कुपोषित गावांकडे आमदार, खासदारांचं दुर्लक्षच - Marathi News 24taas.com

कुपोषित गावांकडे आमदार, खासदारांचं दुर्लक्षच

www.24taas.com, बुलढाणा
 
बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं कुपोषणाचं विदारक चित्र झी 24 तासनं संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडताच प्रशासन खडबडून जागं झालं मात्र स्थानिक खासदार, आमदार अजूनही याठिकाणी फिरकले नाहीत.
 
बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं कुपोषणाचं भयावह चित्र दाखवताच खडबडून जागी झालेली शासकीय यंत्रणा गावात दाखल झाली. आणि शेंबा गावातल्या अतिकुपोषित बाळांची तपासणीही केली. आणि त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातल्या सामान्य रुग्णालयात दाखल केलं. उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळेंनीही या गावाला भेट दिली आणि प्रत्येक घरात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. तसंच आजारी रुग्णांना सोनाळातल्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. उपविभागीय अधिका-यांनी लोकांच्या समस्याही यावेळी जाणून घेतल्या.  झी 24 तासच्या प्रतिनिधींनी यावेळी गावातील लोकांना अनेक प्रकारचे दाखले मिळत नसल्याचं अधिका-यांना सांगितलं. त्यावेळी लवकरच शेंबा गावात एक शिबिर घेऊन सर्वप्रकारचे दाखले देण्याचं कबूल केलं.
 
एकूणच झी 24 तासच्या दणक्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार प्रताप जाधव, आमदार डॉ. संजय कुटे तसंच जिल्हाधिकारी बी.जी वाघ अजूनही याठिकाणी पोहोचले नाही. यावरून कुपोषणासारख्या गंभीर विषयाबाबत शासन किती उदासीन आहे हे दिसून येतंय.
 

First Published: Monday, June 4, 2012, 09:23


comments powered by Disqus