'जागतिक वारशाचा बहुमान, संवर्धनाचं काय?' - Marathi News 24taas.com

'जागतिक वारशाचा बहुमान, संवर्धनाचं काय?'

www.24taas.com, मुंबई
 
युनेस्कोनं जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीत आपल्या पश्चिम घाटाला मानाचं स्थान मिळालंय. जैव विविधतेनं नटलेल्या पश्चिम घाटाला हा बहुमान मिळाल्यानं, तमाम भारतीयांची छाती अभिमानानं भरून आलीये. पण, त्यासोबतच गरज निर्माण झालीये ती पश्चिम घाटाच्या संवर्धनाची. 'बहुमान मिळाला, संवर्धनाचं काय ?' यावर भाष्य...
 
भारतातल्या पाच राज्यांमध्ये विस्तृतपणे पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, पावसाचं विभाजन करण्याची महत्वाची भूमिका बजावतात. जैव विविधतेची खाण असलेला आणि कुणालाही भुरळ पडावी असं निसर्गसौंदर्य लाभलेला पश्चिम घाट, म्हणूनच आपल्यासाठी खास आहे.
 
ताजमहल, अजंठा, एलिंफटा, कोणार्क, लाल किल्ला या पाठोपाठ आता पश्चिम घाटही जागतिक वारसा म्हणून ओळखला जाणारय. प्रचंड मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेलं पूर्व हिमालयाप्रमाणे भारतातलं दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे पश्चिम घाट..कुणालाही भुरळ पडावी असाच इथला निसर्ग...चोहोबाजुंनी हिरवाईचा शालू नेसलेली सृष्टी...पाण्याचा खळखळाट, पक्षांची किलबिल....थंडगार हवेची झुळूक येताच शहारून जाणारी रंगीबेरंगी फुलं...अगदी एखाद्या कथा-कादंबरीतलं वर्णन डोळ्यासमोर यावं असंच हे पश्चिम घाटातली दृश्य....भारतातल्या पाच राज्यांमध्ये विस्तृतपणे पसरलेली ही पर्वतरांग पश्चिमेकडील राज्यांमध्ये पावसाचं विभाजन करण्याची महत्वाची भूमिका बजावते.
 
या घाटाची लांबी 1600 कि.मी असून एकूण क्षेत्रफळ अंदाजे 1 लाख 60 हजार चौ.कि.मी इतकं आहे. देशातल्या 27 टक्के वनस्पती या घाटावर आढळतात. इथं पाच हजारहून जास्त वनस्पती आढळतात. 149 प्राण्यांच्या प्रजाती, 508 पक्षांच्या प्रजाती आणि 189 उभयचर प्राण्यांच्या प्रजातीं हे पश्चिम घाटात दिसून येतात. याशिवाय 334 प्रकारची फुलपाखरं...आणि गोगलगायीसारखे 257 प्रकारचे कीटकही इथं आढळतात.
 
या घाटातील कास पठार, कोयना अभयारण्य म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीनं आनंदाची पर्वणीच...दरवर्षी हजारो पर्यटक, वन्यजीव अभ्यासक कास पठाराला आणि कोयना अभयारण्याला भेट देतात. युनेस्कोनं पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा दिल्यानं इथला निसर्ग आता आणखीनंच बहरलेला दिसणारयं. जागतिक वारसात पश्चिम घाटाला स्थान मिळाल्यानं त्याच्या संरक्षणासाठी युनोस्को सक्रिय राहिल. त्यामुळे यापुढच्या काळात पृथ्वीवरचा स्वर्ग, स्वर्गच राहिल अशी आशा करायला हरकत नाही.
 
निसर्गानं दिलेलं वरदान 
 
जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेला पश्चिम घाट म्हणजे भारताला निसर्गानं दिलेलं वरदानच म्हणावं लागेल...जगण्याची नवी उमेद देणारा हा घाट. इथला निसर्ग, त्याचं रूप न्याहाळल्यानंतर, उर्मी मिळाल्याशिवाय राहत नाही. अनेकांना इथं आल्यानंतर नवसंजीवनी मिळते. काय आहेत या पश्चिमी पर्वतराजीचं वैशिष्ट्य. स्पेशल रिपोर्ट...
 
