जिसकी लाठी उसकी 'भैंस' - Marathi News 24taas.com

जिसकी लाठी उसकी 'भैंस'

Tag:  
झी २४ तास वेब टीम, नेरळ
नेरळमध्ये एक अधिकारी रेल्वे कर्मचाऱ्यांना गुलामासारखं वागवत असल्याची माहिती झी २४तासला मिळाली.. रेल्वेचे ट्रॅकमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेरळच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर असलेल्या एस. एम. मोर्या यानं आपल्या तबेल्यात कामाला जुंपल्याची धक्कादायक माहिती झी २४ तासनं समोर आणली आहे.
 
रमा खिंडारे, गव्हारी आणि काशिनाथ वाळके या तीन कर्मचाऱ्यांना सकाळी ९ ते ४ या वेळेत मौर्यांच्या तबेल्यात ऑनड्युटी गाई-म्हशीचं शेण काढावं लागतं. याशिवाय दूध काढणं आणि अन्य कामंही मौर्या त्यांना करायला लावतो. मौर्याच्या तबेल्यातली ड्युटी संपली की हे कामगार रेल्वेचे कपडे घालून नेरळ स्टेशनवरून घरी निघतात.
 
झी २४ तासनं त्यांना तबेल्यात काम करताना टिपलं तेव्हा त्यांची पळापळ झाली.  त्यांना गाठून या प्रकाराचा भांडाफोड केलाच. विशेष म्हणजे रेल्वेचे कर्मचारी आपले गुलाम असल्याच्या थाटात वावरणाऱ्या या रेल्वेच्या अधिका-याची मुजोरी इतकी की कामगार मी सांगेन तसेच वागतील, असं त्यानं निर्ढावलेपणानं सांगितलं. यातून त्याची जिसकी लाठी उसकी भैंस म्हणणारी अधिकारी वृत्ती दिसून आली.

First Published: Friday, November 4, 2011, 15:29


comments powered by Disqus