सांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी - Marathi News 24taas.com

सांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी

www.24taas.com, सांगली
 
कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.
 
जवळपास 4 कोटींच अनुदान रखडल्यामुळं या बचतगटांवर ही वेळ आलीय. पाच महिन्यांपासून अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळं या महिला अडचणीत आल्यात. मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी काही महिलांनी आपले दागिने गहान ठेऊन पोषण आहारासाठी रक्कम उभी केलीय. वेळोवेळी मागणी करुनही जिल्हापरिषदेकडून अनुदान मिळत नसल्याचा आरोप बचतगटाच्या महिलांनी केलाय. लवकरात लवकर अनुदान मिळालं नाही तर पोषण आहाराचं काम बंद करण्याच्या विचारात असल्याचं बचतगटांनी सांगितलंय.
 
राज्यसरकारकडूनच चार पाच महिने अनुदान आलं नव्हतं पण आता पावणेतीन लाखांचं अनुदान आले आहे. मात्र, आधीचे कर्ज फेडण्यात पैसे गेल्याने या बचतगटांना पोषण आहार बनविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मुलांना अन्न मिळावे, या हेतूने हे बचतगट कर्ज काढून गाडा चालवत  आहे. याचे सरकारला काही पडलेले नाही, त्यामुळे अनुदान देण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात  आहे.

First Published: Wednesday, June 20, 2012, 08:24


comments powered by Disqus