soneri mayajal -24taas.com

सोनेरी मायाजाल

सोनेरी मायाजाल


www.24taas.com,मुंबई


त्या ३६ तरुणींचा आक्रोश

जो घेईल तुमच्या काळजाचा ठाव

तो एक अत्यंत भयंकर अपराध आहे

जो तुमच्या अंगावार शहारे आणल्याशिवाय रहाणार नाही

थंड डोक्याने ते षडयंत्र रचण्यात आलं होतं

त्या तरुणींना मोठी स्वप्न दाखविण्यात आली होती

पैशाचं आमिष दाखवण्यात आलं होतं

पण त्या कामाविषयी त्यांना जराही कल्पना नव्हती

त्यांचा विश्वासघात करण्यात आला होता

तो प्रकार अंगाचा थरकाप उडणारा असाच होता


नोकरीच्या नावाखाली वेश्याव्यवसायात ढकलण्याचे एक असं षडयंत्र आहे ज्याचा खुलासा झाल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.. त्या षडयंत्रात एकीकडं मुंबई आहे तर दुसरीकडं दुबई.. होय ...त्यांच्या तावडीतून देशातील एकही शहर सुटलं नाही..ठिकठिकाणी त्यांचे एजन्ट आहे...पण जेव्हा एखाद प्रकरण उघडकीस येतं तेव्हा सगळ्या देशाचं लक्ष त्याकडं जातं..त्याच षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहोत आजच्या प्राईमवॉचमध्ये... सोनेरी मायाजाल

ज्या सोनेरी मायाजालाचा पर्दाफाश करणार आहोत ...ते मायाजाल मुंबईत विणण्यात आलं होतं..आणि त्याचा मार्ग होता मुबंई ते दिल्ली आणि दिल्ली ते दुबई. पोलिसांनी आपल्या षडयंत्राची खबर लागू नये म्हणून दिल्लीचा मार्ग अवलंबला होता..पण त्यांचा तो डाव पोलिसांनी हाणून पाडला.

हे दृष्य एका हिंदी सिनेमातलं असलं तरी अशीच एक घटना वास्तवात घडलीय... होय....असंच काहीसं दृष्य तिथं होतं. एका टोळीच्या तावडीतून कशा पद्धतीने ३६ तरुणींची सूटका करण्यात आली हे तुम्ही प्रथमच पहाणार आहात.

मुंबईतील विमानतळ . तरुणींनी आपले चेहरे झाकले आहेत....खरं तर त्यांनी कोणताच गुन्हा केला नाही...पण जगदुनियेपासून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत...आणि म्हणूनच त्यांनी चेहरा झाकलाय....प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमे-यापासून चेहरा लपविण्याचा प्रयत्न त्यांनी का केला असावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल....पण त्याचं उत्तर ऐकूण तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...या तरुणींना दिल्ली विमान तळावरून ताब्यात घेण्यात आलंय... कारण त्यांना दुबईला पाठविण्यात येणार होतं....पण त्यांचा तो डाव तडीस जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांची सूटका केलीय....पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली नसती तर मोठा अनर्थ झाला असता..
सोनेरी मायाजाल

मुंबईतील काही तरुणींना दिल्ली मार्गे दुबईला पाठविण्यात येणार असल्याची खबर मुंबईतील समाजसेवा शाखेला मिळाली होती...मानवी तस्करी करणा-या एका टोळीचं या सगळ्या घटनेमागे कारस्थान होतं... समाजसेवा शाखेनं माहितीची खातरजमा केल्यानंतर त्या टोळीचा डाव हाणून पाडण्यासाठी तयारी केली होती..समाज सेवा शाखेला आपला प्लॅन कळाल्याचं मानवी तस्करी करणा-या टोळीला समजलं होतं...त्यामुळे ते सावध झाले होते...त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नवीन योजना आखली...तो मार्ग मुंबईवरुन दिल्ली आणि दिल्लीतून दुबई असा निश्चित केला होता..समाजसेवा शाखाला संशय येवू नये म्हणून त्या टोळीने दिल्ली मार्गे दुबईला जाण्याचा बेत निश्चित केला होता....
ठरलेल्या योजनेनुसार दलालांनी २४ तरुणींना मुंबईहून दिल्लीला रवाना केलं होतं....तसेच राजस्थान,मध्यप्रदेश आणि पश्चिमबंगालमधून उरलेल्या १२ तरुणींना दिल्लीत आणण्यात आलं होतं....त्या ३६ तरुणी दिल्लीच्या इंदिरागांधी विमानतळावर एकत्र आल्या होत्या..पण त्यांच्याकडं ना पासपोर्ट होता ना व्हिजा.

