक होता. १९५३साली बिमल रॉय यांचा अशयपूर्ण दो बिघा जमिन आला. साठच्या दशकाच्या सुरुवातीला के असीफ यांचा मुगल-ए - आजम हा सिनेमा आला. मुगल ए आजमचे संवाद तर सिनेरसिकांच्या ओठावर रुळले होते... बॉलीवूडचा एव्हरग्रीन हिरो देव आनंद यांचा वेगळ चाहता वर्ग होता..त्यांच वेगळ स्टाईल स्टेटमेंट होतं..तसेच त्यांच्या संवादाची शैली काही वेगळीच होती.. तो काळ राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद,गुरुदत्त यांचा होता.
यानंतर आलं साठचे दशक.. तरल प्रेम आणि निरागस भावनाना जिवतं केल ते निर्जीव पडद्यानं... साठच्या दशकात राजकपूर, गुरुदत्त, देव आनंद , दिलीपकुमार, राजकुमार यांचा दबदबा होता..या प्रत्येकाची संवादाची आपली वेगळी शैली होती... आणि या संवादाचे कडक डायलॉग झाले जेव्हा पडद्यावर आला बच्चन. साठच्या दशकात राजकपूर, राजकुमार, देव आनंद, दिलीप कुमार या अभिनेत्याचा दबदबा होता. १९६० साली राज कपूरचा संगम प्रदर्शित झाला. राज कपूर यांचा जसा एक चाहता वर्ग होता तसाच अभिनेता राजकुमार यांचाही फॅन फॉलोअर होता..त्यांची संवादाची खास शैली होती. हिंदी सिनेसृष्टीवर राजकपूर, राजकुमार, देव आनंद, दिलीप कुमार या अभिनेत्याचा दबदबा होता त्याच काळात पिळदार शरीरयष्टी असलेल्या धर्मेंद्रने आपला ठसा उमटवला होता..आणि याचवेळी राजेश खन्नाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली. हिंदी सिनेसृष्टीतला पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या रुपाने उदयास आला..राजेश खन्ना म्हणजे सिनेमा हिट हे जणू समिकरणाचं बनलं होतं.
हा सुपर स्टार तमाम महिला वर्गाच्या गळ्यातला ताईत बनला.. राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होता..पण सत्तरच्या दशकात चित्र हळूहळू बदलत गेलं....कारण याच काळात अँन एन्ग्री मॅन अमिताभ बच्चनने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली...अमिताभ एकप्रकारे सर्वसामान्यांचा आवाज बनला.. अमिताभचा अभिनय आणि त्याची संवाद फेक सिनेरसिकांना प्रचंड भावली.
शोलेने तर सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला. सलीम -जावेद आणि अमिताभ हा फॉ़र्म्यूला सुपर हीट ठरला..त्यांचे चित्रपट एकापाठोपाठएक हीट होत होते. अमिताभच्या सिनेमातून तत्कालीन समाज व्यवस्थेचं प्रतिबिंब उमटलं...आणि प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशा डोक्यावर घेतलं..अमिताभ या नावाने सिनेसृष्टी व्यापून टाकली होती.
सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चनच्या रुपाने अँग्री यंग मॅन सिनेसृष्टीला मिळाला...पुढे ८०च्या दशकात तोच सिलसिला कामय राहिला....मात्र पंचाऐशी ते नव्वदच्या दशकात हिंदी सिनेमानं जणू आपलं रुपडंच बदललं...एक्शनपटाची जागा हळुवार, तरल प्रेमकथांनी घेतली. या काळात अनेक लव्हस्टोरीज बॉक्स ऑफिसवर झळकल्या आणि तरुणाईला आपल्याकडे आकर्षित केलं.
८०च्या दशकात बिग बी अमिताभचा शहेनशाह, विनोद खन्ना, माधुरी दीक्षितचा दयावान बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचत असतानाच एका नवख्या कलाकाराच्या लव्हस्टोरीनं अवघ्या तरुणाईला आपली दखल घ्यायला भाग पाडलं... आमीर खानचा कयामतसे कयामत तक...बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि जणू सिनेसृष्टीत लव्हस्टोरीचा जमान सुरू झाला...यातल्या गाण्यांनी तर तरुणाईला अक्षरशः वेड लावलं. पण त्याचबरोबर सिनेमातल्या डायलॉगचीही तरुणाईला भुरळ पडली होती....
