Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:31
www.24taas.com मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या निकालाच्या अवघ्या चोवीस तासांआधी राज ठाकरेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया...पण निकालांनी राज ठाकरेंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं...सत्तेच्या चाव्या हाती असलेला किंगमेकर नव्हे तर किंग होण्याची स्वप्न पाहाणा-या राज ठाकरेंचे फक्त अठ्ठावीस उमेदवार विजयी झाले...संपूर्ण निवडणूकीत पक्ष चर्चेत राहील याची काळजी ठाकरेंनी वेळोवेळी घेतली...उमेदवार निवडीसाठी लेखी परीक्षेचा फंडा आणून त्यांनी प्रचारात इतर पक्षांच्या तुलनेत बाजीही मारली. पण त्यांना हा वेग कायम राखता आला नाही...
राज ठाकरे हेच पक्षाचं एकमेव ऍसेट असल्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महापालिका निवडणूकीच्या उमेदवार निवडीपासून ते प्रचाराची धुरा त्यांच्यावरच होती...त्यामुळे प्रचारांच्या शेवटच्या टप्प्यातल्या सभांचा त्यांचा धडका त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी होता...मुंबई असो वा अन्य महापालिका ठाकरेंनी प्रचाराची फक्त एक सभा केली...त्यांनी सभांपेक्षा रोड शोंना अधिक महत्त्व देणं पसंत केलं, जे कदाचित मतदारांना कमी भावलं...त्याचा निवडणूकीत पक्षाच्या कामगिरीवरही परिणाम झाला... सर्व पक्षांच्या तुलनेत आज शिवसेनेकडे सर्वोत्कृष्ट संघटन बांधणी आहे, अर्थात हे संघटन उभं करण्यासाठी शिवसेनेची अनेक वर्षांची मेहनत आहे...या मेहनतीचा मनसेत अभाव दिसून येतोय...पक्ष स्थापनेनंतर मनसेला गेल्या सहा वर्षात भक्कमपणे आपली संघटना बांधता आलेली नाही...2014 साली होणा-या निवडणूकीच्या दृष्टीनं पक्षाला बरीच सुधारणा करावी लागेल...मुंबई महापालिका निकालानंतर स्वतः राज ठाकरे यांनीही पक्षसंघटनेत महत्त्वाचे बदल करण्याची घोषणा केली आहे.
मनसे स्थापनेवेळी विकासाचा मुद्दा मांडणा-या राज ठाकरेंनी कालांतरानं आपली दिशा बदलली....गेली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांनी भावनिक मुद्यांवर लढविली...मराठी अस्मितेचा मुद्दा हा प्रचाराचा केंद्रबिंदू होता...यंदा महापालिका निवडणूकीत राज ठाकरे यांच्या प्रचाराचा भर शहराच्या विकासाच्या मुद्यावर होता...त्यामुळे 2014 च्या निवडणूकीत ठाकरेंचा आणखी कुठला नवा पॅर्टन असेल, याबाबत उत्सुकता असणार आहे... कल्याण-डोंबिवलीत मनसेने तटस्थ राहत शिवसेनेला मदत केली मनसे बरोबर उगाच वैर नको, अशीही भावना शिवसेनेचा प्रभाव असलेल्या काही भागात आहे. उदाहरण द्यायचंच झालं तर कल्याण-डोंबिवलीतल्या राजकारणाचं देता येईल. तिथं मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिले म्हणून शिवसेनेची सत्ता आली. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मनसेनं मदतच केली. नाशकात मनसेचा पाय ओढल्यास त्याचे परीणाम शिवसेनेला डोंबिवलीसह ठाण्यात भोगावे लागणार असं चित्र आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे तब्बल 28 नगरसेवक आहेत. या ठिकाणी शिवसेना-भाजप मिळून 38 आणि नऊ अपक्षांचा पाठिंबा धरुन युतीचे संख्याबळ 48 आहे. तर काँग्रेस 15 तर राष्ट्रवादीच्या 14 जागा आहेत. ही आकडेवारी बघता कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर बसविण्यासाठी मनसे नगरसेवकांची भूमिका महत्वाची होती. झालंही तसंच मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. मनसेनं धाडसी निर्णय घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली असती वेगळंच चित्र दिसलं असतं. मात्र तसं झालं नाही आणि शिवसेनेने सत्ता मिळवली. मनसेनं तटस्थ राहून राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेला एका प्रकारची मदतच केली असल्याचं बोललं जातंय. आता काहीशी स्थिती शेजारच्या ठाण्यातही आकारास आलीये. शिवसेनेला ठाण्यातलं मनसेचं सद्यस्थितीतलं बळ नाकारुन चालणार नाही.
