मृतदेहांचीही विटंबना - Marathi News 24taas.com

मृतदेहांचीही विटंबना

झी २४ तास वेब टीम, लातूर
 
दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय. शिक्षणासाठी उदात्त हेतूनं देहदान करणाऱ्यांच्या देहांना देण्यात येणारी क्रूर वागणूक पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
 
ही दृश्यं कोणत्याही कत्तलखान्यातली किंवा स्मशानभूमीतली वाटावं असं  दृश्य लातूरच्या शासकीय महाविद्यालयाच्या छतावर पाहायला मिळत आहेत. उघड्यावर पडलेले आणि कुजलेले मृतदेह,  पाण्याच्या टाक्यांमध्ये असलेले शरिरांचे कुजलेले अवशेष या मृतदेहांभोवती घिरट्या घालणाऱ्या घारी आणि कावळे ही दृश्य पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे वास्तव आहे. वैद्यकीय शाखेतल्या विद्यार्थ्यांना शरीररचनेचं ज्ञान व्हावं यासाठी उदात्त हेतूनं मृत्यूनंतर देहदान करणाऱ्यांना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशी क्रूर वागणूक देण्यात येतेय. अशा पद्धतीनं हे मृतदेह उघड्यावर ठेऊन, महाविद्यालयाकडून या मृतदेहांची क्रूर विटंबनाच राजरोस सुरु आहे.
 
'झी २४ तास'ची टीम जेव्हा या ठिकाणी पोहोचली, तेव्हा या ठिकाणी प्रचंड दुर्गंधीं जाणवत होती. घारी, कावळे आणि इतर पक्षी या मृतदेहांवर घिरट्या घालत होते. या संतापजनक प्रकाराबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना विचारणा केली तर त्यांनी दिलेलं उत्तर धक्ककादायक होतं. वैद्यकीय अभ्यासक्रमात हे मृतदेह वापरताना कुजू नयेत म्हणून त्यांना फॉरमलेन टँकमध्ये ठेवण्यात येतं. मात्र या टँकमध्ये ठेवल्यानं हाडं लवकर जळत नसल्याचं सांगत विभागप्रमुखांनीही या कृत्याचं समर्थन केलंय.  हे फक्त लातूरमध्येच होतं हेही सांगायला ते विसरले नाहीत.
 
काही पक्ष्यांनी मृतदेहांची हाडं वैद्यकीय महाविद्यालय परिसरात टाकल्यानं हा धक्कादायक प्रकार उघड झालाय आणि लातूरमध्ये या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय. दानासारखं पुण्य नाही असं म्हणतात. मात्र लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या या क्रूर प्रकारानं देहदात्यांचाच घोर अपमान केलाय.

First Published: Wednesday, December 21, 2011, 18:26


comments powered by Disqus