Last Updated: Saturday, November 3, 2012, 17:29
www.24taas.com, मुंबईअलिकडे रोजच का उडू लागलाय आरोपांचा धुरळा ?
निव्वळ प्रसिद्धीसाठी झडतायत का आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ?
आरोपांच्या स्पर्धेत कोणी मिळवलीय आघाडी ?
दिवाळीआधी शिमगा दिवाळी तोंडावर आलीय...सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस वाढत्या महागाईत सण कसा साजरा करावा या विवंचनेत पडलाय..तर दुस-या बाजूला देशभरात राजकीय नेत्यांचा मात्र दिवाळीआधीच शिमगा सुरु झालाय...रोज कुणीतरी कुणावर तरी काहीतरी आरोप करतोय...हा आरोप- प्रत्यारोपांचा गदारोळ पहाताना सर्वसामान्यांची मात्र चांगलीच करमणूक होतेय.. एकीकडं आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगला असतांनाच आरोपांची पातळीही घसरत चाललीय.. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्यात असाच सामना रंगल्याचं पहायला मिळतंय...त्यामुळे आपलं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय असा प्रश्न जनतेला पडलाय... निवडणुका कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जातेय...महत्वाकांक्षेला धुमारे फुटू लागलेय..शह कटशहाचं राजकारण खेळलं जाऊ लागलंय..त्यातूनच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत...आपलं आस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे...
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर य़ांच्यात कलगीतुरा रंगला होता...एकमेकांवर कडी करण्याच्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे...पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या मंत्रीमंडळात बदल केला आणि शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद मिळालं...इकडं थरुर यांनी मंत्रीपद स्विकारलं आणि तिकडं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शशी थरुर यांच्याच्या वैयक्तीक आयुष्यावरच तोफ डागली... गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा तो वाकबाण शशी थरुर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता...कारण मोदींनी थेट थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्यावरचं निशाना लगावला होता.. नरेंद्र मोदींनी केलेल्य़ा टीकेला शशी थरुर यांनी त्याच शब्दात उत्तर दिलं.. आरोपप्रत्यारोपांचा हा सामना इथंच थाबला नाही..नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी शशी थरुर यांना पुन्हा लक्ष्य केलं...पुढे या नेत्यांच्या भाषेचा स्तर आणखीणच खालावत गेला ...
भाजप नेत्यांनी शशी थरुर यांना लक्ष्य केल्यानंतर थरुर यांचे सहकारी मंत्री त्यांच्या मदतीला धावले.. राजकारणात सगळं काही क्षम्य असतं असं म्हटलं जातं खरं पण वैयक्तीक पातळीवर टीका करण्यासही नेते आता मागे पुढे पहात नाहीत...या राजकीय शिमग्यात सर्वात आघाडीवर आहेत इंडिया अगेंस्ट करप्शनचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ...त्यांनी तर आरोपांची मालिकाच सुरु केलीय...दर आठवड्याला नवा सिनेमा रिलीज व्हावा त्याप्रमाणे ते पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा अक्षरशः रतीब घालीत आहेत..धूळवड संपून आज आठ महिने उलटून गेले तरी राजकीय धुळवड मात्र सुरु आहे..आरोप प्रत्यारोपांच्या धुळवडीत आयएसीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सर्वात आघाडीवर आहेत...दर आठड्याला एक पत्रकार परिषद आणि आरोप असा धडाकाच त्यांनी लावलाय...

