कोकण भवनची सुरक्षा रामभरोसे - Marathi News 24taas.com

कोकण भवनची सुरक्षा रामभरोसे

www.24taas.com, नवी मुंबई
 
नवी मुंबईत सिडको भवनसमोरच असलेली कोकण भवनची इमारत हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. या अत्यंत महत्वाच्या इमारतीमध्येही आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावी नाहीत. अग्निशामक उपकरणे बसवण्यात आली असली तरी प्रत्येक मजल्यावर वीज वायरींचं जाळं विस्कळीत आहे. सहाव्या मजल्यावर तर पॅसेजमध्ये दोन्ही बाजूंनी लाकडी समान आणि कागदांचे गठ्ठे आहेत.  या स्थितीचा  घेतलेला हा आढावा.
 
मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांची सुरक्षा चव्हाट्यावर आलीये. नवी मुंबईतल्या 'सिडको भवन' या इमारतीत आग रोखण्यासाठीची आवश्यक यंत्रणा कुचकामी झालीये. भिंतीवर लटकलेली अग्निशामक उपकरण कालबाह्य झालीयेत. झी २४ तासच्या टीमनं हे धक्कादायक वास्तव समोर आणलंय.
 
नवी मुंबईत नागरी वसाहतींसह विमानतळ, मेट्रो रेल्वे, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स अशा विविध महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी सिडकोकडे आहे. अतिशय महत्वाच्या अशा सिडको भवनात आग सुरक्षा यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत. सिडको भवनातील आतली दृश्य पाहिल्यावर प्रशासकीय उदासिनतेचा नमुना पाहायला मिळतो.
 
इमारतीच्या मागील बाजूस दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर जीवन प्राधीकरणाचं कार्यालय आहे. लोकांची वर्दळ असलेल्या या मजल्यावर मोकळ्या पॅसेजमध्ये सर्व लाकडी सामान आहे. अगदी तिथेच कालबाह्य झालेली सहा अग्निशामक उपकरणं आहेत. अग्निशामक उपकरणं एका विशिष्ट अंतरावर ठेवणे गरजेचे असते. मात्र इथं हे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.
 
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सिडको सारख्या महत्वाच्या निमशासकीय संस्थेनं धडा घेणे गरजेचे आहे. परंतु इथली यंत्रणा झोपलेलीच आहे. झी 24 तासनं केलेल्या फायर ऑडीटमध्ये ही इमारत नापासच झालीये. दररोज लोकांची मोठी वर्दळ असलेल्या या इमारतीची सुरक्षा सध्या तरी राम भरोसेच आहे.

First Published: Sunday, June 24, 2012, 19:09


comments powered by Disqus