दिल्ली विमानतळावर पुढं काय झाल ? आणि कशी सुटका झाली त्या ३६ तरुणींची ? हे आम्ही तुम्हा दाखविणार आहोत मात्र त्यापूर्वी एक गोष्ट पहाणं महत्वाचं आहे आणि ती म्हणजे त्या तरुणींना दलालांनी कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढलं ते. ऑर्केस्ट्रा आणि छोट्या मोठ्या सिनेमात काम मिळवून देण्याचं आश्वासन या तरुणींना देण्यात आलं होतं..९० दिवसांच्या दुबई टूर नंतरप्रत्येकीला दिड ते दोन लाख रुपये देण्यात येणार होते....तीन महिन्यात दिड ते दोन लाख रुपये मिळणार असल्यामुळे त्या तरुणी खूश होत्या...पण ती टुर त्यांच्यासाठी नरकाची सफर ठरणार होती आणि त्याची त्या तरुणींना जराही कल्पना नव्हती.

परदेशात चांगलं काम आणि चांगला पैसाही मिळणार या आशेवर त्या तरुणी दिल्लीच्या इंदिरागांधी विमानतळावर आल्या होत्या...पण विमानतळाच्या इमिग्रेशन विभागात मुंबई तसेच दिल्ली पोलीसांच एक संयुक्त पथक प्रत्येक प्रवाशांवर नजर ठेवून होतं...विमानतळावर तैनात असलेल्या पोलीसांची नजर चूकवून त्या तरुणींच्या ग्रूपसोबत असलेल्या आपल्या महिला एजन्टकडं दलाल पासपोर्ट आणि व्हीजा देण्यात यशस्वी झाले..व्हीजा मिळाल्यानंतर त्या तरुणी बोर्डिंग एरियात पोहचल्या ख-या पण तिथचं त्यांना अडवण्यात आलं.....त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या सर्वांना पुन्हा मुंबईला पाठविण्यात आलं.

३६ तरुणींची समाजसेवा शाखेनं कशा पद्धतीने सुटका करण्यात आली तसेच ..मानवी तस्करी करणा-या टोळीने कशा पद्धतीने तरुणींना आखाती देशात पाठविण्याचा घाट घातला होता हे आताच तुम्ही बघीतलंय..पण त्या तरुणी दलालांच्या जाळ्यात अडकतात तरी कशा आणि दुबईत त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट..

सोनेरी मायाजाल

दुबईला जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीला गेलेल्या या तरुणींना मुंबईतील चेंबूरच्या सुधारगृहात राहण्याची वेळ आलीय....पोलिसांनी वेळीच आपली सूटका केली नसती तर काय झालं असतं याचा विचार आता त्यांना सतावू लागला आहे...त्यांना काळ्या कोठडीत आयुष्य काढावं लागलं असतं...कदाचीतच त्यांची तिथून सूटका झाली असती पण तो पर्यंत बरीच वर्ष निघून गेली असती ... दलालांनी त्यांना जी स्वप्न दाखवली होती ती आजही त्यांच्या डोळ्या समोरून जात नाहीत...दुबई टूरमध्ये असं काही घडेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता...पण आता वेळ निघून गेलीय..
या तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार ऑर्केस्ट्रात काम मिळवून देण्याचं आश्वासन दलालांनी दिलं होतं....तसेच बॉलीवूडमधील एका सिनेमाचं दुबईत शुटिंग असून त्यासाठी एक्स्ट्रा म्हणून काम मिळणार असल्याचं सांगितलं होतं..

