Last Updated: Saturday, July 7, 2012, 06:36
www.24taas.com, मुंबई शुक्रवारचा संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटीवरुन झालेली तीन वर्षाच्या मुलीची चोरी.. महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार? हाच सवाल आता सारे करतायत. मुलांच्या चोरीच्या कारणांची आणि वास्तवाची चर्चा यावरच करुयात थोडीशी चर्चा... मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरुन १० जूनला एका मुलीची चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे लंगडत लंगडत जाणाऱ्या चोरांनं सर्वाच्या डोळ्यात धूळ फेकत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरुन मुलीची चोरी केली. पण हा सारा प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानं चोराचं बिंग फुटलं. यानिमित्तानंच लहान मुलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आलाय.

मुंबईचे सीएसटी स्टेशन.. गर्दीनं गजबजलेलं... दिवसा असतचं असतंच.. मध्यरात्रीही या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. १० जूनच्या मध्यरात्रीही तशीच गजबज होती. काहिशी पेंगुळलेली... त्याच मध्यरात्रीत एक प्रकार घडला. पण काय झालंय ते कुणालाच कळल नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा एका कुटूंबावर आभाळ कोसळलं होतं. १० जूनच्या मध्यरात्रीच्या एक वाजता संगीता नावाच्या मुलीची कुणीतरी अपहरण केले होते. एका मजूर कुटूंबातील असलेल्या मुलीची या मध्यरात्री चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. चोराने जरी धुळफेकत ही चोरी केली असली तरी स्टेशनवरच्या सीसीटीव्ही मध्ये त्या चोराचा कारनामा कैद झालाय.
रात्रीचा एक वाजलेला... गाडीची वाट पहात प्रवासी सीएसटी प्लॅटफॉर्मवर निपचीत झोपलेले होते. त्यातच चोर पावलानं येत या चोरानं एका लहान मुलीला अलगद उचललं. आई-वडिलांचे काही क्षणासाठी कदाचीत डोळे लवले असतील तेवढ्यात ते डोळू चुकवून मुलीला कडेवर घेऊन चोरानं पोबारा केला. ही सर्व दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कुणाच्या लक्षात येणार नाही अश्या चोर पावलानं मुलीला उचलून घेऊन निघूनही गेला. केवळ ४० सेकंदाचा हा घटनाक्रम. संगिता ही परभणीच्या लक्ष्मण पवार यांची मुलगी असल्याचं पोलीसांच्या तपासात पुढे आलंय. एक महिना होऊनही मुलीचा ठावठिकाणा अजूनपर्यंत लागलेला नाही. कॅमेऱ्यात कैद या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर कुटुंबियांसमवेत झोपलेल्या मुलीला कडेवर घेऊन जाताना आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. अगदी अर्धा ते एक मिनिटात झोपलेल्या मुलीला उचलून घेऊन जाताना हा आरोपी सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रेनमधून संशयीत आरोपी मुलीला घेऊन पळून गेलाय. मुलीचं वय ३ वर्ष असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं. मुलीला शोधून काढण्यात पोलिसांना अजून यश आलं नाही. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पण या निमित्तानं पुन्हा प्रश्न उपस्थित होतंय ते सीएसटी स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणावर. एक दहशतवादीचं काय एका भुरट्या चोरानंही या सुरक्षा यंत्रणेला आव्हान उभं केलंय. एका पायानं लंगडत चालणाऱ्या या चोरानं लहान मुलीची चोरी करून प्लॅटफॉर्मच्या एका बाजूनं तो निघून गेला. सीएसटी स्टेशनवरील दहशतवादी हल्ल्याला काही काळ लोटत नाही तोच इथली सुरक्षा व्यवस्था पुन्हा किती ढिली आहे, हेच या घटनेनंतर पुढे येतं. पोलिसांनी या प्रकरणी आता चार ते पाच टीम्स तयार केल्या असून विविध स्टेशन्सवर तपास सुरू केला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना घडलीय, मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर. अतिशय वर्दळीच्या या ठिकाणावर २६/११ नंतर सुरक्षा वाढवण्यात आल्याचे दावे नेहमीच करण्यात येतात. पण नेहमीच या सुरक्षेतल्या त्रुटी समोर येतायत. मुलीच्या चोरीनंही हा सुरक्षेमधली कमतरता पुन्हा एकदा उघडकीस आलीय. सीएसटीचा हा प्रकार केवळ एकमेव आहे अशा भ्रमात राहण्याचं काहीच कारण नाही. कारण सीसीटिव्हीच्या फुटेजने हा चोर पकडला जाईलही पण, खरा मुद्दा हा आहे की, देशात मुलांच्या चोरीचं प्रमाण वाढतंय आणि महत्त्वाचं म्हणजे एनसीआरबीच्या रेकॉर्डमध्ये हीच गोष्ट अधोरेखित होतेय.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे आणि हेच आकडे प्रश्नचिन्ह निर्माण करतात देशातल्या मुलांच्या असुरक्षित बालपणावर. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार मागील तीन वर्षातील आकडेवारी पाहता २०१० मध्ये लहान मुलांवर झालेल्या अपराधांची संख्या सर्वात जास्त आहे. पण यावर्षीही नोंद झालेल्या गुन्ह्याची संख्या अतिशय वाढत चाललीय. लहान मुलांची चोरी, अपहरण या प्रकारात वाढ झाल्याची गंभीर दखल गृहखात्यानं घेतलीय. गृहमंत्रालयानं मुंबईसह देशातल्या सर्व महानगरांयासंदर्भात कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २००९ साली लहान मुलांशी निगडीत गुन्ह्यांची संख्या २४,२०१ वर गेली होती. हाच आकडा २०१० मध्ये २७, ६९४ वर जावून पोहोचलाय. याचाच अर्थ तब्बल एका वर्षात १०.३ टक्केची वाढ झाली होती. २००९ साली ८.९४५ मुलांचे अपहरण झालं होतं. हाच आकडा वाढत २०१० मध्ये १० हजार ६७० एवढा झाला होता. २००९ साली लहान मुलांवर झालेल्या बलात्काराची संख्या ५,३६८ एवढी होती. तर २०१० साली हा आकडा वाढून ५४८४ एवढा झाली. लहान मुलांची चोरी आणि अपहरणाच्या प्रकरणात २०११ मध्येही वाढच होत गेलीय.

या मुलांची चोरी करुन त्याना जबरदस्तीनं काम करुन घेणं, त्याचप्रमाणं त्याची परदेशात तस्करीचंही प्रमाण वाढत चाललयं आणि म्हणूनच या साऱ्याला वेळीच आवर घालण गरजेचं बनलयं. या लहान मुलांना पळवण्यामागे अपहरण करणाऱ्या रॅकेटचा हात असल्याचा संशय व्यक्त होतोय. पण असं जरी असलं तरी, पळवल्या जाणाऱ्या या मुलांचा वापर हा अनेक कारणांसाठी होतोय. भीक मागण्यापासून ते मुलांच्या तस्करीसारखे अनेक गंभीर प्रकार करत मुलांच्या आयुष्य खेळलं जातयं. पण या सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो हे टाळणं प्रशासनाला शक्य आहे का? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्ही अशा घटना टाळण्यासाठी काय करु शकतो, यावर चर्चा होण्याची.
First Published: Saturday, July 7, 2012, 06:36