लाल दहशतवाद Red Terrorism

लाल दहशतवाद

लाल दहशतवाद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

छत्तीसगढमधील २५ मेच्या हल्ल्यानं केवळ सरकारच नाही तर सर्वसामान्यही हादरुन गेलाय. हजार पेक्षा जास्त नक्षलवादीनी परिवर्तन यात्रेला टार्गेट केलं. आदिवासीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच जण सरसावले असताना नक्षलवाद्यांना मात्र हे नकोय का हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय..

घनदाट जंगलातला तो घाटवळणाचा रस्ता निरपराध लोकांच्या रक्तानी पुरता माखला होता. नक्षलवाद्यांचे ते हिस्त्र कृत्य पाहून सगळा देश हादरुन गेला. आतंकवाद्यांच्या या लाल ब्रिगेडमध्ये सुमारे १००० नक्षलवादी सामील झाले होते. छत्तीसगढमधील सुकुमाच्या जंगलात दबा धरुन बसलेले नक्षलवादी निरपरांना ठार मारायचच यासाठी लपून बसले होते. पण कसा झाला हा देशातला सगळ्य़ात मोठा नक्षलवादी हल्ला.. एवढा मोठा नरसंहार करण्यासाठी कसा आणि कोणी रचली ही खतरनाक योजना..
२५ मेला कॉंग्रेसची परिवर्तन यात्रा जेव्हा या जंगलमार्गातून जायला सुरुवात झाली तेव्हा झाडाआड लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी रॅलीतल्या निरपरांधावर हल्ला चढवला. रॅलीच्या वाटेत झाड तोडून नक्षलवाद्यांनी मार्ग रोखला. त्यानंतर रॅलीमध्ये सुरुवातीला उभ्या असलेल्या दोन गाड्या उडवून देण्यात आल्या. काही तरी अघटीत घडतय हे सुरक्षारक्षकांना कळण्याच्या आत चहुबाजूनी सुरु झाला अंदाधुंद गोळीबार

अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानंतर त्याठिकाणी हलकल्लोळ माजला होता. चहूबाजुने हल्ला होत होता. लोक जीव वाचवण्यासाठी याचना करत होते. पण नक्षलवाद्यांनी फक्त रक्ताचा सडा पाडला होता. नक्षलवाद्यांना कुणालाच जिवंत सोडायचं नव्हतं की कुणाचं काही एकायचं नव्हत. जेव्हा सुरक्षारक्षकांनी फायरिंग थांबवली तेव्हा नक्षलवाद्यांनी रॅलीतील वाहनांधून प्रत्येकाला बाहेर काढून त्यांना गोळ्या झाडल्या.

नक्षलवाद्यांच्या आतकाची ही काही पहिलीची कहाणी नाही आहे. गेल्या वर्षीही या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ७६ जवानांना मृत्यूमुखी पाडलं होतं. काय आहे हे नक्क्षल आंदोलन .. नक्षलवाद्यांबद्दल कुणालाही कसलीही सहानुभूती वाटत असो.. पण यांचा खरा चेहरा रक्तानं माखलेलाच आहे. नक्षलवाद्यांच्या समस्या काहीही आणि कितीही वास्तववादी असल्या तरी नरसंहाराला क्षमा का करायची.. कारण सामाजिक हक्काची भाषा करणा-यांचा हाच आहे खरा नक्षलवादाचा रक्तरंजीत चेहरा.

छत्तीसगड मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर नक्षलवादी चळवळीचं वास्तव आता सा-यासमोर आलीय.. या घडीला जरी केवळ क्रांतीचा मुखवटा असला तरी आतला चेहरा अतिशय भेदक असाच आहे. नेमकी सुरुवात कशी झाली, आणि कशी भरकटत गेली नक्षलवादी चळवळ.. एक नजर..

भारतातल्या नक्षलवादाला सुरुवात ही अशी झाली..

