Last Updated: Monday, June 18, 2012, 23:57
www.24taas.com, मुंबई बेकायदा गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात तब्बल 26 दिवस फरार असलेला परळीतला डॉ मुंडे दांपत्य अखेर पोलिसांना शरण आलं. आणि प्रश्न निर्माण झाला तो तब्बल सव्वीस दिवस हे दाम्पत्य कुठे दडून राहील होतं.. आणि कोण होत यांचे आश्रयदाते.. मुडे दाम्पत्याच्या सव्वीस दिवसांच्या दाहीदिशा भ्रमंतीची ही कहाणी
23 मे 2012 ते 17 जून 2012 असे 26 दिवस डॉ. मुंडे फरार होता. त्यानं भाड्यानं घेतलेल्या बोलेरो गाडीचा ड्रायव्हर परमेश्वर अंकुशे आणि अष्टविनायक मेडिकलचा चालक संजय सोनी त्याच्यासोबत होते. बीड क्राईम ब्रांच, मुंबई क्राईम ब्रांच आणि पुणे क्राईम ब्रांचच्या पाच टीम डॉ. मुंडे दांपत्याला महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात शोधत होत्या. तरीही मुंडे सापडला नाही. अत्यंत चतुराईनं आणि तांत्रिक पद्धतीचा योग्य वापर करत त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. मोबाईल नंबर आणि सीम कार्डवरुन पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी डॉ. मुंडेंनं 26 दिवसांच्या प्रवासात तब्बल 17 मोबाईल्स आणि 70 सीमकार्ड्स बदलले.
23 मे 2012 रोजी डॉ. मुंडे दांपत्य परळीतून फरार झाले. 24 मे रोजी त्यांनी हैदरदाबादमध्ये डॉक्टर असलेल्या मित्राकडं मुक्काम केला. तिथून तिरुपतीकडे जातो असं सांगून तो विजयवाड्यातून पुन्हा महाराष्ट्रात परतला, महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात शिवपुरीमध्ये गेला. तिथून राज्यस्थानमधल्या जयपूर आणि उदयपूरमध्ये गेला, तिथून उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये, त्यानंतर पुन्हा मध्यप्रदेशातल्या कटनीमध्ये, तिथून छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये आणि झारखंडमध्येही त्यानं काही प्रवास केला. तिथून अखेर तो महाराष्ट्रात परळी पोलिसांना शरण आला. या प्रवासात त्यानं एका ठिकाणी एक दिवस किंवा फारतर दोन दिवस मुक्काम केला. पोलिसांना तो सापडला नसला तरी पोलिसांची पाळत आणि आर्थिक नाकेबंदी केल्यामुळं 17 जून रोजी परळीत मुंडे पोलिसांना शरण आला.
पोलिसांना चुकवण्यासाठी अनेक वेळा मुंडे दांपत्यानं तोंडाला काळे कपडे बांधून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तसंच मुंडे दांपत्य हॉटेलमध्ये एसी रुपममध्ये राहयचं तर गाडीचा ड्रायव्हर आणि अष्टविनायक मेडिकलाचा चालक संजय सोनी हे बोलेरो गाडीतच झोपायचे. एवढच नाही तर पोलिसांनी आर्थिक नाकेबंदी केल्यामुळं पैशांची चणचण जाणवल्यानंतर मुंडेनं दोन ठिकाणी हॉटेलची बिल न देताच पळ काढला. शरण येण्याच्या आधी 24 तास मुंडे दांपत्य परळी भागात फिरतं होतं. तर पोलिसांची पथकं परराज्यात त्याला शोधत होती. शेवटी चौफेर कोंडी झाल्यानंतर मुंडे पोलिसांना शरण आला.