सुमारे 150 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवन खंडाचे तुकडे होऊन सह्याद्रीची निर्मती झाली. तुकड्याची पश्चिमेकडची बाजू म्हणजेच हा पश्चिम घाट...निलगिरी, सेवरायन, तिरूमला या छोट्या पर्वतरांगा पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडतात. मोसमी वा-यांना अडवून दक्षिण भारतात पाऊस पाडण्याची प्रमुख भूमिका पश्चिम घाट बजावतो. या कारणामुळेच त्याला दक्षिणभारताचा पर्जन्यदाता असं म्हंटलं जातं. पावसामुळे गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्यांचा उगम इथेच होतो. (नद्यांचे शॉट्स )पश्चिम घाटाच्या उत्तर आणि दक्षिण भागात पानगळीची सदाहरित जंगलं आढळतात. पाच हजाराहून अधिक जातीच्या वनस्पती असलेला हा घाट प्राणी, पक्षांसाठी हा घाट म्हणजे नंदनवनच...भारत सरकारनं इथली अनेक जंगलं संरक्षित केलीयेत. यात 2 संरक्षित जैविक क्षेत्रे, 13 राष्ट्रीय उद्यानं आणि अनेक अभयारण्यांचा समावेश आहे.
 
पर्यटनाचा विचार केल्यास या घाटावरील वैविध्यपूर्ण नैसर्गीक संपत्ती जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या निर्मीतीसाठी उपयोगी आहे. महाबळेश्वर, ऊटी, मडीकेरी हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल...(महाबळेश्वर किंवा ऊटीच्या निसर्गाचे शॉट्स) या थंड हवेच्या ठिकाणांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात..या पर्वतराजीतला जोग धबधबा म्हणजे जणू निसर्गाचं देखणं रूपच...जगातल्या 1001 नैसर्गिक आश्चर्यांमध्ये जोग फॉल्सची वर्णी लागते...हा धबधबा 830 फूट उंच आहे....पश्चिम घाटातलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे कासचं पठार...सातारा जिल्ह्यातल्या कास पठरावर वर्षभर फुलांचा सडा पसरलेला असतो. जवळजवळ 1 हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या कास पठारावर 840 हून अधिक फुलवनस्पती पहायला मिळतात. जुलैनंतर या पठारावर रंगीबेरंगी फुलांची दुलई पहायला मिळते. या फुलांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी कास पठाराला भेट देतात..डोळे दिपवणारी पर्वराजी, कुणाचीही भीड न बाळगता चहुबाजुंना वावरणारे प्राणी-पक्षी, पावलागणिक जाणवणारा पाण्याचा खळखळाट...पश्चिम घाटाची ही श्रीमंती अचाट आणि अफाट आहे. वा-यालाही आवाज असतो हे इथे आल्यानंतर कळतं...म्हणूनच की काय युनोस्कोलाही या पश्चिम घाटाच्या सौदर्याची भुरळ पडलीय असं म्हटंल्यास वावगं ठरणार नाही.
 
 
गाडगीळ समितीचा अहवाल काय सांगतो
पश्चिम घाटातल्या पर्यावरणाबाबत गाडगीळ समितीनं दिलेला अहवाल अलिकडच्या काळात चर्चेत आहे.... भावी पिढ्यांसाठी हा घाट जपणं आपलं कर्तव्य असल्याचं, समितीचं म्हणणं आहे. पण, हा अहवाल लागू करण्याबाबत राज्य सरकार उदासिन भूमिका घेतंय... असं का ? पाहुयात एक रिपोर्ट....
 