जेव्हा तरुणी मानवी तस्करी करणा-या टोळीच्या जाळ्यात अडकतात आणि त्या परदेशात जाण्यास तयार होतात तेव्हा दलाल त्या तरुणींचा एक ग्रुप तयार करतात...एकदाका ग्रुप तयार झाला की मग ते गरजेनुसार तरुणींना परदेशात पाठवतात..पण जेव्हा त्या तरुणी आखाती देशात पोहोचतात तेव्हा तिथ पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना परिस्थितीचं भान येतं....त्यांच्या समोर जे वास्तव असतं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते.

परदेशी भूमीवर पाऊल ठेवताच तिथं असलेले तस्कर त्या तरुणींकडून पासपोर्ट आणि व्हिजा हिसकावून घेतात..त्यानंतर १० - १५ तरुणींना एका खोलीत डांबलं जातं...तसेच बळजबरीने त्यांना हॉटेलात नाचण्यास भाग पाडलं जातं...खरं तर त्यांना ऑर्केस्ट्रात काम मिळवून देण्याच आश्वासन दिलं असत पण प्रत्यक्षात त्यांना हॉ़टेलात नाचावं लागलं..त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या नरकात ढकललं जातं.ज्या तरुणी दलालांच ऐकण्यास नकार देतात त्यांचा शारिरिक छळ केला जातो...तसेच बेदम मारहाण केली जाते.


खरं तर त्या तरुणी टुरिस्ट व्हिजावर परदेशात जातात..त्यांच्याकडं केवळ ९० दिवसांचा कालावधी असतो...पण या ९० दिवसात दलाल एका तरुणीच्या माध्यमातून दिवसाला जवळपास ८ ते १० लाख रुपये कमाई करतात..पण त्यातून केवळ एक ते दोन लाख रुपयेचं तरुणींच्या हातात पडतात.

मुंबई पोलिसांनी दिल्लीच्या विमानतळावरून ज्या ३६ तरुणींची सुटका केलीय त्यापैकी दहा ते १२ जणी पहिल्यांदाच दुबईला जाणार होत्या...उरलेल्या तरुणी यापूर्वीही दुबईची वारी करुन आल्या आहेत..दुबईत मिळणारा पैसा आणि समाजाकडून केला जाणारा द्वेष या मुळे यातल्या बहुतेक तरुणी मायदेशी परतण्यास नकार देतात.

दुबईचं कटू सत्य बघीतल्यानंतर आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत कशा पद्धतीने मानवी तस्करी करणा-या टोळीने ते षडयंत्र रचलं होतं ....वरवर पहाता ते मायाजाल अत्य़ंत आकर्षक वाटतं आणि त्यामुळेच भोळ्याभाबड्या तरुणी सहज अडकतात.

तारीख
14 ऑगस्ट 2012

वेळ
रात्री 8:30 वाजता

ठिकाण
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

त्या ३६ तरुणींना पोलीसांनी ताब्यात घेतलं होतं..ऑर्केस्ट्रा आणि सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांना दुबईत देहविक्रीसाठी पाठविण्यात येणार होतं...पोलिसांनी त्या तरुणींना ताब्यात घेतलं खरं पण त्यांना दुबईत पाठविणारा दलाल मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही...पोलीस कारवाई करणार असल्याचं कुणकुण त्या टोळीच्या म्होरक्याला लागली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मानवी तस्करी करणा-या टोळीचा म्होरक्या मुंबई किंवा दिल्ली सारख्या मोठ्या शहरातून आपलं नेटवर्क चालवतो...देशातील लहान शहरात त्याचे एजन्ट कार्यरत असतात....ते एजन्ट परदेशात काम मिळवून देण्यातं आमिषं देवून तरुणींना परदेशात जाण्यासाठी तयार करतात..त्या बदल्यात तो म्होरक्या एजन्टला पैसे देतो...जाळ्यात ओढलेल्या तरुणींना म्होरक्य़ा पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही एजन्टवर असते..तर तरुणींना परदेशात पाठविण्याचं काम मोठ्या दलालमार्फत केलं जातं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करी करणा-या टोळीचं नेटवर्क संगठीतपणे चालवलं जातं..लहान लहान शहरातील एजन्ट तरुणींनीच्या कौटुंबीक परिस्थीतीचा गैरफायदा घेऊन त्यांना जाळ्यात ओढतात...नवीन तरुणींना आकर्षीत करण्यासाठी एजन्ट यापूर्वी परदेशात पाठविलेल्या तरुणींची मदत घेतात.

