Last Updated: Thursday, June 7, 2012, 22:49
परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.
मुंबई-अहमदाबाद केवळ अडीच तासांतमुंबई ते अहमदाबाद हे पाचशे किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना ७ तास लागतात. पण, या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाली तर मुंबईवरुन निघालेली ही ट्रेन केवळ अडीच तासात अहमदाबाद रेल्वे स्टेशनात पोहोचेल. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर आहे ५०० किलोमीटर... सध्या मुंबईवरून निघालेल्या दुरांतो एक्सप्रेसला अहमदाबादला पोहचण्यासाठी लागतात ७ तास. पण बुलेट ट्रेनमुळे निम्म्यापेक्षा कमी वेळेत हे अंतर पार करणं शक्य होणार आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच व्यक्त केलाय. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बुधवारी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पंतप्रधानांनी ग्रीन सिग्नल दिलाय. या योजनेसाठी तब्बल ६० हजार कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आलीय. सुरुवातीला या ट्रेनचा वेग ताशी दोनशे किलोमीटर असणार आहे. मात्र पुढच्या काळात तो ताशी ३५० किलीमीटर पर्यंत वाढविण्याची योजना आहे.
‘व्हिजन २०२०’‘व्हिजन २०२०’ अंतर्गत भारतात हाय-स्पीड ट्रेन चालविण्याची योजना आखण्यात आलीय. २००९मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदेत बजेट सादर करताना भारतीय रेल्वेच्या ‘मिशन २०२०’चा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी हायस्पीड रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या योजनेअंतर्गात देशातील सहा प्रमुख रेल्वे मार्गांवर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. दिल्ली - चंदीगड – अहमदाबाद, दिल्ली - लखनऊ – पटना, पुणे - मुंबई – अहमदाबाद, हावडा – हाल्दीया, हैदराबाद – विजयवाडा – चेन्नई आणि चेन्नई – बंगळुरू – एर्नाकुलम या मार्गांचा त्यात समावेश आहे. ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रेल्वे ट्रॅकची आवश्यकता असते. हाय-स्पीड रेल्वेला थांबेही कमी असतात. तसेच रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला मानवी वस्ती कमी असावी लागते. त्यासाठी विशिष्ट रेल्वे ट्रॅक निर्माण करावे लागणार आहेत.
योजना साध्य होणार? आपल्याकडं शताब्दी ही सर्वात वेगवान ट्रेन समजली जाते. तिचा वेग ताशी १०० किलोमीटरचाही पल्ला गाठू शकत नाही. अशा या परिस्थीतीत २०० च्या वेगानं धावणारी बुलेट ट्रेन म्हणजे भारतीयांसाठी दिवस्वप्नचं. कारण सगळ्या प्रकारची मंजूरी मिळाली तरी, बंदूकीच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं बुलेट ट्रेन धावते त्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात वापरले जाणारे रेल्वे इंजिन आणि डबे बुलेट ट्रेनसाठी उपयुक्त ठरू शकणार नाहीत.
मुंबई-पुणे मार्गावर बुलेट ट्रेन?सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावरच्या बुलेट ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळालाय पण, भविष्यात मुंबई-पुणे हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करता येणार आहे. अवघ्या तासात दिल्लीहून मुंबईला पोहोचण्याच्या स्वप्नात अनंत अडचणी ‘आ वासून’ उभ्या आहेत. कारण बुलेट ट्रेनसाठी विशिष्ट प्रकारचा ट्रॅक तयार करावा लागणार आहे. कारण बुलेट ट्रेन रुळावर नाही तर हवेवर चालते आणि हे तंत्रज्ञान शोधून काढलंय बुलेट ट्रेनचा जनक ‘जपान’नं.
बुलेट ट्रेनचा इतिहासजपानमध्ये वर्षांपूर्वी जगातली पहिली बुलेट ट्रेन चालवली गेली... ही त्यावेळची गोष्ट आहे, ज्यावेळी असं अग्निदिव्य साकारण्याचा विचारदेखील अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानं केला नव्हता. वाहनांच्या वाढत्या संखेवर लगाम लावण्यासाठी जपान सरकारने जगातील सर्वात वेगवान ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला. १९६४ साली जपानमध्ये पहिली वेगवान ट्रेन धावली तेव्हा तिचा वेग ताशी २१० किलोमीटर इतका होता. जपानचं पाहून युरोप खंडातील अन्य देशांनीही हाय स्पीडट्रेनचा मार्ग धरला. आज जपानमध्ये अनेक सिरीजमध्ये वेगवेगळी वेग मर्यादा असलेल्या ट्रेन चालविल्या जातात. ताशी २१० किलोमीटर वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे केवळ वेळ वाचतो असं नाही, तर ट्रॅफिकवरचा ताणही कमी होतो.

