Last Updated: Thursday, June 7, 2012, 08:39
www.24taas.com, मुंबई अखेर मान्सून राज्यात दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का? मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...
२६ जुलैचा 'तो' दिवस पाऊस म्हटलं की पूर्वी हमखास पाहायला मिळत असलेला चाकरमान्यांचा एक अनावर उत्साह आता मावळलाय. उन्हानं जीवाची लाहीलाही झाली तरी खूप पाऊस नको असतो आणि याला कारण आहे. ते म्हणजे २६ जुलैचा प्रलय... २६ जुलै २००५ चा पाऊस मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही. कारण त्या दिवशी मुंबईवर अस्मानी संकट कोसळलं होतं. अवघी मुंबई जलमय झाली होती. मुंबई-कधीही न थांबणारं शहरंही त्यादिवशी कोलमडून पडलं होतं. सतत धावणारं शहर अशी ओळख असलेल्या मायानगरीला त्या दिवशी ब्रेक लागलं होता. तो क्षण आजही कित्येक मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
महापालिकेचा दावापावसाळा आता उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईत नालेसफाई तसंच रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचं कामं पूर्ण झाल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. नालेसफाईचं काम जवळपास पूर्ण झालंय. मुंबई शहरात ९१ टक्के, पूर्व उपनगरात ९६ टक्के तर पश्चिम उपनगरात ९९ टक्के नालेसफाई पूर्ण झालीय, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. मुंबईत मान्सून दाखल होण्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय. पालिकेनं ४ लाख ४० हजार क्युबिक गाळ उपसला असून मुंबईकराना अतिवृष्टीचा फटका बसू नये यासाठी २१३ फ्लडिंग स्पॉटवर २३० पाणी उपसणारे पंप बसवल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलीय. नालेसफाई साठी ७० कोटी रुपये, खड्डे बुजवण्यासाठी ८७ कोटी रुपये तर पाण्याच्या निचऱ्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेनं केलीय. पण, खरंच ही कामं झाली आहेत का? पालिका अधिकारी सांगतायत ती कामं नेमकी झालीत कुठे? असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठे दावे केले असले तरी वास्तव काही वेगळचं आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून त्याचा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सगळंच आलबेलपाऊस तोंडावर असतानाही मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम आजही सुरुच आहे. मिलन सब-वे आणि इतर ठिकाणची परिस्थितीही काही वेगळी नाही. सात वर्षापूर्वी म्हणजेच २६ जुलै २००५ रोजी मुंबईनं पावसाचं रौद्र रुप अनुभवलंय. अर्धी मुंबई जवळपास दोन दिवस पाण्याखाली गेली. कुर्ला, वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला संकूल या भागात पुराचा सर्वात मोठा फटका बसला. याला एकमेव कारण म्हणजे मिठी नदीची झालेली गळचेपी. एकेकाळी स्वच्छ पाण्याचा प्रवाह असलेली नदी गटार बनलीय. तसेच याही नदीच्या पात्रावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाली होती, नदीचे पात्र अरुंद झाले होतं. २६ जुलैच्या पावसानंतर नदीच्या विकासासाठी मिठी नदी प्राधिकरण स्वतंत्र स्थापन करण्यात आली. मिठी नदीमधील गाळ उपसणे, नदीचे रुंदीकरण करणे, संरक्षक भिंत घालणे अशा कामांना सुरुवात झाली. यंदाही पाऊसाची चाहूल लागलीय पण, अद्यापही कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरातील मिठी नदीच्या पात्रात गाळ उपसण्याचं काम सुरु आहे. गाळ काढण्याचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे नदीच्या पाण्याचा वेगही मंदावलेला दिसतो. मिठीनदी प्रमाणेच मिलन सब - वे हे ठिकाण दरवर्षीच्या पावसात मुंबईकरांची डोकेदुखी ठरतं. हा सखल भाग असून थोडा जास्त पाऊस झाली तरी मिलन सब-वे पाण्याखाली गेलाच म्हणून समजा. पाणी साचल्यामुळे मिलन सब-वेतून होणारी वाहतूक बंद पडते. दरवर्षी इथं हेच चित्र पहायला मिळतं.