डॉ.सुदाम मुंडेला अटक नाही तर शरणागती नंतर अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय..हे वाक्य अतिशय महत्वाचे आहे.. कारण याच वाक्यात अधोरेखित आहे.. अकार्यक्षमता आणि नेत्यांचा छुपा वरदहस्त.परळी पोलिसांना शरण येण्यापूर्वी डॉ. मुंडे दांपत्य 24 तास त्याच परिसरात होतं. त्याचवेळी पोलिसांच्या पाच टीम मुंडेचा परराज्यात शोध घेत होत्या. प्रसिद्धी माध्यमातून या प्रकरणाची एवढी चर्चा होऊनही त्याचा 24 तास परळी भागात पोलिसांना कसा थांगपत्ता लागला नाही असा प्रश्न पडतो. मुंडेला राजकीय आणि पोलिसांचं समर्थन असल्याशिवाय तो पोलिसांना गुंगारा देऊ शकतो का असा प्रश्न पडतो.
तब्बल 26 दिवस पोलिसांना डॉ. मुंडे सापडला नाही यावरही विश्वास ठेवणं अवघड आहे. एकतर मुंडेला शोधण्यात पोलीस कमी पडले किंवा त्याला लवकर शोधाण्यात त्यांना रस नव्हता असा सूर माजी पोलिस अधिका-यांकडून येतोय. नुकत्याच झालेल्या केज विधानसभा निवडणुकीतही डॉ. मुंडे कोणत्या पक्षाचा यावरुन चिखलफेक झाली. डॉ. मुंडे याच्याशी आपला काहीही संबंध नसून, ते राष्ट्रवादीचेच असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. केवळ आडनावामुळे आपली याप्रकरणात नाहक बदनामी होत असल्याचं सांगत, त्यांनी डॉ. मुंडे याचा मुलगा व्यंकटेशनं राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे फोटो दाखवले. याला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे आणि डॉ. मुंडे एकत्र असल्याचे फोटो जाहीर सभेत दाखवत गोपीनाथ मंडेंवर पलटवार केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुंडेंवर टीकास्त्र सोडवत लोकांनीच काय ते ठरवावं, असं सांगत मुंडेंना टोला लगावला.
दुसरीकडे मुंडेला राजकीय वरदहस्त असल्यामुळं त्याची केस जिल्ह्याबाहेर चालवावी अशी मागणी खुद्द बीडचे जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस महासंचलकांना पत्र लिहून केली होती. यावरुन पोलिसांवर किती राजकीय दबाव आहे याचा अंदाज येतो. डॉ. मुंडेच्या विरोधात याआधीही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. राजकीय आणि पोलिसांच्या पाठबळाच्या जोरावर त्यानं ते प्रकरण दडपून टाकलं होतं. 18 मे रोजी विजयमाला पेटकर या महिलेचा मुंडे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. आणि आजपर्यंत डॉ. मुंडेला पाठिंबा देणारे सर्वच नेते त्याच्याशी संबध नसल्याचं सांगत सुटले. जणूकाही त्यांना डॉ. मुंडेच्या काळ्या कृत्यांची माहितीच नव्हती. आता डॉ. मुंडे शरण आलाय. मात्र त्याचे सर्वपक्षीय नेत्यांशी आणि पोलिसांशी असलेले मधुर संबध पाहता यापुढे तरी त्याच्यावर कठोर कारवाई होणार का याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात शंकाच आहे.

डॉक्टर सुदाम मुंडे भ्रुण हत्याचे जे प्रकार करायचे ते एकूनही अंगावर काटा येईल.. या विकृतीतूनच असंख्य जिव जगात मोकळा श्वास घेण्या आधीच खुरडले गेले.. मुंडे हॉस्पीटलमध्ये कसं चालायचं हे कृष्णकृत्य.. यावर हा एक्स रे..