जपाननं साऱ्या जगाला बुलेट ट्रेनची देणगी दिलीय. पण असं असले तरी जपानसाठी हे साकारण म्हणजे अग्निदिव्यापेक्षा कमी नव्हतं. पर्वतीय क्षेत्रातल्या जपानमध्ये पूर्वी फक्त तीन फुट सहा इंचाची लाईन होती. आणि त्यावरुन हाय-स्पीड ट्रेन चालवण अशक्य होतं. खास हाय-स्पीड ट्रेनसाठी पर्वतरांगा तोडून आणि बोगदे खोदण्यात आले. टोकीओ आणि ओसाकाच्या दरम्यान बुलेट ट्रेनसाठी रेल्वे रुळ टाकण्याचे काम १९५९ मध्ये सुरु झालं आणि १९६४ साली हे काम पूर्णत्वास गेलं. १ ऑक्टोबर १९६४ रोजी जपानने जगातली पहिली बुलेट ट्रेन रुळावर आणली. १३ जुलै १९७६ पर्यंत या बुलेट ट्रेनमधून एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना सुखकर प्रवासाची अनुभूती दिली. पहिल्या बुलेट ट्रेनला ताशी २०० वेग होता. आणि त्यानंतर तो वेग २२० पर्यंत वाढवण्यात आला. हळूहळू या बुलेट ट्रेनमध्ये बदल होत गेले. स्वत:च्याच वेगाचा विक्रम मोडण्यात जपानने स्वत:शीच स्पर्धा लावली होती. आज हा वेग ताशी 300 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचलाय. जपानमधील ‘शिनकांसेन’ ही ट्रेन साधारणपणे ताशी तीन किलोमीटर वेगाने धावते. हा वेग तोंडात बोट घालाय लावणारा आहे. या ट्रेनच्या वेगाचं रहस्य तिच्या आकारातचं दडलं आहे. ‘एअरोडायनॅमिक’ आकारामुळे बुलेट ट्रेनचा वेग वाढण्यास मदत होते. समोरुन येणाऱ्या हवेचा कमीत कमी विरोध व्हावा, असा ट्रेनचा आकार ठेवला जातो. तसंच ट्रेनचे डब्बे चोहोबाजूंनी बंद ठेवले जातात. हवेला विरोध होणार नाही असा त्याचा आकार ठेवला जातो. वेगवान समजल्या जाणाऱ्या या ट्रेननं फ्रान्स, जर्मनी, आणि स्पेनलाही मागे टाकलंय. अहोरात्र वेगाशी स्पर्धा करणाऱ्या या ट्रेनची दररात्री बारा वाजता देखभाल दुरस्ती करण्यात येते. कारण या बुलेट ट्रेनला केवळ वेगच नाही तर सुरक्षिततेचे भान आहे हे विशेष.
बुलेट ट्रेनचे जनक असलेल्या जपानने भारताला बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान देऊ केलं आहे. सर्वाधिक वेगवान ट्रेनचा उच्चांक जपानच्या एका ट्रेनच्या नावावर असून ती ट्रेन ताशी ५८१ किलोमीटर वेगाने धावलीय. रेल्वेच्या रुळावरुन सर्वात वेगाने धावण्याचं रेकॉर्ड एका मानवरहित रॉकेटनं नोंदवलं आहे. ते रॉकेट अमेरिकेच्या सैन्यदलाने तयार केलं होतं.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरआज बुलेट ट्रेनसाठी दोन प्रणालींचा वापर केला जातो. या दोन्ही प्रणालीत ट्रेनची चाकं हवेत असतात. कारण रेल्वे रूळावर बसविण्यात आलेले चुंबकीय पट्टे, रेल्वेच्या खाली लावण्यात आलेल्या चुंबकाला सतत ओढत तसेच दूर ढकलत असतात. वीजेच्या उच्च दाबामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात ही प्रक्रिया सतत होत असते. त्यामुळे ट्रेन हवेवर तरंगत वेगाने धावते. या प्रणालीवर दोन प्रकारच्या बुलेट ट्रेन चालविल्या जातात. पहिली ट्रेन जर्मनी आणि युरोपात चालविल्या जाणाऱ्या ‘मॅग्नेटिक लॅव्हिटेशन’ तंत्रज्ञानावर आधारीत आहे. तर दुसरी जपान आणि चीनमध्ये चालविल्या जात असलेल्या ‘इलेक्ट्रोडायनॅमिक’ तंत्रज्ञानावर आधारीत आहे. मॅग्नेटिक लॅव्हिटेशन प्रणालीत शक्तिशाली चुंबकाच्या आधारे ट्रेन चालविली जाते. तर, ‘इलेक्ट्रॉडायनॅमिक’ प्रणालीत सुपरकूल सुपर कंडक्टर इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. बुलेट ट्रेनचे रुळ, सिग्नल यंत्रणा सगळकाही वेगळचं असतं. जपानमध्ये १४३५ एमएम गेजच्या लाईनचा वापर करण्यात आलाय. तिथले रुळ एकतर जमीनपासून उंचीवर किंवा भुयारी मार्गात आहेत. त्या रुळावर प्रवाशांना जाण्यास बंदी आहे. तसेच रेल्वे रुळांची रोज देखभाल केली जाते. त्यामुळेच या रेल्वे मार्गावर गेल्या ४५ वर्षांत एकही रेल्वे अपघात झालेला नाही.
.
First Published: Thursday, June 7, 2012, 22:49