गर्भपातासाठी बनावट प्रिस्क्रिप्शन! - Marathi News 24taas.com

गर्भपातासाठी बनावट प्रिस्क्रिप्शन!

www.24taas.com, पुणे
राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना अवैध गर्भपातासाठी पेशंटकडून डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन चा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडलीय.
 
डॉक्टर राजीव जोशी यांच्या लेटरहेडवर देण्यात आलेलं हे प्रिस्क्रिप्शन बनावट आहे. गर्भपातासाठी आवश्यक असलेली औषधं त्यावर लिहिण्यात आली आहेत. अवैध गर्भपात शक्य व्हावा तसंच तो करताना कारवाई होऊ नये, म्हणून काही लोक ही क्लुप्ती वापरतायत. याचाच अर्थ बीडमध्ये डॉक्टर मुंडे जे पाप खुलेआम करत होता तेच पाप पुण्यात छुप्या पद्धतीने सुरु आहे.
 
औषधं आणि सौंदर्य प्रशासन कायद्यानुसार गर्भपाताची औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. या औषधांचा पुरवठा, साठा आणि विक्रीचे रेकॉर्डस विक्रेत्यानं ठेवणं गरजेचं असतं. ज्यांच्या रेकॉर्ड मध्ये त्रुटी आढळल्या अशा ६६ विक्रेत्यांना FDA नं कारणे दाखवा नोटीसा बजावल्यायत. या कारवाईत त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो.
 
स्त्री भ्रूण हत्या असो वा अवैध गर्भपात, हा विषय फक्त बीड पुरताच मर्यादित नसल्याचं आता स्पष्ट झालंय. या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई बरोबरच सामाजिक संवेदनाही जागृत करणं गरजेचं आहे.

First Published: Tuesday, June 12, 2012, 21:45


comments powered by Disqus