Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:39
www.24taas.com खरं तर मोबाईल न वापरणारी व्यक्ती आता विरळाचं... मोबाईल म्हटलं की मिस्डकॉल हा आलाचं... पण एखाद्या अनोळखी नंबरवरून येणारा मिस्डकॉल म्हणजे साधी बाब समजू नका.... मोबाईल धारकांनो सावधान... अशा एखाद्या मिस्ड कॉलने तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं... दहशत मिस्ड कॉलची देशातल्या लाखो मोबाईलधाराकांना सध्या एकच चिंता भेडसावतीय. ती एका मिस कॉलची. काही खास नंबरवरून येणारे मिस कॉल्स मोबाईलधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मोबाईल धारकही अशा मिस कॉल्सना बळी पडतायेत तर दुसरीकडे या मिस कॉलच्या माध्यमातून कोणता दहशतवादी कट तर रचला जात नाही ना? अशी शंका उपस्थित होतीय. तुमच्या फोनवर जर मिस्ड कॉल येत असेल तर तुम्ही त्याला कॉल बॅक करून प्रत्युत्तर देता... पण सावधान! काही नंबरवरून आलेले मिस्ड कॉल तुम्हाला चांगलेच महागात पडू शकतात.

#०९, #९०, +९२, +३७५ या क्रमांकावरून येणारा कोणताही मिस्ड कॉल तुम्हाला दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकवू शकतो. जर तुम्ही या क्रमांकावर आलेल्या मिस्ड कॉलला कॉल बॅक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीही संकटात सापडू शकता. जगभरात आत्तापर्यंत ३० लाख लोक अशा मिसकॉल्सच्या दहशतीला बळी पडलेत. एका रिपोर्टनुसार भारतातही जवळजवळ एक लाख लोकांची या मिस्ड कॉल्समुळे फसवणूक झालीय. या क्रमांकावरून येणाऱ्या मिसकॉलची दहशत इतकी आहे की अनेकांना हजारो रूपयांचा फटका बसलाय. याशिवाय मोबाईलमधील सर्व डाटा, फोटो आणि व्हिडीओजचीही चोरी झालीय. फोनमध्ये ATM नंबर आणि पिन नंबर सेव्ह असल्यामुळे कित्येकांच्या बँक अकाऊंटमधून लाखोंची रक्कम गायब झालीय. पण या मिस्ड कॉलचा सर्वात मोठा धोका आहे तो दहशतवादी कारवायांचा. यावर भारत संचार निगम लिमिटेड मुरादाबादच्या महाप्रबधकांनीही शिक्कामोर्तब केलंय. BSNLच्या चेन्नई कार्यालयानं सर्वच कार्यालयांना धोक्याचा इशारा देणारा मेल पाठवलाय. आंतरराष्ट्रीय रॅकेट मिस्ड कॉलच्या माध्यमातून फोन हॅक करत असल्याचं या मेलमध्ये म्हंटलय.
#०९, #९०, +९२, +३७५ या क्रमांकावरून मोबाईलधारकांना हे मिसकॉल्स दिले जातायेत. कॉलबॅक करताच मिसकॉल देणारी व्यक्ती तुमचा फोन हॅक करते. त्यानंतर काही मिनिटातच हॅक फोनच्या सिमकार्डाचं क्लोन तयार केलं जातं. या क्लोन सिमकार्डनं कुणालाही कॉल केला तर तुमचा नंबर त्याला दिसेल. याचाच अर्थ मोबाईलचं बिलही तुमच्याच नावावर येईल आणि तुमच्या नंबरवरून एखादं चुकीचं कृत्य झाल्यास त्याची जबाबदारीही तुमच्यावरच असेल मिस्ड कॉल्सचा हा दहशतवाद केवळ भारतातच नाही तर जगभर पसरत चाललाय. मिसकॉलवरून सिमकार्डाचं क्लोन तयार करणारं रॅकेट प्रचंड धोकादायक ठरू शकतो.
+९२ हा पाकिस्तानचा ISD कोड...मिसकॉलनं फोन हॅकिंग आणि सिमकार्डाचं क्लोनिंग. ऐकायला ही गोष्ट जरी अजब वाटत असली तरी हे अगदी खरंय. पण हा प्रश्न क्लोनपुरता मर्यादित नाही याचे धोके देशभर दिसू लागलेत. यातूनच दहशतवादी तुम्हाला एखाद्या कटातही गुंतवू शकतात. तर आंतरराष्ट्रीय लुटारू तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात. हे कृत्य दहशतवाद्यांनी केलं तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. सध्या नव्या सिमकार्डसाठी आणि फोन कनेक्शनसाठी नियम कडक करण्यात आलेत. त्यामुळे सिमकार्डचं क्लोन करण्याचे प्रकार वाढले आहेत.
