१४ गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर - Marathi News 24taas.com

१४ गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर

www.24taas.com, संग्रामपूर 
 
मेळघाट, नंदूरबार किंवा ठाणे या जिल्ह्यातच नव्हे तर आता पश्चिम विदर्भातही कुपोषणाची समस्या तीव्र होत चाललीय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्य़ा १४गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर झालाय. 'झी २४ तास'चा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
 
बुलडाणा  जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं  दुर्गम भागातलं शेंबा गाव.. याच गावात आदिवासी उषाबाई तोटा यांचं हे घर.. उषाबाईंच्या पोटी ५ मुली आहेत...त्यातलीच जेमतेम २८ किलो वजन असलेली उषाबाईंची क मुलगी सरजीबाई कुपोषणामुळं मरणासन्न झालीय.. १०-१२ दिवसांपूर्वीच सरजीबाईनं मुलीला जन्म दिलाय. पण तिला आपल्या बाळाला एकदाही दूध पाजता आलेलं नाही... उषाबाईंच्या घरची परिस्थिती बिकट आहे.
 
रोजगाराची संधी नाही.. त्यामुळे दररोज घरात चूल पेटेलेच याची शाश्वती नाही.. घरातली ८ ते १० जणांचा परिवार कसा चालवायाचा हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे.. त्यातच बाळंतपणाला आलेल्या मुलीचं आजारपण आणि कुपोषित बालक यांना अन्न द्यायचं कसं, हा त्यांच्यामोरचा प्रश्न आहे.. सकस अन्न तर सोडाच, पण एकवेळच्या खाण्याचाही मारामार आहे..
 
लोकसंख्या ५०० च्या घरांत आहे.. गावातल्या ० ते सहा या वयोगटातल्या शंभर मुलांपैकी ५० मुलं कुपोषित आहेत. त्यातली २० पेक्षा जास्त मुलं ही तिस-या श्रेणीत म्हणजे 'डेंजर झोन' मध्ये आहेत. कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसल्यानं अनेकवेळा प्रसुतीदरम्यान मुलं दगावण्याचं प्रमाण मोठं आहे.
 
बुलडाण्यापासून १२५किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंबा गावात येण्यासाठी धड रस्ताही नाहीये.. घनदाट जंगलात १० किलोमीटरचा दगड धोंड्याच्या रस्ता तुडवत या गावात प्रवेश करावा लागतो. अंबा-बरवा अभायरण्यात पुनर्वसनाच्या रगाड्यात हे गाव पुरत फसलंय.. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही आणि शिक्षणचाही पत्ता नाहीये.. दोन हातपंप आहेत, त्यापैकी एक बंद आहे तर दुस-याला फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होतोय.. त्यामुळे गवात हाडांच्या आजाराचं प्रमाणही अधिक आहे.. रस्ताच नसल्याने पावसाळ्यात गाव वाळीत पडतय.. कुपोषणाच्या मुळाशी या सा-या समस्य़ा आहेत..
 
शेंबा गावाचीच नव्हे तर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अशा १४ गावांमध्ये हीच रड प्रत्येक गावात आहे. त्यात शेंबा, गुमठी, चुनखडी आणि अंबाबरवा या गावात कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलाय.. सरकारदरबारी आकडेवारीत आणि पैसे खाण्यात मग्न असलेल्या नोकरशहांना या गावांची आठवण येणार का, आणि त्यांचे प्रश्न कधी सुटणार, हा आर्त सवाल हे ग्रामस्थ विचारत आहेत.
 
व्हिडिओ पाहा...
 

 

First Published: Friday, June 1, 2012, 14:55


comments powered by Disqus