आमीर खाननंतर आणखी एका खानने सिनेसृष्टीत दणक्यात पदार्पण केलं. १९८९ मध्ये सलमान खानच्या मैने प्यार कियाने बॉक्स ऑफिसवर दस्तक दिली. आणि सलमान भाग्यश्रीच्या या पहिल्याच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर यश मिळवलं. या लव्हस्टोरीतली गाणी आणि डायलॉगवर तरुणाई अक्षरशः फिदा झाली होती..आजही आहे... १९९२ मध्ये आमीर खानने कॉलेजियन्सना जणू वेड लावलं. जो जिता वही सिकंदर...या सिनेमाच्या आगमनाने आख्खी तरुणाई जणू आमीर खानच्या अभिनयावर फिदा झाली...
१९९३ मध्ये आमीर, सलमाननंतर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा डर बॉक्स ऑफिसवर झळकला आणि खलनायकाची भूमिका साकारणारा शाहरूख तरुणाईसाठी मात्र हिरो ठरला...डरमधल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलंच, पण त्याचबरोबर भेदक आणि वेगळ्या शैलीच्या डायलॉगबाजीमुळे शाहरुखने आपला हक्काचा लाईफटाईम प्रेक्षक मिळवला, असं म्हणायला हरकत नाही...
याच दरम्यान, किंग खान शाहरुखचा बाजीगरही बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला...एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या या दोन्ही सिनेमांमुळे आमीर आणि शाहरुख जणू आमने-सामने उभे ठाकल्याचं चित्र पहायला मिळालं....
१९९४ मध्ये हम आपके है कौन म्हणत सलमान खानने माधुरी दीक्षितबरोबर आणखी एका सुपरहिट लव्हस्टोरीची प्रेक्षकांना मेजवानी दिली. धकधक गर्लची हटके अदा आणि जोडीला सुरज बडजात्या यांची नेहमीची सुपरहिट स्टारकास्ट...या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली तर केलीच ...पण त्याचबरोबर या सिनेमाची मोहिनी आजही प्रेक्षकांवर तितकीच आहे...
१९९५ मध्ये शाहरुखने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणत काजोलसोबत एक बहारदार लव्हस्टोरी पडद्यावर साकारली. यातल्या सुपरहिट गाण्यांबरोबरच यात जोडी जमली ती अनुभवी अमरिश पुरी विरूद्ध शाहरुख खान यांच्यातल्या अभिनयाची...दिलवालेमध्ये रंगलेली डायलॉगची जुगलबंदी भलतीच हिट अँन्ड हॉट ठरली...
आमीर, सलमान शाहरूख यांच्याबरोबरीनेच ९० च्या दशकात इंडस्ट्री गाजवली ती आणखी एका कलाकाराने...नाना पाटेकर...१९८९ च्या सलाम बॉम्बे नंतर नानाने काही हटके सिनेमे दिले...१९९२ चा राजू बन गया जंटलमन असेल किंवा १९९६ चा खामोशी असेल..नेहमी अंगारे घेऊन लढणा-या नानाने या सिनेमातून एका तरल अभिनयाची दाखवलेली झलक प्रेक्षकांना भलतीच भावली...पण नानाने आपल्या अभिनयाने गाजवला तो क्रांतीवीर...
परिंदा, प्रहार, तिरंगा या सिनेमांनंतर नानाची क्रांतीवीरमधली भूमिका आणि त्यातले अस्सल नानागिरी दाखविणारे डायलॉग...यामुळे हा क्रांतीवीर आजही प्रेक्षकांच्या मनावर गारूड करून आहे.....
एकूणच नव्वदच्या दशकात तरल, साध्या आणि सरळ अभिनयानं रंगलेल्या लव्हस्टोरीजनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवलं..