+९२ हा पाकिस्तानचा ISD कोड. BSNLच्या चेन्नई कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या मिस्ड कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तैय्यबा सारखे दहशतवादी गट भारताविरोधात सातत्यानं दहशतवादी कारवाया करत आहेत. त्यामुळे मिस्ड कॉलद्वारे फोन हॅक करून या कारवाया आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीय. हे मिसकॉल व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच VOIP कॉल्सनं दिले जातात. २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देण्यासाठी VOIP चा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या मिसकॉल्सचा देशाला सर्वात मोठा धोका आहे. सध्या या मिस्ड कॉल्सद्वारे मोबाईलधारकांची मोठी लूट सुरूयं. मुंबईचे देवेंद्रसिंग हेदेखील या लुटीला बळी पडलेत. जर्मनीतून आलेल्या +३७५ या नंबरवरून आलेल्या मिसकॉलला कॉलबॅक करणं त्यांना चागलंच महागात पडलं. मिस्ड कॉलला प्रत्युत्तर दिल्यामुळे सध्या देशातल्या मोबाईल धारकांना लाखोंचा फटका बसलाय. वेबसाईट आणि प्रीमियम नंबरद्वारे ही लूट केली जात असल्याची माहिती एका हॅकरनं दिलीय. केवळ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारच नाहीत तर सिमकार्ड हॅकर्स आणि भारतात अवैधरित्या सुरू असलेले कॉल्स सेंटर्सचालकाचं साटलोटंही यानिमित्तानं समोर येतंय. सुरक्षेच्या दृष्टीनं ही निश्चितच गंभीर बाब म्हणावी लागेल.
आंतरराष्ट्रीय लुटीचा धंदामिसकॉलच्या दहशतीला देशाबाहेर खतपाणी मिळतंय. याशिवाय देशांतर्गत अवैध कॉल्स सेंटर्सचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर्मनीचा ISD कोड +३७५ वरून आलेल्या मिस्डकॉलला कॉलबॅक करताच मुंबईच्या देवेंद्रसिंग यांना चांगलाच फटक बसला. काही मिनिटांतच त्यांचा बॅलन्स संपला. त्यांच्यासारखे अनेक जण अशा मिसकॉल्सना बळी पडलेत. ज्यांनी #०९, #९० सारख्या नंबरवर कॉलबॅक केले. त्यांना हजारोंचा फटका बसलाय. खरंतर हाच आहे मिस्डकॉल आणि मोबाईलधारकांच्या लुटीचा खेळ... आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी आधी एखाद्या मोबाईलधारकाला मिसकॉल दिला जातो. त्यानंतर त्या व्यक्तीनं कॉलबॅक केल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय कॉल दर लागू होतात. काही सेकंदांच्या कॉलबॅकसाठीही मोबाईलधारकाला २०० ते ५०० रूपये मोजावे लागतात. लुटीचा हा गोरखधंदा परदेशातल्या वेबसाईट्सवरून सायबर गुन्हेगारांमार्फत चालवला जातो. मोबाईलधारकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यानं कॉलबॅक केल्यानंतर हिंदीत उत्तर दिलं जातं. मोठ्या चलाखीनं हा कॉल भारतात चालवल्या जाणा-या अवैध कॉल सेंटरवर डायव्हर्ट केला जातो. हे कॉलसेंटर मोबईलधारकाला जास्तीत जास्त बोलण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे बिलाची रक्कमही वाढत जाते. लुटीच्या या गोरखधंद्यात मोबाईल कंपन्यांचाही सहभाग असल्याचा दावा या हॅकरनं केलाय. मिसकॉलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या लुटीच्या धंद्यात प्रत्येकाचा वाटा ठरलेला असतो. अवैध कॉल सेंटर्सला 37 टक्के तर 31.5 टक्के वाटा मिसकॉल देणा-याला दिला जातो. तर 31.5 टक्के वाटा मोबाईल कंपनीला मिळतो. दुसरीकडे मोबाईल कंपन्यांना हा आरोप मान्य नाही. मोबाईल कंपनी केवळ वेबसाईटवरून दिलेल्या कॉल्सची फी वसूल करते असा दावा मोबाईल कंपन्या करतायेत. या लुटीतून मोबईल कंपन्यांनी अंग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी संशयाची सुई त्यांच्याकडे वळल्याशिवाय राहत नाही. मोबाईल कंपन्यांनी स्वताच्या बचावासाठी कितीही दावा केला तरी इंडरनॅशल कॉलबाबत बहुतांश कंपन्या ग्राहकांना पूर्वकल्पना देत नाहीत. त्यामुळे अजाणतेपणी ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड सहना करावा लागतो.
