Last Updated: Tuesday, June 25, 2013, 19:03
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरातलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज याचं जन्मस्थान असणा-या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणासाठी लागणा-या खाप-या दुप्पट किंमतीनं विकत घेतल्याचं त्याचबरोबर केलेलं काम दर्जाहीन होत असल्याबद्दलचं वृत्त झी मीडियानं दाखवलं होतं. या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.
झी मीडियाच्या वृत्तानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी शाहू जन्मस्थळ विकास संवर्धन समितीच्या सदस्यांसह जन्मस्थळाच्या ठिकाणाला भेट दिली. एवढंच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल बारकाईनं आढावाही घेतला. यावेळी जिल्हाधिका-यांनी ठेकेदार आणि वास्तुविशारद यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
त्यावेळी वास्तुविशारद अमरजा निंबळकर यांनी अनेक विषय लपवण्याचा प्रयत्न केला. पण समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेवून कामाच्या दर्जाबद्दल आक्षेप नोंदवला. झी मीडियानं दाखवलेल्या बातमीनंतर पहिल्यादाच समितीच्या सदस्यांना घेऊन जन्मस्थळ ठिकाणावर बैठक झाली.
राजर्षी छत्रपती शाहु महाराज... महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे... पण अशा या थोर राजाचं जन्म ठिकाण असणा-या कोल्हापुरातल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं.
राज्य कारभाराची सूत्रं हाती घेतल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत सत्ता आणि शक्तीचा केवळ जनकल्याणासाठी उपयोग करणारे थोर राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज... अशा या राजाच्या जन्मस्थळ विकासासाठी राज्य सरकारनं 10 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलाय. पण या निधीचा काही ठिकाणी चुकीचा वापर होत असल्याचं दिसून आलंय. जन्मस्थळाच्या स्मारकासाठी लागणा-या खाप-या शाहू काळाशी सुसंगत अशा मेंगलोरी बसवायच्या होत्या. पण वास्तूविशारद अमरजा निंबाळकर आणि ठेकेदार यांनी शाहू जन्मस्थळ विकास संवर्धन समितीच्या सदस्यांची मागणी धुडकावत 400 रुपये ब्रॉस असणा-या मेंगलोरी खाप-यांऐवजी 950 रुपये इतकी दुप्पट किंमतीच्या इलेबिना काँक्रेट स्टाईल खाप-या बसवल्या आहेत. त्यामुळं नागरिकांसह शाहू जन्मस्थळ विकास संवर्धन समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला होता.
एकूण साडेचार एकरमध्ये सुरू असलेलं शाहू महाराजांच्या जन्मस्थळ विकासाचं काम कासवाच्या गतीनं सुरुय. तसंच जन्मस्थळाचं काम दर्जेदार आणि शाहू काळाशी सुसंगतही होत नाही. त्यामुळं याबाबत कुणाला जाब विचारायचा असा प्रश्न शाहू प्रेमी व्यक्त करत होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 19:03