Last Updated: Wednesday, January 11, 2012, 00:24
www.24taa.scom, नाशिक नाशिक झपाट्यानं बदलत आहे. पण या बदलाच्या वेगात गुन्हेगारीचा वेग प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. नाशिक शहरात गेल्या वर्षभरात पंचवीसपेक्षा अधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात हा आकडा तुलनेत जास्त आहे. जिल्ह्यातील या वाढत्या गुन्हेगारीने नाशिककर हैराण झाले असून पोलिसांचा वचकच नाहीसा झाल्याचं चित्र उघड्या डोळ्यानी नाशिककरांना पाहावं लागत आहे.
देवभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी नाशिक जिल्ह्याची ही ओळख साऱ्या जगानं मान्य केली आहे. महाराष्ट्राचे देवघर असं संतसाहित्यिकानी वर्णन केलेल्या नाशिकची ओळख आता बदलत आहे. देवभूमीत आता दानवांचा संचार झाला आहे आणि याच दानवाचे जे काही प्रताप आहेत ते पाहून कुणाचाही संताप होईल. ही कृष्णकृत्य आहेत नाशिकच्या नराधम गुन्हेगांराची...
२५ बलात्कार, ३२ खून आणि २७ दरोडे ही आकडेवारी नाशिकमधल्या गुन्हेगारीचा आणि पोलिसांच्या हतबलतेचा पंचनामा उघ़डा पाडत आहे. २०११ मध्ये महिन्याला सरासरी सहा गंभीर गुन्हे घडत होते, यावरुन नाशिकमधल्या गुन्हेगारीचा अंदाज येईल. लहानसहान गुन्ह्यांनी तर मर्यादाच ओलांडली आहे. हा आकडा केवळ मागच्याच वर्षी होता अशातला भाग नाही. २०१० मध्येही आकडा असाच वाढायला सुरुवात झाली होती. २०१० मध्ये बलात्काराच्या तब्बल पंचाहत्तर घटना घडल्या होत्या. नाशिकमधल्या अनेक अल्पवयीन मुली, वारांगना या अशा अनेक गुन्ह्यामुळे नाहक बदनाम झाल्या होत्या. आणि अत्याचार करणारे गुन्हेगार मंडळी मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत होते. या गुन्हेगार मंडळीना बिनधास्त फिरण्याचे लायसन्स मिळालय ते राजकीय नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातली परिस्थीती गंभीर बनल्याच खंत आता सामाजिक कार्याकर्त्याना वाटत आहे.
सामाजिक रचनेला धक्का देणा-या वेगवेगळ्या घटनानी आज नाशिकच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम नाशिकच्या गावगुंडानी सुरु केलेय. चोरी, दरोडे यापेक्षाही बलात्काराच्या घटनानी नाशिकचे सामाजीक जीवन धोक्यात आलयं. शहरातल्या गुंडाच्या टोळ्याचा हैदोस वाढत चाललाय आणि त्यामुळेच पोलिसांचीही इभ्रत धोक्यात आलीय. एखाद्या मुलीला भर चौकातून उचलून नेल्यामुळे पोलिसांच्या संख्येचा अभाव स्पष्टपणे दिसून येतोय. आणि ही बाब खुद्द नाशिकच्या खासदारानाही मान्य करावी लागली आहे.
नाशिकच्या गुन्हेगारी जगताचा आलेख वाढत चाललाय.. राज्यात एकूण पंधराशे नव्याण्णव बलात्काराची नोंद करण्यात आलीय. त्यात प्रामुख्याने नऊ शहरात ५४८ घटना घडल्यायत. आणि दुर्दैवाने या सर्वातवरच्या क्रमांकावर आहे ते नाशिक. गुन्ह्याचा हा आलेख वाढत चाललाय ही गंभीर गोष्ट जर वेळीच नाही आवरली तर गृहखात्याच्या नाकीनऊ येतील हे मात्र नक्की.
First Published: Wednesday, January 11, 2012, 00:24