कुठलंही असो वय... बलात्काऱ्यांचं भय!, Rapists from 17 years old to 70 years old

कुठलंही असो वय... बलात्काऱ्यांचं भय!

कुठलंही असो वय... बलात्काऱ्यांचं भय!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिल्ली गँगरेप असो, नाहीतर मुंबईच्या शक्ती मिलमधील गँगरेप... वाममार्गाला लागलेल्या 17 वर्षांपेक्षा लहान मुलांनी बलात्कार करण्याच्या घटना वाढत आहेत. पण आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आसाराम बापूंसारख्या सुसंस्कारी, आध्यात्मिक बाबांवरही बलात्काराचे आरोप होतायत.. या विरोधाभासाचा काय अर्थ लावायचा?

देशभरात 400 हून अधिक आश्रम... त्यापैकी अनेक आश्रमांमध्ये गुरूकुले... 2 कोटींहून अधिक भक्त सांप्रदाय... आणि जवळपास 5 हजार कोटी रूपयांचे साम्राज्य... ही आहे आसाराम बापूंची आजची ओळख... कधीकाळी वयाच्या 15 व्या वर्षी लग्नाच्या आधी घरातून पळून गेलेला आसूमल आता आसाराम बापू बनलाय... 20 व्या वर्षापासून भक्तीमार्गाला लागलेला हे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आता 72 वर्षांचे बापू झालेत... देशातील करोडो भाविकांचे आणि अनेक राजकीय नेत्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या बापूंची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरलीय.

गेल्या 15 ऑगस्ट रोजी राजस्थानातील जोधपूर इथल्या आश्रमात आसाराम बापूंनी एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आलाय. बापूंचा भक्त असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीला संस्कारी बनवण्यासाठी गुरूकुलात धाडले होते. पण तिथं आसाराम बापूंच्याच वासनेची ती शिकार झाली. 20 ऑगस्ट रोजी या मुलीच्या वडिलांनी दिल्लीतील करमाळा मार्केट पोलीस ठाण्यात बापूंविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पण ही घटना राजस्थानच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण राजस्थान पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. राजस्थान पोलिसांनी आसाराम बापूंच्या इंदोर येथील आश्रमात जाऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली. बापूंची तब्येत ठीक नसल्याचे त्यांचे पुत्र नारायण साई यांनी सांगितलं. पोलीस चौकशीसाठी टाळाटाळ करण्याचा खटाटोप त्यामागे होता. बलात्कारासारखा गुन्हा बापू या वयात कसा करणार, असे सवालही उपस्थित करण्यात आले. मात्र अखेर शनिवारी रात्री पोलिसांनी बापूंना त्यांच्या आश्रमातून ताब्यात घेतले.

एकीकडे अशिक्षित, वाममार्गाला लागलेले अल्पवयीन तरूण बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करतायत. त्यांना कोणतीही कडक शिक्षा होत नाही. तर दुसरीकडे 72 वर्षीय आसाराम बापूंसारखे संस्कारी, आध्यात्मिक गुरूही वासनेच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुलींचं शोषण करतायत... त्यांनाही आता कठोरात कठोर शासन व्हायला हवे. पण या केसमध्ये पीडित मुलीने तक्रार नोंदवताना बलात्कार हा शब्द वापरला नसल्याचे समजते. तसे असेल तर बापूंना स्वतःवरील बालंट दूर करण्यासाठी आयतीच कायदेशीर पळवाट मिळणार आहे...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 21:19


comments powered by Disqus