कशी केली जाते ही लूट...VOIP च्या माध्यमातून कॉल करण्याची सुविधा देणाऱ्या वेबसाईटचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घेतला जातो. परदेशात राहून घरबसल्या वेबसाईटच्या माध्यमातून ते भारतातल्या हजारो ग्राहकांना मिसकॉल देतात. हे मिसकॉल वेबसाईच्या प्रीमियम नंबरद्वारे दिले जातात. उदा. ००२३९९८८७९३० आणि ००२३९२२१६३२१ हे प्रीमियम नंबर आहेत. हे नंबर घेण्यासाठी मोबाईल कंपन्यांना ज्यादा फी द्यावी लागते. मात्र, याचा फायदा असा की VOIP तंत्राच्या मदतीनं जगात कुठेही कॉल करता येऊ शकतो. प्रीमियम नंबरच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरबदल केल्यानंतर अशाप्रकारे कॉल केला जातो ज्यामुळे या नंबरऐवजी भारतीय नंबर दिसतात. हॅकर रूस्तमनं या नंबरचं प्रात्यक्षिकही दाखवलं. त्यानं प्रीमियम नंबरवरून मिसकॉल दिला. जेव्हा मिसकॉलवर कॉलबॅक आला तेव्हा तो कॉल एका कॉल सेंटरशी जोडला गेला आणि काही सेकंदातच मोबाईलच्या बॅलन्समधून ४०० रूपये गायब झाले. एकूणच या खेळात प्रत्येकवेळी नुकसान होतं ते मोबाईल ग्राहकाचं आणि त्या ग्राहकानं तक्रार केली तरी त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. मिसकॉलच्या या खेळात सर्वात मोठी भूमिका अवैध कॉल सेंटर्सची असते. ग्राहकाला जास्तीत जास्त बोलण्यात गुंतवून कॉल वाढवण्याचं काम या कॉल सेंटरमार्फत सुरू असतं. असे एक ना अनेक अवैध कॉल सेंटर्स दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू शहरात सुरू आहेत. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात कोणताच कायदा अस्तित्वात नाही. ज्या मोबाईल कंपन्या प्रीमियम नंबर देतात त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालय. बऱ्याचदा सायबर गुन्हेगार मोबाईल कंपन्यांकडून प्रीमियम नंबर घेऊन देशात अथवा विदेशात बोगस कंपनी स्थापन करतात. प्रीमियम नंबरमुळे मोबाईल कंपन्या कॉल्सवर जादा पैशांची आकारणी करतात...या पैशांमधला स्वताचा हिस्सा काढून नकली कंपनीला त्यांचा वाटा दिला जातो.
या संकटातून वाचण्यासाठी...मिसकॉलच्या माध्यमातून मोबाईल ग्राहकांच्या लुटीसाठी वापरण्यात आलेलं हे तंत्र अत्यंत नवीन आहे. देशात कायदे करणा-या यंत्रणेला या नव्या गुन्ह्याविषयी फारशी कल्पना नाही. मिसकॉलच्या या काळ्या धंद्यातून जगभरात कोट्यवधी डॉलर्सची कमाई केली जाते. आतापर्यंत ३० लाख लोक या फसवणूकीला बळी पडलेत. इंग्लंडसह अनेक देशांनी या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन कायदे करायला सुरवात केलीय. मात्र भारतात कायदा करणं दुरच. ही लूट कशी होते याची काणकुणही तपास यंत्रणांना नाही. सरकारच्या अनास्थेमुळे आता या नव्या संकटाला तोंड देण्याची जबाबदारी ग्राहकांवर येऊन पडलीय. त्यामुळे कोणताही अनोळखी आंतरराष्ट्रीय मिसकॉल मोबाईलवर आल्यास कॉलबॅक करणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारच्या मिसकॉल्सची माहिती फेसबूक किंवा ई-मेलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवल्यास जनजागृती होऊन अनेकांच्या खिशाला बसणारी चाट वाचू शकेल...
First Published: Tuesday, July 3, 2012, 21:39