एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती - Marathi News 24taas.com

एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती

www.24taas.com,  पुणे
 
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच  एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.
 
भवानी पेठेतल्या लोहियानगरमधील कांबळे कुटुंबाला एसआरएनं घर पाडण्याची नोटीस बजावली आहे. घर पाडलं नाही कर बळाचा वापर करण्याची धमकीही देण्यात आली आहे. त्यांच्या घराला लागून ९२ घरांची एसआरए योजना होतेय. त्यामध्ये कांबळेंना एक घर देण्यात आलंय. पण दुसरं घर द्यायला एसआरए तयार नाही. तर दुस-या बाजूला चक्क मृत व्यक्तींना घर देण्याचा प्रकार एसआरएनं केलाय. सीताबाई चव्हाण यांचा २००५ मध्ये मृत्यू झालाय. तरीही त्यांना या योजनेत घर मिळालंय. अनुसया साळुंखे यांचा तब्बल २१ वर्षांपूर्वी मृत्यू झालाय. पण त्यांच्याही नावावर घर देण्यात आलंय.  तसंच या जागेत फक्त ५६ झोपडपट्टी धारक होते. मात्र, अंतिम पात्रता यादीत ही संख्या गेली ९२ वर. म्हजेच ३६ बोगस नावं या यादीत घुसवण्यात आली आहेत.
 
या योजनेसाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्झिट कँम्पमध्येही असेच प्रकार सुरू आहेत. पात्रता यादी नुसार या कँम्पमध्ये 92 कुटुंबं असणं अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ३००च्यावर कुटुंबं तिथे आहेत. या विरोधात मूळ मालकानं कोर्टात धाव धेतलीय.या सर्व गैरप्रकाराबाबत कांबळे यांनी एस.आर.ए.च्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर चौकशीचे आदेश ही देण्यात आले. चौकशीत तथ्य असल्याचं अधिकारी मान्य करतात. पण कॅमे-यासमोर बोलायला तयार नाहीत. एस.आर.ए.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते अशा वादग्रस्त विषयावर बोलायला तयार नसून ते मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पुणे महापालिका आयुक्तांकडे बोट दाखवत आहेत.

First Published: Thursday, May 24, 2012, 14:07


comments powered by Disqus