रेल्वे आणि महानगरपालिकेतला जुना वाद पावसाळ्यात पाऊस किती पडतो यापेक्षा लोकल सेवा सुरळीत सुरु आहे का? याकडे मुंबईतील चाकरमान्यांचं लक्ष असते. कारण लोकल काही मिनिटे जरी उशीरा धावत असली तरी त्याचा मोठा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो. जर जास्त पाऊस झाला तरी त्याचा सर्वांत पहिला फटका हा रेल्वे सेवेला बसतो.
मध्यरेल्वेच्या मार्गावर कुर्ला-सायनसारखे असे अनेक भाग आहेत, जिथं थोडा जरी जास्त पाऊस झाला की हमखास पाणी साचतं. त्यामुळे ही ठिकाणं मध्यरेल्वेसाठी दरवर्षी डोकेदुखी ठरु लागली आहेत. सँटहर्स्ट रोड, परळ, घाटकोपर, भांडुप, चुनाभट्टी, वडाळा या रेल्वे स्थानकाजवळ जास्त पाऊस झाल्यास रेल्वेट्रॅक पाण्याखाली गेलेली बघायला मिळतात. पावसाळ्यात रेल्वेचा पहिला फटका बसतो तो रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला. पावसामुळे सिग्नल यंत्रणा नादुरुस्त होते.

ठराविक मर्यादेपर्यंत ट्रॅकवर पाणी साचल्यास लोकल ट्रेन धावतात. मात्र, तेच पाणी मर्यादेपलीकडं गेल्यास ट्रेनची वाहतूक बंद करण्यापलिकडे रेल्वेसमोर दुसरा पर्याय राहात नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅकच्या परिसरातून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत रेल्वेला करावी लागते. आणि इथेच रेल्वे आणि महानगरपालिका यांच्यातील वादाला सुरुवात होते. पालिकेच्या हद्दीतील नोलेसफाई अपूर्ण असल्याने कितीही पाणी बाहेर काढले तरी ते पाणी पुन्हा रेल्वे ट्रॅक परिसरात साचत असल्याची तक्रार रेल्वेकडून केली जाते. पालिका आणि रेल्वे यांच्या हद्दीचा वाद हा दरवर्षीच रंगल्याचं पहायला मिळतं.
मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे काहीशी नशिबवान ठरली आहे. कारण पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकचा भाग हा मध्य रेल्वेच्या तुलनेत उंचावर आहे. त्यामुळे पाणी खूप वेळ साचलं आहे, रेल्वे सेवा बंद पडली आहे असं चित्र गेल्या तीन वर्षात दिसले नाही. तीन वर्षात रेल्वे सेवा सुरळित ठेवण्याची जवाबदारी पश्चिम रेल्वने यशस्वीपणे पार पाडली आहे. असं असलं तरी मरिन लाईन्स रेल्वे स्टेशन, चर्नी रोड - ग्रॅट रोड मधला भाग, मुंबई सेंट्रल,एलफिस्टन रोड, अंधेरी-जोगेश्वरी मधला रेल्वे ट्रॅकचा भाग आणि नालासोपारा-विरार या भागांवर पश्चिम रेल्वेचं विशेष लक्ष आहे. ट्रॅकवर पाणी साचलं तर पाणी उपसण्यासाठी विशेष पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या तयारीची परीक्षा या पावसाळ्यात पुन्हा एकदा होणार आहे.
यंदा तरी त्रासातून सुटका?मुंबईतील हिंदमाता, ग्रँट रोड, कुर्ल्यातील कल्पना टॉकिजचा परिसर, चुनाभट्टी, वडाळा परिसर अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. खरं तर मुंबईची भौगोलिक रचनाच अशी आहे की या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची प्रक्रिया थांबवणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणजे या भागातील पर्जन्य वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे, परिसरातील कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावणे, पाणी उपसण्यासाठी अतिरिक्त पंप बसवणे या गोष्टी अंमलात आणल्यास पावसामुळे होणारा त्रास कमी करता येईल. गेल्यावर्षी महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी १८७ कोटी रुपये खर्च केले होते. तरीही मुंबईकरांना त्रास सहन करावा लागलाच. यंदा तरी त्या त्रासातून सुटका होईल का असा सवाल मुंबईकरांकडून विचारला जातोय.
.
First Published: Thursday, June 7, 2012, 08:39