Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:27
www.24taas.com, चंद्रपूर चंद्रपूर येथे आयोजित बसपा कार्यकर्त्यांच्या सभेत आज तुंबळ युद्ध झाले. या सभेत जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीविरूध्द नाराज कार्यकर्त्यांनी बसपा प्रदेश अध्यक्ष विलास गरुड आणि अन्य नेत्यांना बेदम मारहाण केली. अखेर पोलीस संरक्षणात या सर्व नेत्यांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले.
चंद्रपूर जिल्हा बसपाची नवी कार्यकारिणी चंदू खोब्रागडे यांच्या नेतृत्वात नुकतीच जाहीर झाली. नव्या गटाने आपला पहिला मेळावा शहरातील शिंदे मंगल कार्यालयात आयोजित केला होता. या सभेला प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांच्यासह जिल्हाभरातून कार्यकर्ते हजर होते. मेळावा सुरु होताच नाराज कार्यकर्ते घोषणाबाजी करत स्टेजवर गेले. प्रदेश अध्यक्षांना त्यांनी जाब विचारला. यात वाद वाढला आणि अचानक स्टेजवर फेकाफेकी आणि धकाबुक्की सुरु झाली.
मारहाण, फ्री स्टाईल जोडीला होतीच. कार्यकर्त्यांचा अवतार पाहून गरुड आणि अन्य लोकांनी सभागृहातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हाणामारी सभागृहाबाहेरही सुरूच राहिली. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गरुड व अन्य नेत्यांना पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी पोचवले.
First Published: Sunday, June 17, 2012, 21:27