Last Updated: Monday, October 29, 2012, 21:36
www.24taas.com,पुणेपिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीन नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक ३६ प्रदूषित नद्यांत राज्यातील आठ नद्यांचा समावेश आहे. पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करतेय असा सवाल उपस्थित केला जातोय.
पिंपरी-चिंचवडच्या रहिवाशांना पवना नदीतून पाणी पुरवठा केला जातो. पण ही नदी किती प्रदूषित आहे, हे आता समोर आलंय.. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीनं नुकत्याच तयार केलेल्या अहवालात पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय... इंद्रायणी नदी तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान.... पण इंद्रायणीतही कमालीचं प्रदूषण झालंय.... विशेष म्हणजे दोन्ही नद्यांचं प्रदूषण पिम्परी भागातच जास्त आहे. "इंद्रायणी`चा सर्वाधिक प्रदूषित भाग आळंदी, तर "पवने`चा सर्वाधिक प्रदूषित भाग सांगवीत आहे. मैला, सांडपाण्यामुळेच इंद्रायणी, पवना या नद्या प्रदूषित झाल्याचं अहवालात म्हणण्यात आलंय. त्यातच अनेक कारखान्यांमधून थेट नद्यांमध्ये घाण पाणी सोडल्यानं पाण्यात रसायनं आहेत. या नद्यांपैकी एकाही नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे महापालिकेवर आता जोरदार टीका होऊ लागलीय.
पिंपरी-चिंचवड महापालिकेनं गेली कित्येक वर्ष पर्यावरण अहवालही सादर केला नसल्याचं यापूर्वीच उघड झालंय. त्यामुळं पालिका पर्यावरण आणि प्रदुषणासारख्या गंभीर प्रश्नांवर कसा विचार करते हे स्पष्ट झालंय. या मुद्द्यावर सध्या कोणीही बोलायला तयार नाही. नागरिकांच्या आरोग्यावर होणा-या घातक परिणामांचा विचार केला तर पालिकेनं प्रदूषण नियंत्रणाकडं लक्ष देण्याची गरज आहे.
First Published: Monday, October 29, 2012, 21:36