डॉ. सुदाम मुंडे किती निर्ययीपणे गर्भपाताची काळी कृत्य करायचा याचा अंदाज त्यानं एका पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरुन येतो. एका पत्रकरानं त्याला तुम्ही स्त्री भ्रूण का मारली असा प्रश्न केला होता. त्यावर डॉ. मुंडेनं एखाद्या खाटकाला गाय असेल किंवा म्हैस याचा काय फरक पडतो अस अत्यंत निर्दयी आणि निर्लज्ज उलट प्रश्न केला होता. हॉस्पिटलला येण्यापूर्वी पेशंटना त्यांचं वाहन परळी वैजनाथ मंदिरापाशी पार्क करायला सांगितलं जायचं. तिथून रिक्षानं हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितलं जायचं. हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी पेशंटची संपूर्ण तपासणी केली जायची. त्यानं हिडन कॅमेरा तर आणला नाही ना याचीही खबरदारी घेतली जायची. आत मोबाईल आणायला बंदी केली जायची. एका छोट्या रुममध्ये सोनोग्राफी केली जायची. त्या ठिकाणी डॉक्टर आणि मशीन्सही दिसत नव्हती. तपासणीनंतर जुन्या बिल्डिंग शेजारच्या दुस-या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यास सांगितलं जायचं.
मराठवाड्यातल्या पेशंटसाठी 5 ते 10 हजार रुपये फी. तर मराठवाड्याबाहेरच्या पेशंटसाठी 25 ते 30 हजार रुपये फी आकारली जायची. सोनोग्राफीचं काम डॉ. सरस्वती मुंडे करायची. स्त्रीरोग तज्ज्ञ असलेली डॉ. सुदाम मुंडेची पत्नी केसपेवर कोड लँग्वेजमध्ये 16 आणि 19 असे इंग्रजीतून नंबर लिहीत असे. इंग्रजीतून लिहिलेले 16 म्हणजे एक मुलगा. 16 आकड्यातला 1 आकडा म्हणजे एक आणि 6 हे इंग्रजी बी सारखे दिसते त्यावरुन 1 बॉय अशी सांकेतीक भाषा वापरली जात असे. तर इंग्रजी 19 म्हणजे 1 मुलगी. 9 आकडा हा इंग्रजीतल्या जी या अक्षरासारखा दिसतो. यावरुन 1 मुलगी असा त्याचा अर्थ काढला जायचा.
ज्या पेशंटच्या केसपेपरवर 16 आकडा लिहिला आहे. त्यांना घरी जाण्यास सांगितलं जायचं तसंच देवाला मिठाई देण्यास विसरू नका तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं सांगितलं जायचं. ज्या पेशंटच्या केसपेपरवर 19 आकडा लिहिला आहे. त्यांना डॉ. सुदाम मुंडेकडं पाठवलं जायचं. त्यांचा तो गर्भपात करत असे. एका महिलेनं भ्रूण घरी घेऊन जाण्यास नकार दिला. तेंव्हा डॉ. सुदाम मुंडेनं त्यांना एका खोलीत दोन कुत्रे दाखवले. जे पेशंट भ्रूण घरी घेऊन जाण्यास तयार नसत त्यांची अर्भके कुत्र्याला खायला दिली जात असे. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी डॉ.मुंडे हॉस्पिटलमध्ये स्टींग ऑपरेशन केले त्यामध्ये सामिल असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या जाधव यांनी ही माहिती त्यांच्या शपथपत्रात कोर्टाला सादर केली आहे.
तसंच मुलगा की मुलगी हे सांगण्यासाठी सोमवार किंवा शुक्रवार हे सांकेत शब्दही वापरले जायचे. सोमवार म्हणजे शंकराचा दिवस म्हणजे मुलगा तर शुक्रवार म्हणजे देवीचा दिवस म्हणजेच मुलगी असा प्रकारचे सांकेतिक शब्द वापरले जायचे. सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यानं तपासणी आणि गर्भपात करण्याची फी वाढवली होती. फीवाढीचं कारण त्यानं जास्त रिस्क असल्याचं सांगितलं होतं. गर्भपात करण्यासाठीची लागणारी सर्वाधिक औषधं खरेदी करण्या-या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलपैकी डॉ. मुंडे हॉस्पिटल होते हेही तपासणीत उघड झालं आहे.
First Published: Monday, June 18, 2012, 23:57