अबब.... एवढा मोठा पेन, आजवर नाही पाहिला - Marathi News 24taas.com

अबब.... एवढा मोठा पेन, आजवर नाही पाहिला

www.24taas.com, लातूर 
 
फार पूर्वीपासून लेखणीचं महत्व राहिलं आहे. पूर्वीच्या काळी लिखाणसाठी दौत किंवा टाक वापरत असत. हळूहळू त्याची जागा पेनानं घेतली. आपण बाजारात विविध प्रकारचे पेन नेहमीच पाहिले असतील पण एक असं ही विक्रमी पेन आहे ज्याची लांबी आहे तब्बल १८ फूट आहे. लातूर फेस्टीव्हलमध्ये ठेवण्यात आलेल्या या पेननं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे या विश्वविक्रमी पेनची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे.
 
या पेनची लांबी १८ फूट आणि रुंदी ३.४४ येवढी आहे. पेनाची निर्मीती पितळ या धातूपासून करण्यात आली असून पेन तयार करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागला आहे. आंध्रप्रदेशातल्या निझामाबाद जिल्ह्यातील मोरताड इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक एस.एम.आचार्य यांनी हा भव्यदिव्य पेन तयार केला आहे. लेखणी म्हणजे साक्षरतेचं प्रतीक. हे प्रतिक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहचावं, देशातील निरक्षरता दूर व्हावी या उदात्त हेतूनं आचार्य यांनी पेन तयार केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हा पेन भेट म्हणून देणार असल्याचं आचार्य यांनी सांगितलं आहे
 
लहानपणापासूनच काही तरी वेगळं करण्याची आचार्य यांची इच्छा होती. पेनच्या माध्यमातून ती पूर्ण झाल्याचं आचार्य सांगतात. या पेनवर सात राज्यातील विविध नृत्य प्रकार तसंच संगीताची वाद्यही  कोरण्यात आली आहेत. आचार्य यांना हा पेन बनविण्यासाठी ३ लाख रुपये खर्च आला आहे. दोन कारागिरांच्या मदतीनं त्यांनी हा पेन तयार केला. त्यांची ही कलाकृती साऱ्यांच्याच कुतहुलचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या पेननं लिहताही येतं. एका शाईच्या कंपनीनं या पेनमध्ये भरण्यासाठी शाई सुध्दा दिली आहे. आचार्य यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा लेखणी तयार केली. आता या लेखणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत आचार्य यांचां शिक्षणाचा संदेश पोहचावा हीचं अपेक्षा.
 
 
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 22:43


comments powered by Disqus