मानवी तस्करी करणा-यांविरोधात मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय..त्यामुळेच आता दलालांनी दिल्ली , हैदराबाद, आणि चेन्नई सारख्या शहरातून तरुणींना परदेशात पाठविण्यास सुरुवात केली आहे..लहानलहान शहरातून तरुणींना एका शहरात आणलं जातं आणि तेथून त्यांना आखाती देशात पाठवलं जातं.

दिल्लीच्या विमानतळावर ज्य़ा तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यापैकी बहुतेकजणींचं वय हे १८ ते २५च्या दरम्यान आहे...या मानवी तस्करीत विमातळावरील काही कर्मचा-यांचा सहभाग असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे..विमानतळावर काम करणा-या कर्मचा-यांच्या मदतीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणींना परदेशात पाठवणं अशक्य असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.....या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे तस्कर अधिका-यांना पैसा वाटण्यास मागे पुढे पहात नाहीत..या तरुणींकड सखोल चौकशी केल्यानंतर या तस्करीतील काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याचं पोलिसानी सांगितलंय.

मानवी तस्करी करणारी टोळ्या यापुर्वीही अनेकवेळा जेरबंद झाल्यायत.. तरुणीना आमिष दाखवून परदेशात पाठवण्याचे प्रकार यापुर्वीही घडलेत. पण या रॅकेट मागचा मास्टरमाईंड कोण ? याचा तपास पोलिसांनी आता सुरु केलाय.. कोण या तरुणींना दुबईला पाठणार होत ?याचा शोध घेतला जात आहे.

दुबई... मनावर मोहीनी घालणारं शहर..... स्वप्नाना पंखाची भरारी देणा-या या शहरातील हा झगमगाट प्रसंगी आयुष्यात अंधकारही निर्माण करु शकतो.. त्या मृगजळामागे धावणा-या काही तरुणींना आयुष्यभर नरक यातना भोगण्याची वेळ आली.

पण या तरुणी मात्र नशिबवान ठरल्या आहेत.. मुंबई पोलिसांनी वेळीच कारवाई करुन मानवी तस्करांच्या तावडीतून त्यांची सुटका केलीय...दुबईला जाण्यापूर्वीच दिल्लीच्या इंदिरागांधी विमानतळावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं...
पोलिसांनी सुटका केलेल्या या तरुणी मानवी तस्करी करणा-या एका कुख्यात टोळीच्या जाळ्यात अडकल्या होत्या...पोलिसांनी आज पर्यंत केलेल्या कारवाईपैकी ही सर्वात मोठी कारवाई मानली जातेय...एकचवेळी तब्बल ३६ तरुणींची सूटका करण्यात त्यांना यश आलंय...यापूर्वी दिल्ली पोलिसांनी १०५ पासपोर्टसह एका टोळीला जेरबंद केलं होतं...
पण ३६ तरुणींच्या ग्रुपची सूटका करण्याची ही पहिलीच वेळ आहे...
मात्र या कारवाईमुळे अनेक सवालही उपस्थित झालेयत..

मानवी तस्करांच्या टोळीचा म्होरक्या कोण ?
तरूणी स्वतःहून दुबईला निघाल्या होत्या ?
तसं असेल, तर हे शक्य आहे का ?
आणि तसं नसेल, तर तरूणींना दुबईच्या नरकात ढकलणारा कुठं आहे ? या प्रश्नांची उत्तर निरूत्तर आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार या तरुणींना 8 वेगवेगळ्या राज्यातून आणण्यात आलं होत. कुठल्याही नेटवर्कविना बिनाबोभाटपणे ३६ तरुणीना मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीतून दुबईला पाठवणे शक्यच होणार नाही. सूत्राच्या माहितीनुसार या सर्व तस्करीमागे एखादी मोठी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत आहे. पण खरा प्रश्न आहे, या सर्वामागे असलेला तो काळा चेहरा कधी पोलिसाच्या हाती लागणार..

First Published: Friday, August 17, 2012, 22:27


comments powered by Disqus