2001 नंतर बॉलिवूडच्या सिनेमानं ग्लोबल भरारी घेतली...अनेक हिंदी सिनेमांनी भारताबरोबरच परदेशातल्या प्रेक्षकांनाही आकर्षित करण्यात यश मिळवलं...साधी सरळ कहाणी असूनही आमीर खानच्या लगानने तर ऑस्करभरारी घेत अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं...
२००१ मध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचा म्हणजेच आमीर खानचा लगान बॉक्स ऑफिसवर थडकला आणि पहिल्याच दणक्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. कलाकारांचा कसदार अभिनय आणि जोडीला आमीर खानचा हटके प्रमोशन फंडा.. यामुळे लगानने देशभरात तर यश मिळवलंच पण त्याचबरोबर थेट ऑस्करभरारी घेत अवघ्या हॉलिवूडलाही आपली दखल घ्यायला भाग पाडलं...
२००२ मध्ये शाहरुख खानच्या देवदासने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. जॅकी श्राफ, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय अशी बडी स्टारकास्ट असल्याने आणि आकर्षक आणि खर्चिक सेट उभारल्याने सिनेमाची श्रीमंती उठून दिसली...देवदासला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी नामांकन मिळालं होतं.
२००६ मध्ये आमीर खानच्या रंग दे बसंतीमध्ये प्रेक्षकांना एक वेगळा प्रयोग पहायला मिळाला. आमीर खानबरोबरच काजोलचा दमदार अभिनय यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरलाच, पण त्याचबरोबर बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म म्हणूनही नामांकन मिळालं...
२००६ मध्येच लगे रहो मुन्नाभाईने बॉक्स ऑफिसवर एन्ट्री घेतली. संजुबाबाची ही गांधीगिरी प्रेक्षकांना चांगलीच भावली...विशेषतः गांधीगिरीतून केलेली ही खास बंबैया स्टाईल भाईगिरी मुन्नाभाईला एक अनोखं यश मिळवून देणारी ठरली...
२००६ मध्येच क्रिशच्या रुपानं हिंदी सिनेमाला ब-याच कालावधीनंतर एक वेगळं टेकनिक पहायला मिळालं. ऋतिक रोशनने आपल्या कसदार अभिनयाने या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं...
२००८ मध्ये आमीर खानने पुन्हा एकदा एक नवा प्रयोग करत एक आगळावेगळा गजनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला...आमीरचा हटके प्रमोशन फंडा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा वापर करत देशभरातीलच नव्हे तर परदेशातीलही प्रेक्षकांना गजनीने खिळवून ठेवलं...
जो जीता वही सिकंदरची आठवण करून देणारा थ्री इडियट्स २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि आमीर खान पुन्हा एकदा कॉलेजियन्सच्या गळ्यातला ताईत बनला...
२०१० मध्ये बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान बॉक्स ऑफिसवर नव्या दमाने आणि नव्या जोमाने दाखल झाला आणि सल्लुमियाच्या या दबंगिरीने कमाईचे अनेक विक्रम स्थापित केले. आधुनिक तंत्रज्ञान, थोडासा मसाला आणि दर्दी रसिकांना संगीताच्या तालावर ठेका धरायला लावणारी गाणी...अशा समीकरणामुळे सलमानची ही दबंगगिरी बॉक्स ऑफिसवर चांगलीच हिट ठरली...
गँग ऑफ वासेपुरने हिंदी सिनेमाला एक वेगळा आयाम दिला...दोन-अडीच तासात सिनेमा संपवण्याच्या स्पर्धेत गँग ऑफ वासेपूरने मात्र तब्बल पाच तासांचा सिनेमा बनवत प्रेक्षकांना यशस्वीपणे खिळवूनही ठेवलं...कान्स फेस्टिव्हलमध्ये याची खास दखल घेण्यात आली....
एकूणच बदलतं तंत्रज्ञान, बदलते विषय आणि वाढत्या बजेटबरोबरच नवनव्या प्रयोगांसह हिंदी सिनेमा आगामी काळातही यशाची आणखी शिखरं पादाक्रांत करेल आणि हॉलिवूडसह जगभरातील प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवेल, अशी आशा करूयात.....
First Published: Friday, May 3, 2013, 23:57