1967, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्कसिस्टचे नेते कानू सन्याल आणि सीलीगुडी किसान सभेचे अध्यक्ष जंगल संथाल यांनी पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी गांवात एका हिंसक आंदोलनाची सुरुवात केली.. आणि इथूनच नक्षलवादाचा जन्म झाला...
18 मे 1967
कानू सन्याल यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांना शस्त्रांच्या जोरावर त्यांच्या जमीनी परत मिळवण्याचा ठराव पास करण्यात आला. सुरुवातीला नक्षल आंदोलानाचा हेतू आणि उद्देश इतकाच होता.
जमीनदारांच्या लोकांनी जमीनीच्या वादातून नक्षलवाडी या गावावर हल्ला केला. 24 मेच्या दिवशी पोलीसांची एक टीम नक्षलवाडी येथे पोहोचली...जंगल सन्याल तयार होता...धनुष्याबाणाने हल्ला करुन एका पोलीस इंस्टपेक्टरची हत्या करण्यात आली आणि इथूनच सुरुवात झाली ती त्या लोकांनी या आंदोलनात सामिल होण्याची ज्यांच्या कडे स्वत:ची जमीन नव्हती. संथाल जनजातीच्या गरीब जनतेला जमीनदारांच्या तावडीतून आपली जमीन परत मिळवण्याचा एक मार्ग मिळाला...
1970च्या दशकात नक्षल आंदोलनाचे दोन भाग पडले. 1980च्या दशकात नक्षल आंदोलनाचे तब्बल 30 भाग पडले. 1970 च्या दशकात नक्षल आंदोलन हे कोलकाताच्या विद्यार्थांच शस्त्र बनलं होतं. विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळा-कॉलेज सोडून नक्षल आंदोलनात सहभागी होऊ लागले.

पण या नक्षल आंदोलनाचं स्वरुप बदलू लागलं, नक्षल आंदोलनाचा वापर करुन वै-यांना टार्गेट केलं जाऊ लागलं. जमीनदारांबरोबरच व्यापारी, यूनिलर्सिटीचे शिक्षक, पोलीस अधिकारी आणि राजनेत्यांना निशाणा बनवलं जाऊ लागलं. कोलकात्यात नक्सलवाद्यांचा आतंक वाढला..शाळा-कॉलेजांना टाळे लागले. नक्षलवाद्यांनी जाधवपूर युनिवर्सिटीमध्येच शस्त्र बनवण्याचं काम सुरु केलं. कोलकात्याचं प्रेसीडेंसी कॉलेज नक्षलवाद्यांचं हेडक्वार्टर बनलं. नक्षलवादाशी सुशिक्षित लोकांही मोठ्याप्रमाणात जोडली गेली.

सिद्धार्थ शंकर रॉय... हे त्यावेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते नक्षल चळवळीचे ते मोठे विरोधक होते. मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावरुन पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये संघर्षाला खरी सुरुवात झाली. या घटनांची दखल ह्यूमन राईट्स कमीशनला घ्यावी लागली आणि त्यांनी राज्य सरकारवर हा वाद लोकतांत्रिक पध्दतीचा अवलंब न करता सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

नक्षल चळवळीवर सर्वात जास्त प्रश्न चारु मुजुमदार यांच्या लीडरशीप दरम्यान उठले. 1971मध्ये CPI(MI) तुटली. चारु मुजुमदार यांना पोलीसांनी अटक केली. आणि अलीपूर जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1972मध्ये मुजुमदारांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद खंड खंड झाला.

ऑगस्ट 1972मध्ये नक्षल आंदोलन आंध्रप्रदेशच्या कोंडापल्लीत पोहोचलं. 1973मध्ये नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये आपलं बस्तान हलवलं. आणि हळूहळू नक्षल चळवळ मध्यप्रदेशच्या छत्तीसगढापर्यंत पोहोचलं.

1980च्या दशकात नक्षल आंदोलननं आपली खरी ओळख गमावत होतं. हे आंदोलन आता आतंकाच्या मार्गावर अग्रेसर होऊ लागलं. नक्षलवाद्यांना आपली चळवळीचा विसर पडत गेला आणि चळवळीचं रुपांतर आतंकवादात होऊ लागलं. आणि त्याचीच प्रचेती 2000 च्या प्रत्येक वर्षात प्रखतरेनं दिसून आली. नक्षलवादी आता कोणत्याही उद्देशासाठी लढत नव्हते तर ते फक्त नरसंहार करत होते. 25 मे 2013चा नरसंहार हा त्याचाच एक भाग होय...

नक्षलवादी हे आपल्या हक्कासाठी लढतात. त्यांच्यावर सरकार अन्याय करतेय असा एक समज आहे. पण मागील पाच वर्षात नक्षलवाद्यांची काळी कृत्य पाहिली तर यातील वास्तव समजून येईल. छत्तीसगडच्या नक्षलवादी हल्ल्यानंतर आता देशभरातून नक्षलवाद्यांविरुद्ध संतापाची लाट उसळलीय. मागील काही वर्षातील नक्षलवाद्यांचे भ्याड हल्ले पाहता नक्षलवाद्यांना केवळ रक्तपातच करायचा आहे का हाच सवाल उभा ठाकतो.

२००८ ते २०१२ या काळातील नक्षलवांद्याचा हिसांचार पाहता याची खात्री पटेल,
२००८ ते २०१२ या काळातील नक्षलवादी हल्ले

२००८ - ७२१

२००९ - ९०८

२०१० -१००५

२०११ - ६११

२०१२ - ४१४

नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसात निरपरांधांना मारण्याचे सत्र सुरु केले आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याचा सगळ्या राज्यांना फटका बसलाय पण छत्तीसगढ मात्र सगळ्यात आघाडीवर आहे.

