कहाणी एका चिमुरड्याची... ‘झी २४ तास’च्या यशाची - Marathi News 24taas.com

कहाणी एका चिमुरड्याची... ‘झी २४ तास’च्या यशाची

www.24taas.com, मुंबई
 
दिवसाचे २४ तास ब्रेकिंग न्यूज आणि वेगवान घडामोडींच्या धबडग्यात संवदेनशीलता हरवू न देता आपली आवडती वृत्तवाहिनी 'झी 24 तास' सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘बालकामगार विरोधी दिनानिमित्त’ आम्ही आई-वडिलांपासून दुरावलेल्या एका लहानग्याची व्यथा मगळवारी एका वृतात दाखवली, आणि हे वृत्त पाहून या मुलाचे आई-वडीलांनी आमच्याशी संपर्क साधला आणि 'झी 24 तास'च्या न्यूजरुममध्ये या एकमेकांच्या शोधात असलेल्या मुलाची आणि त्याच्या पालकांची भेट झाली.
 
१३ जून २०१२ हा ‘झी २४ तास’साठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस ठरला. १२ मे रोजी ‘बालकामगार विरोधी दिनानिमित्त’ आम्ही ‘तारे जमीं पर...’ या नावानं एक कार्यक्रम दुपारी प्रसारित केला. मुंबईच्या चकचकत्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी घरातून पळून आलेल्या किंवा परिस्थितीनं अनाथ म्हणून जगायला लावणाऱ्या काही मुलांच्या कहाण्या आम्ही या कार्यक्रमातून जगासमोर मांडल्या. पण, यातली सगळीच मुलं काही अनाथ नव्हती. अशाच मुलांमधला एक म्हणजे रामबाबू यादव... रामबाबू गेल्या साडे चार महिन्यांपासून अलाहाबादवरून आपल्या घरापासून वंचित झाला होता. त्याला शोधत शोधत त्याच्या आई-वडिलांनी जंगजंग पछाडलं. पण रामबाबूचा पत्ता काही लागला नाही. मात्र, ‘झी २४ तास’च्या ‘तारे जमीं पर...’ या कार्यक्रमात मुंबईच्या रस्त्यांवर हिंडणाऱ्या, रेल्वे स्टेशनवर झोपून दिवस काढणाऱ्या आणि आई-वडिलांच्या भेटीसाठी आतूर झालेल्या रामबाबूची कहाणी त्यांनी बघितली. त्यांच्यासाठी हा जगातला सगळ्यात मोठा आनंद ठरला. ताबडतोब त्यांनी ‘झी २४ तास’च्या न्यूजरुमला फोन करून संवाद साधला... आणि एकमेकांपासून दुरावलेल्या आणि एकमेकांना शोधणाऱ्या लेकराची आणि त्याच्या आई-वडिलांची शेवटी ‘झी २४ तास’च्या न्यूजरुममध्ये भेट झाली.
 
‘झी २४ तास’च्या पत्रकारितेचंच हे यश होतं. रामबाबू आणि त्याच्या पाल्यासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण होताच पण एकमेकांपासून दुरावलेल्या माय-लेकरांच्या  भेटीचा क्षण पाहून झी २४ तासचं अवघं न्यूजरूमही भरून पावलं.
 
रामबाबू आणि त्याच्या पालकांच्या भेटीचा क्षण पाहण्यासाठी :

 
.
 

First Published: Thursday, June 14, 2012, 15:22


comments powered by Disqus