Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:11
झी २४ तास वेब टीम, नांदेड 
नांदेडमध्ये भरचौकात हातगाड्यांवर दारुची अवैधपणे विक्री करण्यात येते. वडापावच्या गाड्यांवर दारुची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अनेक मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य रहिवासी या त्रासाला पुरते कंटाळले आहेत. अवैधपणे ही दारुविक्री सर्रासपणे सुरू आहे.
झी २४ तासने या बातमीचं वृत्तांकन करताच पोलीस प्रशासन एकदम खडबडून जागं झालं. झी चोवीस तासच्या दणक्यानंतर पोलिसांनी तातडीने या भागात कारवाईची मोहीम हाती घेतली. जुना मोंढा चौकात हातगाड्यांवर दारूची अवैधपणे विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांवर ताबडतोब कारवाई करत या हातगाड्या तसंच अवैध दारू जप्त करण्यात आली. तर दारुड्यांनाही पोलिसांनी चांगलाच चोप दिला.
दिवसाढवळ्या पोलिसांदेखत आजपर्यंत दारुचा अवैध धंदा राजरोसपणे सुरू होता. दारुड्यांमुळे परिसरातील नागरिक वैतागले होते. दारु पिऊन अनेकजण इथे धिंगाणा घालत असल्याचं चित्र दिसत होतं. याचा सर्वाधिक त्रास परिसरातल्या महिलांना होत होता. एवढे दिवस पोलिसही या सगळ्याप्रकाराकडे कानाडोळा करत होते. आता मात्र पोलिसांनी कडक कारवाई करत स्थानिक रहिवाशांना दिलासा दिला आहे. यापुढे चौकात हातगाडी लावायला बंदी घालण्यात येईल, अशी महिती पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
First Published: Wednesday, December 21, 2011, 06:11