निसर्गाचं अनोखं वरदान लाभलेल्या या परिसराला बेसुमार जंगलतोड आणि खाणींनी ग्रासलंय.... अनेक प्राणी, पक्षी, उभयचर आणि झाडांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.... आणि याला वेळीच आळा घातला गेला नाही तर तर भविष्यात मानवी जीवनही धोक्यात येणार आहे.... पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या प्राध्यापक माधव गाडगीळ समितीनं हा धोका ओळखूनच सावंतवाडी ते दोडामार्ग भाग इको-सेन्सेटिव्ह झोन घोषित करण्याची शिफारस केली आहे.... तसं झालं तर बेसुमार जंगलतोडीला आळा बसेलच, पण दोडामार्ग-सावंतवाडी पट्ट्यातल्या बेसुमार खाणीही बंद कराव्या लागतील.
 
या भागात नवी धरणं अथवा प्रकल्प उभारायचे असतील तर स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी सूचना गाडगीळ समितीनं केलीय.... गाडगीळ समितीच्या शिफारशींचा राज्य सरकार गांभीर्यानं विचार करतंय. पण पश्चिम घाटातल्या पवन चक्क्या बंद करणं आणि धरणांना मर्यादा करणं शक्य नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे..... कारण मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा पश्चिम घाटातल्या धरणांमधूनच होतो.... त्यामुळे गाडगीळ समितीच्या या शिफारशींबाबत राज्य सरकार सावध भूमिका घेत आहे.
 
खरं तर केंद्रीय पर्यावरण खात्यानं गाडगीळ समितीच्या शिफारशी मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरलाय... त्यामुळे पवनचक्क्या आणि धरणांबाबतच्या शिफारशी फेटाळून उर्वरित शिफारशी मान्य करण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याचं कळतंय.... अर्थात याबाबतचा ठोस निर्णय घेताना राज्य सरकारला पश्चिम घाटातल्या हितसंबंधांचाही विचार करावा लागणार हे स्पष्ट आहे..... त्यामुळेच गाडगीळ समितीच्या शिफारशींवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही.
 
पश्चिम घाटात  बेसुमार वृक्षतोड
पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वनमंत्रालयानं नेमलेल्या गाडगीळ समितीनं काही शिफारशी केल्यायेत. मात्र राजकीय वर्तुळात त्यावर टीका टिप्पणी सुरू झालीय.   कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंत महाराष्ट्र व्यापणारा पश्चिम घाट, सध्या विविध समस्यांनी ग्रासलाय. बेसुमार वृक्षतोड, कमी होत चाललेली जैवविविधता, खाणकाम आणि सरकारचं दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी पश्चिम घाटातली निसर्गसंपदा धोक्यात आलीय. पश्चिम घाटाचं सौंदर्य अबाधित ठेवायचं असेल, तर निसर्गाची सुरू असलेली वाटमारी रोखणंही गरजेचं आहे.
 
भारताची शान असलेला पश्चिम घाट सध्या अनेक समस्यांना सामोरं जातोय. कधीकाळी शूरवीरांच्या पराक्रमानं निनादणारे सह्याद्रीचे कडे मानवी आक्रमणापुढे नतमस्तक होतांना दिसतायेत..बेसुमार जंगलतोड, प्राण्यांची शिकार, खाणउद्योग अशा एक ना अनेक कारणांनी निसर्गाचा -हास सुरूयं. नुकताच माधव गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीनं पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी काही शिफारसी सुचवल्या...मात्र पाचही राज्यांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतलेली दिसत नाही. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा निसर्गाची वाटमारी करणा-यांना बळ देणारा ठरलाय. पण याचं खापर केवळ राज्यकर्त्यांवरच फोडून चालणार नाही तर सर्वसामान्यांपासूनच सुरूवात होणं गरजेचं आहे. सध्या वातावरणात सुरू असलेले बदल लक्षात घेता पर्यावरण संवर्धन किती गरजेचं आहे याचं महत्व सा-यांनाच पटू लागलय. वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, तसच प्राणी संरक्षणासाठी अनेक सेवाभावी संस्था, विद्यार्थी पुढाकार घेतांना दिसतायेत. हीच जनजागृती आता व्यापक स्तरावर होणं गरजेचं आहे. अन्यथा आपला निसर्ग इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.
 
व्हिडिओ पाहा..
 

 

 

 

 

First Published: Monday, July 2, 2012, 22:19


comments powered by Disqus