Last Updated: Friday, June 8, 2012, 22:40
जगातील कोट्यवधी लोक आहेत भयग्रस्त!
प्रत्येक व्यक्तीला पछाडलंय भीतीनं!
प्रत्येक महिलेलाही सतावतेय भीती!
आप्तेष्टांशी असलेला संपर्क तुटण्याची काहींना वाटतेय भीती!
कुणाला खासगी माहिती हरवण्याचं वाटतंय भय!
कुणाला मोबाईल फोन हरवण्याची भीती सतावतेय!
कोट्यवधी लोकांच्या भीतीमागचं काय आहे कारण?
जाणून घेऊयात ‘मोबाईल फोबिया’मधून...
www.24taas.comब्रिटनमध्ये नुकतंच एक संशोधन करण्यात आलंय. त्या संशोधनातून जे काही निष्कर्ष निघाले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांना सतत एक अनाहूत भीती सतावत असते आणि ती भीती कोकेनच्या नशेपेक्षाही भयंकर आहे. ती आहे, मोबाईल फोन हरवण्याची भीती! दिल्लीच्या एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करणाऱ्या समृद्धीलाही याच भीतीने ग्रासलंय. राजधानी दिल्लीतील धकाधकीच्या जीवनात ऑफिसातील टार्गेट पूर्ण करण्याचा सतत दबाव असतानाही समृद्धीला मोबाईल फोन हरवण्याची भीती चोवीस तास सतावत असते. मोबाईल फोन हरवण्याच्या भीतीने ग्रासलेली केवळ समृद्धी एकटीच आहे असं नाही, तर जगभरात कोट्यवधी लोकांना या भयाने पछाडलं आहे. जरा शांतपणे विचार केल्यास आपणही त्यापैकीच एक आहोत याची जाणीव आपल्यालाही होईल. दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सात दिवस. फोन हरवण्याची भीती सतावत असते. खरं तर लोक या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात. पण, ही बाब आता दुर्लक्ष करण्यासारखी राहिली नाही. नुकतंच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार आज ६६ टक्के मोबाईल फोनधारकांना आपला मोबाईल हरवणार तर नाही ना? या भीतीने पछाडलंय. हे भयग्रस्त लोक दिवसातून साधारणत: ३४ वेळा आपल्या मोबाईल फोनची चाचपणी करतात. ७७ टक्के मोबाईल फोनधारक तरुण-तरुणी मिनिटभरही मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत. इतकी त्यांना मोबाईल फोनची सवय जडली आहे. हे संशोधन ब्रिटनमध्ये करण्यात आलं असलं तरी भारतासह जगभरात त्या अनाहूत भीतीचं सावट आज पहायला मिळतंय. मोबाईलमधील मेसेज पाहण्याचं राहून तर गेलं नाही ना? मोबाईल फोनची रिंग तर वाजली नाही ना? अशी शंका आज प्रत्येक मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तीला सतावतेय. आपला मोबाईल फोन वारंवार सुरु करून पाहण्याची सवय याच भीतीमुळे अनेकांमध्ये दिसून येते.
आपणही फोनचे गुलाममोबाईल फोनमुळे भीती वाटणारे केवळ ब्रिटनमध्येच आहेत असं नाही तर भारतातही त्यांची संख्या मोठी आहे. २०१० साली इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातही याच बाबीकडं अंगुली निर्देश करण्यात आला होता. फोन नंबर विसरला, नाव विसरलं आणि अशातच मोबाईल फोनही हरवल्यास एखाद्या अनोळखी शहरात आपली मोठी पंचायत होईल, अशी भीती अनेकांना वाटत असते. एकाकी पडण्याची भीती मानवाला अनंत काळापासून सतावत आलीय. पण, आज जी भीती सतावतेय त्या अनाहूत भीतीचं नाव आहे ‘नोमोफोबीया’... अर्थात ‘नो मोबाईल फोबिया... जगाशी जोडणारा मोबाईल फोन हरवण्याची भीती मोबाईल फोनधारकांना छळू लागलीय. ब्रिटनमध्ये नुकतेच यासंबंधी एक संशोधन करण्यात आलंय. त्यानुसार ६६ टक्के मोबाईल फोनधारक त्या अनाहूत भीतीचे शिकार ठरल्याचं उघड झालंय. २०१० साली ‘इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडीसीन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातही याच बाबींकडं अंगुलीनिर्देश करण्यात आला होता. इंदोरच्या एमजीएम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी १९ टक्के विद्यार्थ्यांना नोमोफोबिया असल्याचं आढळून आलं. यावरुन नोमोफोबिया आता केवळ भीती पुरताच मर्यादीत आहे असं नाही तर, त्याने एका आजाराचं रुप धारण केलंय. नोमोफोबियाने ग्रस्त असलेल्या लोकांजवळ मोबाईल फोन असला किंवा नसला तरी त्यांचं वर्तन वेगळ्याच प्रकारचं असतं. नोमोफोबिया झालेल्या व्यक्तीच्या भीतीचे अनेक प्रकार असल्याचं संशोधनातून पुढं आलं आहेत. उदाहरणार्थ फोन स्विच ऑफ करण्यास ते लोक धजावत नाहीत, आपल्या मोबाईल फोनची बॅटरी वारंवार चार्ज करतात, फोन बंद पडू नये यासाठी ते बॅटरी चार्ज करत असतात, मिस्ड कॉल आणि एसएमएस तपासून पाहतात, प्री-पेड कनेक्शनधारक प्रत्येक कॉलनंतर बॅलन्स तपासून पाहतात, मोबाईल फोनमधील बॅलन्स संपला तर नाही ना? अशी भीती त्यांना सतावत असते, फोन हरवल्यानंतर आप्तेष्टांचे फोन नंबर हरवण्याची भीती सतावत असते, काहींना आपली खासगी माहिती हरवण्याची भीती वाटत असते. आणि हीच भीती आता एखाद्या नशेप्रमाणे मोबाईलधारकांना जडली आहे. ही अस्वस्थ करणारी अनाहूत भीती किती भयंकर किती आहे हे ‘मार्केट एनालिसिस अँड कन्झुमर ऑर्गनायझेशन’च्या संशोधनातून उघड झालंय. मुंबईत करण्यात आलेल्या संशोधनात जवळपास ५८ टक्के लोक मोबाईल फोनशिवाय एक दिवसही राहू शकत नसल्याचं समोर आलंय. आजच्या युगात फोन शिवाय काम करणं कठीण असलं तरी आपण मोबाईल फोनचे गुलाम तर झालो नाहीत ना? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागलीय.
