दोन बहिणींची हृद्य भेट - Marathi News 24taas.com

दोन बहिणींची हृद्य भेट

श्रीनिवास डोंगरे, www,24taas.com, कऱ्हाड
 
प्रियंका लग्नाच्या उंबरठ्यावर उभी होती. त्याचवेळी आदेश बांदेकरसह होम मिनिस्टरची टीम प्रियंकाच्या घरी पोहोचली आणि एक नवं वळण तिच्या आयुष्याला मिळालं. गहिवरुन टाकणारी ही दोघा बहिणींची कहाणी....
 
गृहलक्ष्मीची स्वप्न साकारताना झी मराठी जाऊन कऱ्हाडच्या तारळकर कुटुंबात पोहोचलं.  प्रियंकाच्या लग्नाची लगबग सुरू होती. प्रियंका तारळकर कुटुंबातली दत्तक मुलगी आहे.  आई वडिलांच्या जिवाभावाची, दोघा भावांच्या लाडाची... तारळकर कुटुंबात सुखात वाढलेल्या प्रियंकाचं एक स्वप्न होतं  ते लहानपणी विभक्त झालेल्या आपल्या बहिणीला परत भेटण्याचं... आदेश बांदेकर यांनीही टीव्ही माध्यमातून सर्वांना तशी विनंती केली.
 
होम मिनिस्टरचा खेळ संपवून झी मराठीची टीम निघाली ती प्रियंकाला तिच्या बहिणीला भेटवण्याची खूणगाठ बांधूनच... आणि नशिबाचे फासे इतके जबरदस्त होते, की योगायोग घडलाच... सगळ्या महाराष्ट्राची माऊली सिंधुताई सकपाळांच्या आश्रमात प्रियंकाची छोटी बहीण प्रीती लहानाची मोठी होत होती. तिच्या मैत्रिणींनी होम मिनिस्टरचा एपिसोड बघितला आणि प्रीतीलाही मोठ्या बहिणीला भेटण्याची ओढ लागली. सिंधुताईंनी आदेश बांदेकरांना फोन केला आणि पुढचे सगळे योग जुळून आले.

 
सिंधुताईंचे मानसपुत्र दीपक सपकाळ, आदेश बांदेकर आणि प्रीती असे तिघेही कऱ्हाडकडे निघाले. ताईला भेटण्यासाठी प्रीतीही आतुर होती. आतापर्यंत अनाथाश्रमातच मोठ्या झालेल्या प्रीतीला तिची हक्काची आणि सख्खी ताई भेटणार होती.
 
कऱ्हाडमध्ये प्रीतीला घेऊन गाडी पोहोचली ती शुभमुहूर्तावरच... प्रियंकाच्या लग्नासाठी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्यातच प्रियंकाचा वाढदिवसही त्याच दिवशी होता. लग्नघरी पाहुणेरावळे आल्यानं घराचं नुसतं गोकुळ झालं होतं आणि त्याचवेळी आदेश बांदेकर तिथे पोहोचले.
 
दोघी बहिणी भेटल्या, आतापर्यंत प्रियंकावर भरभरुन प्रेम करणाऱ्या दोघा भावांना आणखी एक बहीण मिळाली आणि सगळा आनंदी आनंद झाला. नात्यांचा हा सोहळा पाहून सगळ्यांनाच गहिवरुन आलं. अनेक वर्षांपासून दुरावलेल्या बहिणी भेटल्या. प्रियंका माहेरी सुखातच वाढली पण तिची पाठवणी करताना तिच्या हक्काची पाठराखीण मिळाली. शब्दांत मांडता येणार नाही इतकं सुखाचं दान नियतीनं भरभऱुन तिच्या पदरात टाकलं. नाती कुठली जिवाभावाची म्हणायची... इथे नात्यांचा गुंता असा होता की कोण सख्खं, कोण सावत्र आणि कोण दत्तक... पण या सगळ्यांचीच नाती प्रेमाच्या धाग्यानं घट्ट बांधलेली होती. नात्यांचा हा सुंदर सोहळा ज्यांनी अनुभवला ते भाग्यवान... प्रियंकाला बोहोल्यावर चढण्याआधी करवली मिळाली आणि एकच आनंदी आनंद झाला...
 
 

First Published: Saturday, February 11, 2012, 14:20


comments powered by Disqus