शाळेचा 'डोलारा' कोण सांभाळणार? - Marathi News 24taas.com

शाळेचा 'डोलारा' कोण सांभाळणार?

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे जिल्ह्यातील डोलारा गावाच्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव झी २४ तासनं उघड केलं. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं डोलारावासियांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र समस्या जणू डोलारावासियांच्या पाचवीला पुजल्यात. पाण्य़ासोबत शिक्षणाचा मूलभूत हक्कही त्यांना मिळत नाही.
 
येथील शाळा देखील भग्न किल्ल्यासारखी दिसते. हे कटू वास्तव आहे ठाण्याच्या मोखाडा तालुक्यातल्या डोलारा गावातलं. जिल्हा परिषदनं बांधलेल्या शाळेला ना छप्पर आहे, ना दरवाजा, ना आहेत खिडक्या. शाळा म्हटली डोळ्यासमोर येतात बेंचेस. या शाळेत बेंचेसऐवजी झाडं दिसतात. या भग्न शाळेच्या बाजूलाच एक अंगणवाडीची शाळा आहे. मात्र या शाळेचीही दूरवस्था झालीय. या दोन्हीही शाळा कधीही कोसळू शकतात. त्यामुळं इच्छा असूनही या गावातले नागरिक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. शाळांच्या दूरवस्थेबाबत जिल्हा परिषदेकडं वारंवार तक्रार करुनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप होतोय.
 
शिकून गावाचा विकास करायचाय, मात्र दाद कोणाकडं मागावी असा प्रश्न चिमुकल्यांना पडलाय. गावागावात ज्ञानगंगा पोहचावी यासाठी सरकारनं सर्वशिक्षा अभियानं सुरु केलं.. मात्र डोलारा गावातल्या शाळांची परिस्थिती पाहून सरकारच्या या सगळ्या योजनांचा फज्जा उडालाय. झी २४ तासच्या वृत्तानंतर डोलारावासियांना सरकारनं पाणी दिलं. आता शाळांच्या दूरवस्थेच्या वृत्तानंतर तरी सरकारला जाग येईल का ?
 

First Published: Thursday, June 7, 2012, 09:12


comments powered by Disqus