२००८ ते २०१२ या काळातील नक्षलवादी हल्ल्यातील राज्यवार मृत्यू

छत्तीसगड - ११८८
झारखंड - ९१६
पश्चिम बंगाल - ४८७
बिहार - ३४९
ओडीशा - ३४५
महाराष्ट्र - २५५

खरतर सुरुवातीला या चळवळीकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन सरकारविरोधी भावना असाच होता.. पण नक्षलवांद्यानी सुरक्षा यंत्रणाना टार्गेट करायला सुरुवात झाली आणि नक्षलवाद्यांचे बेगडी स्वरुप जगासमोर आलं

२००८ ते २०१२ याकाळात नक्षलवाद्यांनी सुरक्षा यंत्रणावर केलेले हल्ले

छत्तीसगढ- ५१०
झारखंड - १९३
ओडीसा - १४९
महाराष्ट्र - ९१

यासगळ्यात सरकारच्या पातळीवर नक्षलवाद्यांच्या समस्या जाणून त्यांनी शरणागती पत्करावी म्हणून अनेक वेळा आवाहन करण्यात येत. पण केवळ हिसांचार करण्याचा हेतू असणा-या नक्षलवांद्यानी शरणागतीसाठी मात्र निरुत्साह दाखवलाय.
२००८ ते २०१२ याकाळात नक्षलवाद्यांची शरणागती

२००८ - ४००
२००९ -१५०
२०१० - २६६
२०११ – ३९४
२०१२ - ४४०

गेल्या पाच वर्षातील नक्षलवाद्याची ही हिसेंकडे सुरु असलेली वाटचाल पाहता आता यावर सरकारच्या वतीनं कठोर पावलांची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.. कारण प्रश्न शेवटी देशाच्या एकात्मतेचा आहे..

नक्षल चळवळ ही भारतीय शोषीत वर्गाची आता राहीलेली नाही तर तिला पाकिस्तान आणि चीनची साथ मिळतेय.. आणि म्हणूनच ही चळवळ लाल क्रांती न राहता केवळ सूडाची भाषा बोलतेय.

नक्षल आंदोलन.. आता हे आंदोलन नाही राहीलय. आता ही एक आतंकवादी चळवळ झालीय. मुळ हेतूंपासून पुर्णपणे नक्षल चळवळ बाजूला झालीय. नक्षलीना आता आपल्या गरजा पुर्ण करायच्यात, आदिवासींच्या हक्काची लढाई आता त्यांना नाही लढायचीय. नक्षल आता आतंकाचे दुसरं नाव बनून गेलय. नक्षलवांद्याच्या हातात अत्याधुनिक शस्त्रं दिसतायत. नक्षलवाद्यांना ही शस्त्र पुरवणारी पडद्याआडचे चेहरे आहेत, पाकिस्तानची आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटना. आणि या नक्षलवांद्याना आर्थीक रसद पुरवली जाते ती चीनकडून...

१ ऑक्टोबर २०११ ला दिल्ली पोलिसांनी पहाडगंजमधील हॉटेलमधून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून काही नकाशे आणि आराख़डे जप्त करण्यात आले. त्याच्याच आधारे नक्षलवाद्यांना चीन आणि पाकिस्तान मदत करते हा खुलासा जगासमोर उघड झाला. पकडण्यात आलेले दोघेही पीपल्स लीबरेशन्स आर्मीचे म्हणजे पीएलएचे सदस्य होते. पीएलएचा एक मुख्य म्होरका चीनमधून शस्त्राचा व्यवहार करतो. भारतातील नक्षलवाद्यांना तो शस्त्रांची तस्करी करायची. दिल्ली पोलिसांच्या दाव्यानुसार आईएसआय आणि नक्षलवाद्याचे घट्ट संबध आहेत. पीएलएशी संबधीत लोक आणि आईएसआयची मदत पीओके मधील दहशतवादी संगटनाना मिळते. ज्यात लष्कर ए तय्यबाचा सहभाग आहे. सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार मागील काही वर्षातील नक्षलवादी हल्ल्यामागेच कारण नक्षल क्षेत्राचा विकास नसून केवळ दहशत आणि आतंक एवढच आहे. आणि या नक्षलवादाच्या बुरख्याआडचा चेहरा आहे पाकिस्तान आणि चीनचा दहशतवाद..

हे केवळ छत्तीसग़डमध्ये नाही तर आपल्या गडचिरोलीतही येवून पोहोचलीय. नक्षलवादाची विषवल्ली आता देशभर पसरत चाललीय..


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 27, 2013, 23:34


comments powered by Disqus