Last Updated: Tuesday, June 26, 2012, 00:01
www.24taas.com, नाशिक देवभूमीवर सुरु झालंय बिल्डरांचं तांडवब्रह्मगिरीला पडतोय बांधकामाचा विळखा..गोदावरीच्या मुखावर बिल्डरांची वक्रदृष्टी..कोण सोडवणार ब्रह्मगिरीचा विळखा ? आक्रोश ब्रह्मगिरीचा ! 
नाशिककरांसाठी एक धोक्याची बातमी.... लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झालीयत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत. हिरव्यागार कुशीत वसलेलं हे ब्रह्मगिरी...... लाखो भाविकांचं श्रद्धास्थान.... इथल्याच गंगाद्वाराजावळ गोदावरीचा उगम झाला आणि तिनं राज्यभरात हरितक्रांती केली. आता थेट तिच्या उगमाच्या ठिकाणीच जेसीबीचे घाव घातले जातायत. पर्वताचे ठिकठिकाणी लचके तोडले जातायेत... पर्यावरणाचे नियम धाब्यावर ठेवत चार पाच मजली बांधकाम सुरू झालंय. शेकडो झाडांवर कु-हाड प़डलीय. ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वरातल्या नागरिक या प्रकारामुळे व्यथित झालेत. नाशिकला स्वच्छ आणि सुंदर वातावरण देणारा हा नाशिकचा हिमालयच आता विकला जातोय. जागा मिळेल तिथे सपाटीकरण करून कुठे बंगले तर फार्म हाउस डौलात उभी राहतायत. त्यामुळे भूस्खलन तसच दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय.
स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या आशीर्वादाने होणा-या निसर्गावरच्या या अतिक्रमणाबाबत सगळेच मुग गिळून गप्प आहेत. राज्यातले मंत्री आणि नेतेही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. पर्यावरण विभागानं धोरण अधिक कडक केलं नाही तर नाशिकचा -हास अटळ आहे. त्र्यंबकेश्वरातील ब्रम्हगिरीला वाचविण्यासाठी झी २४ तासच्या मोहीमेला आता जनआंदोलानाची साथ मिळतेय. त्रिंबक गावातल्या पुरोहितांनी बैठक घेत ब्रह्मगिरीच्या आसपास होणा-या बांधकामांना विरोध केला आहे. तसंच तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढत अवैध बांधकामावर कारवाई करण्याचा आग्रह धरला. हा मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नव्हे तर हा आहे पुरोहित आणि पुजकांचा...

कुठलं मंदिर वा विश्वस्त संस्थेच्या विरोधात नव्हे तर हा मोर्चा आहे नाशिकच पर्यावरण अबाधित राखणा-या शिखर ब्रह्मगिरीला वाचविण्यासाठी...गंगागोदावरीचं उगमस्थान असलेल्या गौतमी ऋषींच्या या पर्वतावर बड्या धेंडांची वाकडी व्यावसायिक नजर पडलीय....महादेवांचे आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरात देशभरातील भाविक श्रद्धेनं येतात. मात्र याठिकाणी अवैधरीत्या उत्खनन करुन बांधकामे होत असल्याची बातमी झी 24 तासनं प्रसारीत केली होती. यानंतर स्थानिक त्रिंबकवासियांनी प्रशासनाविरोधात दंड थोपटलेत.
दोनदा काम बंद करत तालुका प्रशासनानं दंडाची नोटीस बाजावली होती. मात्र जागामालकांनी आपले काम सुरुच ठेवल्यानं स्थानिकांनी शासनाकडं निर्बंध आणण्याची मागणी केलीय. तहसिलदारांनीही पर्यावरण विभाग, भूगर्भजल विभाग यांना याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगितलं. ब्रम्हगिरीचं नव्हे तर आजूबाजुला असलेल्या सह्याद्रीच्या कडा कपारीही कुंपणांच्या भक्ष्यस्थानी पडतायत. अनेक ठिकाणी अवैधरित्या उत्खनन होऊनही प्रशासन निमुटपणे बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालत आहे. त्रिंबकवासियांबरोबर नाशिकच्या पर्यावरणवाद्यांनी आता जागृत होऊन नाशिक वाचविण्याची गरज आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झालीयत.

ही बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्याचबरोबर पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू असल्यानं हे प्रकरण आम्ही लावून धरलं होतं. अखेर हे बांधकाम थांबवण्यात आलंय. ब्रह्मगिरीवर सुरू असलेल्या या बांधकामाविरोधात झी 24 तासनं आवाज उठवताच, त्र्यंबकेश्वरवासियांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचबरोबर त्यांची एक बैठकही झाली. थेट गोदावरीच्या उगमाच्या ठिकाणीच जेसीबीचे घाव घातले जात होते. पर्वताचे लचके तोडले जात होते. शेकडो झाडांवर कु-हाड प़डली. ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वरातल्या नागरिक या प्रकारामुळे व्यथित झाले होते. अखेर झी 24 तासनं याविरोधात आवाज उठवल्यानं ब्रह्मगिरीवरचं काम बंद करण्यात आलंय.
First Published: Tuesday, June 26, 2012, 00:01