डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ? - Marathi News 24taas.com

डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ?

www.24taas.com, मुंबई
 
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक  कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे. राजकारणात अडकलीय का इंदू मिलची जमीन? इंदू मिलच्या प्रश्नावर सरकार खरंच  गंभीर आहे का  ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे. प्राईम वॉचमध्ये...कधी होणार स्मारक ?
 
 
इंदू मिलच्या प्रश्नावरुन आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत...मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाने केला.
 
 
ही दृष्य आहेत आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची. मुंबई आणि उपनगरांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलंय...ठिकठिकाणी रेल्वे  आणि महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.
 
 
मुंबईत आरपीआय कार्यकर्त्यांनी बोरीवली स्टेशनवर रेल्वे रोखून धरत स्टेशनबाहेरही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलाय...बोरीवली प्रमाणेच भांडूप स्टेशनवरही कार्यकर्त्यांनी कल्याण-सीएसटी लोकल रोखून धरली.. वरळी नाका आणि मुलुंड मध्येही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा इंदू मिलचा विषय चर्चेत आला आहे.  गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इंदू मिलच्या मुद्द्यावरुन आनंदराज आंबेडकर यांनी मोठं आंदोलन केलं होतं. आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी  इंदू मिलचा ताबा घेतला होता.त्याआंदोलनानंतर  ही जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या हलचालींना वेग आला. पण प्रत्यक्षात जमीन काही हस्तांतरीत केली गेली नाही...त्यामुळेच  रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्विकारलाय.
 
इंदू मिलच्या प्रश्नावरुन आरपीआयने आंदोलन सुरु केलंय खरं पण त्यावरुनही आता आरपीआय आठवले गट आणि रिपब्लिकन सेना यांच्यात कलगीतुरा रंगू लागलाय. रामदास आठवलेंना आताच का इंदू मिलचा प्रश्न आठवला, असा सवाल आनंदराज आंबेडकरांनी केला आहे. मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात राजकारण्यांकडून अशा प्रकारे  वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली खरी  पण त्यावर प्रत्येक्षात कारवाई मात्र केली गेली नाही.
 
 
नवं आश्वासन ...जनतेची बोळवण
बाबासाहेबांची जयंती असो की महपरिनिर्वान दिन ... प्रत्येकवेळी राजकारण्यांनी नवं आश्वासन देवून आंबेडकरी जनतेची बोळवणच केलीय...दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी आंबेडकरी जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे...चैत्यभूमीला लागून असलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून   रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेकडून पाठपुरावाही केला जातोय
 
.. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच मुद्द्यावरुन मोठं आंदोलन झालं ...आनंदराज आंबेडकरांनी आपल्या समर्थकांसह इंदू मिलचा ताबा घेतला होता...ते आंदोलन  बरंच गाजलं...आनंदराज आंबेडकरांच्या आंदोलनानंतर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी इंदू मिलमध्ये जाऊन आंदोलन केलं होतं...इंदू मिल प्रकरणाचं श्रेय घेण्यावरुन जणू स्पर्धच लागली  होती....जशी रिपब्लिकन नेत्यांमध्ये स्पर्धा होती तशीच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही चढाओढ लागली होती... आनंदराज आंबेडकरांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून राष्ट्रवादीने गृहमंत्र्यांना धाडलं ...तर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँग्रेसने  मुख्यमंत्र्यांना पुढं केलं होतं.
 
 
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानशी भेट 
 
२००३ मध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी चैत्यभूमीच्या विकासासाठी इंदू मिलची जामीन मागितली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय..तर  सुरुवातीपासून आपण हा मुद्दा लावून धरल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचं म्हणनं आहे.
 
 
इंदू मिलच्या मुद्द्यावरुन आज रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जे आंदोलन केलं जातयं तो  राजकीय स्टंट असल्याची टीका आनंदराज आंबेडकरांनी केलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्यास सरकारने तत्वत: मान्यता दिलीय खरी पण त्यावर कारावाई कधी होणार असा प्रश्न आंबेडकरी जनतेकडून विचारला जातोय. तर इंदू मिलच्या प्रश्नावर आठवले गटाचं  आंदोलन हे सरकारवर दबाव आणण्यासाठी सुरु केलं असल्याचं आठवले गटाचे नेते  अविनाश महातेकर यांनी सांगितले आहे.
 
 
व्हिडिओ  पाहा..
 

 

 

 

 

 

First Published: Tuesday, June 12, 2012, 22:34


comments powered by Disqus