७ रुपयांत जेवा, ५ रुपयांत कपडे शिवा! - Marathi News 24taas.com

७ रुपयांत जेवा, ५ रुपयांत कपडे शिवा!

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर
 
सध्याच्या काळात महागाईनं एव्हरेस्ट गाठलं असताना राज्य सरकार एसटीच्या वाहक चालकांना 5 रुपयांत ड्रेस शिवून घ्या तसंच 7 रुपयांत भरपेट जेवा असं सांगतंय.  ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे आणि भोजन भत्ता 7 रुपये हे ऐकून धक्का बसेल पण हे वास्तव आहे. महागाईनं कळस गाठला असताना एसटी बसच्या चालक आणि वाहकांना ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे मिळतोय.
 
सध्याच्या काळात ड्रेसची बटनं किंवा शिवण्यासाठीचा दोराही 5 रुपयांना मिळणार नाही. अगदी ग्रामिण भागातही सध्या एक ड्रेस शिवण्यासाठी कमीत कमी 200 ते 250 रुपये लागतात. सरकार मात्र एसटीच्या वाहक आणि चालकांना 5 रुपयांत ड्रेस शिवून घ्या म्हणतंय. हे कमी की काय जेवणाचा भत्ताही त्यांना फक्त 7 रुपये मिळतोय. ज्या पैशात कसाबसा चहा मिळतो, त्या पैशात सरकार चालक वाहकांना  भरपेट जेवायला सांगतंय.
 
चालक वाहकांची थट्टा करणारा हा भत्ताही अनेकांना चार ते पाच वर्षांपासून मिळालेला नाही. या विषयावर एसटीचा एकही अधिकारी बोलायला तयार नाही. डोळ्यात तेल घालून दिवस रात्र प्रवाशांची  प्रवाशांची वाहतूक करणा-या चालक वाहकांची सरकारनं निव्वळ थट्टा चालवलीय. निमआराम, स्लीपर, एसी गाड्या सुरू करुन मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवणा-या एसटी महामंडळाला चालक वाहकांशी मात्र काहीही देणंघेणं नसल्याचं यावरुन दिसून येतंय. महामंडळानं याची त्वरीत दखल घेऊन भत्यात वाढ करुन द्यावी अशी मागणी चालक वाहकांनी केली आहे.
 
 

First Published: Monday, July 16, 2012, 00:12


comments powered by Disqus