खड्याचा बळी, आरोपी मुलगा - Marathi News 24taas.com

खड्याचा बळी, आरोपी मुलगा

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली
 
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळं डोंबिवलीतल्या डॉ. महेश पाटील यांना आपली आई गमवावी लागली. दुचाकीवरुन जात असताना गाडी खड्ड्यात आदळली आणि त्यांच्या आईचा मृत्यू झाला.
 
लतिका पाटील आणि त्यांचा मुलगा डॉ. महेश पाटील मोटरसायकलवरून बदलापूरहून ऐरोलीकडे घेऊन जात होते. यादरम्यान डोंबिवलीत एका खड्डयात त्यांची गाडी आदळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या लतिका पाटील खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारादम्यान हॉस्पिटलमध्ये पाटील यांचा मृत्यू झाला. खड्ड्यांमुळं आई गमावाव्या लागलेल्या डॉ. महेश पाटील यांना शॉक ट्रिटमेंट देत पोलिसांनी त्यांच्याविरोधातच निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केलायं.
 
पावसाळ्यात खड्ड्यांमुळं वैतागलेल्या डोंबिवलीकरांना पावसाळ्यानंतर तरी खड्ड्यांपासून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरलीय. पावसाळ्यानंतर लगेच खड्डे बुजवू असं सांगणा-या पावसामुळं रस्त्यांवर खड्डे पडल्याचं सांगणा-या प्रशासन आणि राजकारण्यांकडं आता पावसाळ्यानंतरही खड्डे बुजवण्यात यश आलेलं नाही.
 
खड्ड्यांमुळे डोंबिवलीतल्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण वाढलयं. पावसाळा संपल्यानंतर खड्डे ताबडतोब बुजवले जातील असं आश्वासन महापालिका प्रशासनानं आणि राजकीय नेत्यांनी दिलं होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलयं. त्याचाच परिणाम एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

First Published: Tuesday, October 25, 2011, 06:44


comments powered by Disqus