‘नोमोफोबीया’वर उपाय काय?मोबाईल फोनशी माणसाचं एक वेगळचं नातं जोडलं गेलं आहे. प्रत्येक क्षणाला त्याची आठवण होते. दुसऱ्याच्या फोनची रिंग वाजली तरी आपला फोन तर वाजला नाही ना अशी शंका येते. एका मोबाईल फोनने लोकांची ही अवस्था केलीय. आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल फोन हे लोकांशी सतत संपर्कात राहण्याचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. पण, अनेक लोकांना मिस्ड कॉल तसेच फोन हरवण्याची भीती सतावत असते. आपला हरवलेला मोबाईल फोन पुन्हा मिळावा म्हणून लोक पोलिसांकडं दाद मागतात. महागडा किंवा गिफ्ट म्हणून मिळालेला फोन हरवल्यास तो परत मिळवण्यासाठी लोक पोलिसांकडं धाव घेतात. खरं तर आप्तेष्ट तसेच व्यवसायातील सहकाऱ्यांचे फोननंबर पुन्हा मिळावेत, हा त्यामागचा हेतू असतो. आपली खासगी माहिती अनोळखी व्यक्तीच्या हाती लागू नये, अशी भीती ‘नोमोफोबीया’ग्रस्तांना वाटत असते. त्यामुळेच मोबाईल फोन खरेदी करतेवेळी या बाबींची काळजी घेतली जाते. लोक स्वत: पेक्षाही आपल्या फोनची जास्त काळजी घेतांना दिसतात. हरवलेला फोन परत मिळावा म्हणून आज बाजारात नवनवे सॉफ्टवेअर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मोबी कॉप, मोबी सेक्युरीटी यांसारखे अनेक सॉफ्टवेअर आज बाजारात उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरच्या मदतीने हरवलेल्या फोनची माहिती मिळवता येते. मोबाईल फोन हरवण्याच्या भीतीवर उपाय म्हणून तुम्ही अशा सॉफ्टवेअरची मदत घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हीला थोडा खर्च करावा लागेल. फोन हरवण्याच्या भीतीतून तुम्ही अशा पद्धतीने सुटका करुन घेऊ शकतात पण मिस्ड कॉल, फोनची रिंग वाजल्याचा भास, एसएमएस या चक्रातून सुटका कशी होणार? हाच खरा प्रश्न आहे.
घ्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत...तुमच्या हातात असलेल्या मोबाईलबद्दल असलेली ही भिती अनाठायी नाही, तर त्याला मानसिक आणि वैद्यकिय कारणंही आहेत. खरं तर भीतीचं काहीच कारण नसतं पण तरीही भीती वाटणं,
मोबाईलवर बोलत असताना अचानक मोठ-मोठ्याने बोलू लागणं, ह्रदयाचे ठोके वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, कोणत्याच कामात मन न लागणं, मानसिक तनाव जाणवणं ही लक्षणं एखाद्या व्यक्तीत दिसत असतील आणि वारंवार मोबाईल फोनची रिंग वाजल्याचा भास होत असले, तो हरवण्याची भीती वाटत असेल, तर एकदा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्यावा. मोबाईल फोन हरवण्याच्या भीतीमुळे होणारा नोमोफोबिया केवळ एक सवय नाही तर कालांतराने त्याचा मेंदू आणि ह्रदयावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही वस्तूविषयी जास्त जिव्हाळा निर्माण झाल्यास मेंदूला सूचना देणाऱ्या निअरोट्रान्समिटरशी त्याचा संबंध जोडला जातो. ती वस्तू जवळ असल्याचं निअरोट्रान्समिटरनं वाटतं. पण ती वस्तू जेव्हा जवळ नसते तेव्हा मेंदूत निअरोट्रान्समिटर्सची कमतरता निर्माण होते. त्यामुळे ती व्यक्ती चिडचिडी होते, त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागतं, रक्तदाब वाढू लागतो, मानसिक तणाव जानवतो तसेच मनोविकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोमोफोबिया गंभीर असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत.
फोन हरवणं तसेच मिस्ड कॉलच्या भीतीमुळे तुम्हालाही अस्वस्थ वाटत असेल तर या गोष्टीकडं दुर्लक्ष करु नका. कारण ही धोक्याची घंटा ठरु शकते. त्या भीतीचा तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही त्या अस्वस्थतेवर वेळीच लगाम लावला नाही तर तुमच्या रोजच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.
First Published: Friday, June 8, 2012, 22:40