कर्णबधीर कळ्या फुलांचे ‘आनंदी झाड’ ! - Marathi News 24taas.com

कर्णबधीर कळ्या फुलांचे ‘आनंदी झाड’ !

www.24taas.comरत्नागिरी
 
‘शिकविता भाषा बोले कैसा पाही ,
कानाने बहिरा मुका परी नाही ’
ही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या, फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील स्नेहदीप या संस्थेने केले आहे. यामुळेच ही संस्था चालवीत असलेल्या इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालयाचा, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी माणुसकीतील सौंदर्याचा विलक्षण हृदयस्पर्शी अविष्कार असा उस्फूर्त गौरव केला आहे.
 
 
या संस्थेची १९८४ साली झालेली स्थापना दापोलीतील संवेदनशील सामाजिक जाणीवेची प्रचीती देणारी आहे. त्या काळात शहरातील डॉ. गंगाधर काणे यांना परिसरात असलेल्या कर्णबधीर मुलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात आले. यामुळे अशा मुलांसाठी शाळा आवश्यक असल्याचे जाणून त्यांनी हा विषय डॉ. श्रीधर कोपरकर, शांता सहस्रबुद्धे यांच्या कानावर घातला. डॉ. काणे व डॉ. कोपरकर यांनी संस्था स्थापन करण्यासाठी माणसांची गोळा बेरीज सुरु केली. बापू घारपुरे, दांडेकर गुरुजी, पांडुरंग भावे, डॉ. वासुदेव पापरिकर, अरुण साबळे, संतोष मेहता, बाभुभाई जैन, मधुसूदन करमरकर, डॉ. अपर्णा मंडलिक, अशी सर्व मंडळी एकत्र आली. डॉ. गंगाधर काणे, शांता सहस्त्रबुद्धे, डॉ. कोपरकर यांनी घटना तयार केली. तर डॉ. पापरिकर यांनी कर्णबधिरांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेतला.
 
 
संतोष मेहता आणि अरुण साबळे यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून  कर्णबधीरांच्या नाव , पत्यासाठी अक्षरशः तालुका पिंजून काढला. डॉ. काणे यांच्या अश्विनी हॉस्पिटल मध्ये कर्णबधीरांची नोंदणी झाली. मुलांच्या पालकांशी हितगुज साधल्यानंतर १२ जुलै १९८४ रोजी स्नेहदीप दापोली संचलित  इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालयाचा पहिला दिवस उजाडला. शरयू तेरेदेसाई यांचा अनुभव त्या जेव्या स्वता:च्या शब्दात सांगतात तेव्हा २८ वर्षापूर्वीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. सकाळचे १० वाजलेले शाळेचा पहिला दिवस त्यामुळे संस्थेची मोजकी पाच माणसे आणि पाच मुले व त्यांचे पालक अशी परिस्थिती... काय करायचे, काय करावे हेच न  कळल्याने मुले व पालक गोंधळलेले... संपूर्ण वातावरणात संभ्रमावस्था ...त्यात शाळेसाठी भाड्याची खोली आणि रडणारी, लाथा झाडणारी मुले अशी दिवसाची सुरुवात झाली. खरेतर त्यावेळी या अगोदर रत्नागिरीत अश प्रकारची शाळा एकमेव शाळा अस्तित्वात होती. त्यामुळे कर्णबधिरांसाठी शाळा हा उपक्रम तसा नवा होता. पण आधाराला माणसे उभी राहिली आणि वर्ष सरते न सरते तो शाळेचे वसतीगृह देखील सुरु झाले. आज रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या संस्थेचा पसारा वाढला आहे.
 
 
शासनाच्या विविध अनुमतींचे शिक्कामोर्तब झाले असून या संस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या  कै. डॉ. काणे यांच्या नेतृत्वाचा वारसा आता डॉ. प्रशांत मेहता, सौ. शुभांगी गांधी तितक्याच समर्थपणे पाहत आहेत. संस्थेची स्वताची जागा, त्यावरच्या इमारती, सुसज्ज कार्यशाळा, कर्णबधिरांसाठी शैक्षणिक साहित्य समजली जाणारी  अत्याधुनिक यंत्रसामग्री आदींनी हे विद्यालय सुसज्ज झाले आहे. हे सर्व उभे करण्यासाठी डॉ. इंदुभूषण बडे, सुधाकर साबळे, पुष्पा मेहेंदळे, संतोष मेहता, कमल वराडकर आदी संवेदनशील व्यक्तींचा आर्थिक हातभार लागला आहे.
 
 
आज २८ वर्षात हे झाड आनंदाने डवरले असून इतर सामान्य मुलांप्रमाणे ही मुले शिकत आहेत. येथील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही शाळा म्हणजे एक कुटुंब झाले असून या मुलांच्या सुखदु:खात हे  कर्मचारी समरस झाले आहेत. यामुळेच या शाळेतून शिक्षण आणि व्यावसाईक शिक्षण घेतलेली मुले आज नोकरी आणि व्यवसाय स्वबळावर आत्मविश्वासाने करीत आहेत. हेच या संस्थेच्या कामाचे फलित आहे. विद्यालयात अक्षर ओळख करतानाच मुलामुलीना शिवणकाम, भरतकाम, कपड्यावर पेंटिंग करणे, मेणबत्या, खडू व ऑफिस फाईल बनवणे, साबण, फिनेल, अत्तरे, आकाशकंदील, राख्या तयार करणे  आदी व्यावसाईक शिक्षण ही दिले जात आहे. यामुळे चित्रकला, तसेच मैदानी क्रीडा प्रकारात देखील राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत.
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 15:22


comments powered by Disqus