बड्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक आरोप करुन जनतेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केजरीवालांकडून केला जातोय... केजरीवाल सुरुवातील टीम अण्णांचे सदस्य होते पुढे त्यांनी राजकारणात उतरण्याचा इरादा जाहिर करत आपला सवता सुभा तयार केला...आपल्या येवू घातलेल्या राजकीय पक्षासाठी त्यांनी आरोपास्त्राचा मोठ्या खुबीने वापर केला...दर आठवड्याला जसे नव नवे सिनेमे प्रदर्शीत होतात तसाच धडाका केजरीवालांनी लावाय...गेल्या काही दिवसात केजरीवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांवर नजर टाकल्यास आरोप करण्यात आपण कसे आघाडीवर आहोत हेच दाखविण्य़ाचा प्रयत्न जणू केजरीवाल करत आहेत...केजरीवाल यांनी सुरुवात केली ती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यापासून...वढेरा यांनी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधीची संपत्ती जमवल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.. वढेरांवरच्या आरोपांची शाहनिशाह होण्यापूर्वीच
केजरीवालांनी दुसरा वाकबाण सोडला तो केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या दिशेनं ... केजरीवाल विरुद्ध खुर्शिद असा सामना रंगला असतांनाच केजरीवाल यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात आघाडी उघडली... एकाच वेळी अनेक नेत्यांवर आरोप करुन केजरीवालांनी आरोप करण्यातही आघाडी घेतली होती.. इतर कोणी आरोप करुन लक्ष आपल्याकडं वळवून घेईल अशी जणू भीतीच केजरीवालांना वाटत होती...आणि त्यामुळेच ते एकापाठोपाठ एक आरोप करत होते...केजरीवाल यांच्या आरोपांच्या मालिकेत उद्योगपती मुकेश अंबानींचाही नंबर लागला... केंद्र सरकार अंबानी चालवतायत असल्याचा आरोप करुन केजरीवालांनी खळबळ उडवून दिली खरी पण त्यातून काय साधलं याचं उत्तर मात्र कोणाकडंच नाही... देशात जणू आरोपांचा सुळसुळाट झालायं ..जो उठतो तो आरोप करतो...त्यामुळे नेमकी खरी बाजू कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय...
या आरोपांच्या जुगलबंदीत जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्याम स्वामी मागे नाहीत...एकीकडं केजरीवाल आरोपांच्या फैरी झाडत असतांना सुब्रमण्यम स्वामींनीही एक बॉम्बगोळा टाकलाय.. आरोप करण्यात जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी काही मागे नाहीत...या आगोदर त्यांनी काँग्रेस नेत्यांवर शरसंधना केलं होतं ..पण या वेळी त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी आणि राहूल गांधी यांच्यावर आरोपांची तोफ डागलीय..खरंतर सुब्रमाण्याम स्वामी आरोपांसाठी प्रसिद्ध आहेत...सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी द असोसिएट जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून संपत्ती जमवल्याचा आरोप स्वामी यांनी केलाय.. सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यावर आरोप करुन सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले...
ठरावीक अंतराने पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यासाठी स्वामी प्रसिद्ध आहेत..दिल्लीत एकापाठोपाठ एक आरोपांची मालिका सुरु करुन केजरीवाल यांनी लक्ष्य वेधून घेतलं होतं...यापार्श्वभूमीवर स्वामी तरी या स्पर्धोत मागे कसे राहणार ...केजरीवालांनी सोनीया गांधींचे जावाई रॉबर्ट वढेरा यांना लक्ष्य केलं होतं तर स्वामी यांनी थेट सोनीया गांधी आणि राहूल गांधी या मायलेकरांनाच लक्ष्य केलं... स्वामी यांनी केलेल्या आरोपांच काँग्रेसने खंडण केलंय...तसेच स्वामी हे व्यक्तीमत्व म्हणजे एक आश्चर्य असल्याचं प्रतिउत्तर काँग्रेसकडून देण्यात आलंय....पण स्वामी अशा टिकेला बधणा-यांपैकी नाहीत आणि याची जाणीव काँग्रेस नेत्यांनाही आहे...गेल्या काही महिन्यात सुब्रमण्य़ाम स्वामी असो की अरविंद केजरीवाल.. किवा दिग्विजय सिंग असो की किरीट सोमय्या ...या सगळ्यांमध्ये आरोप करण्याची जणू स्पर्धाच लागलीय...त्याच्या या आरोप मालिकेमुळे राजकारण कोणत्या दिशेला चाललय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही..
First Published: Friday, November 2, 2012, 23:56