ठाण्यात मनसेची भूमिका निर्णायक ठरणार ठाण्यात शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आलेत. भाजप आणि आरपीआयच्या साथीनं महायुतीचं संख्याबळ 62 होते. तर काही अपक्षांचाही महायुतीला पाठींबा असल्याचा दावा केला जातोय. अपक्षांच्या कुबड्यांनी सेनेचा बालेकिल्ला शाबूत राहणार असला तरी ठाण्यात जोरदार मुसंडी मारणा-या राष्ट्रवादीनंही हार मानलेली नाही. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांच्या महापौरपदासाठी पडद्याआडून जोरदार राजकीय हालचाली आहेत. कारण राष्ट्रवादी 34, काँग्रेस 18 आणि तीन अपक्षांच्या मदतीनं आघाडीचे संख्याबळ 55 आहे. त्यात अनपेक्षितपणे मनसेच्या सात नगरसेवकांची भर पडल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यांचं सत्तेचं गणित बिघडू शकतं. मनसेची भूमिका केवळ महापौरपदासाठी नाही. त्यानंतर होणा-या स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. ठाण्यातले शिवसेनेचे नेतेही ही बाजू ओळखून आहेत. म्हणूनच नाशिकमध्ये मनसेचा महापौर होण्यात शिवसेनेने खोडा घातल्यास किंवा अन्य काही राजकारण केल्यास मनसे त्याला प्रत्युत्तर देऊ शकते. खुद्द राज ठाकरे यांनी नाशिक भेटीत तसे सुतावाच दिले होते. नाशिकमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीची साथ धरली तर मनसे नेत्यांना आयतं कारण मिळू शकतं. कल्याण-डोंबिवलीत संख्याबळाच्या आधारे ते सेनेला धक्का देऊ शकतात. तर ठाण्यातही मनसेनं मनात आणलं तर आघाडीशी राजकारण करत सत्तेसाठी सेनेच्या नाकीनऊ आणू शकतात. जर-तरचे हे तर्क असले तरी बाळासाहेबांनी भाजप-मनसे कनेक्शनबाबत तंबी दिल्यानं या दोन शहरात शिवसेनेच्या गोटात थोडी अस्वस्थता आहे. मनसेला उगाच दुखवू नका त्यांच तटस्थ राहणं आपल्या फायद्याचं आहे. असं शिवसेनेचे नेते खासगीत बोलून दाखवतात. बाळासाहेबांच्या 'भलत्या बिळात जाऊ नका' या भाजपला दिलेल्या इशा-यामुळे नाशकात मनसेचा महापौर होण्यात अडचणी आल्यात. याच अडचणीनं ठाणे,कल्याण पट्ट्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांची झोप उडवलीये. त्यामुळेच नाशिकमधले सत्तेचं गणित ठाणे-डोंबिवलीतली गणितं बिघडवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.... नाशिकमध्ये 'राज'मार्ग खडतर नाशिक महापालिक निवडणुकीत सत्ता स्थापनेचं त्रांगडं अजुनही सुटलेलं नाही. दिवसेंदिवस सत्तेचा 'राज'मार्ग अधिकच खडतर होत चाललाय. आघाडी आणि महायुतीनं महापौरपदासाठी हालचाली सुरु केल्यानं मनसेच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नाशिकमधल्या राजकीय घडामोडींचे राज्यात पडसाद उमटणार अशीच राजकीय परिस्थिती सध्या आहे. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होत नाशिककरांनी मनसेच्या झोळीत 40 जागा टाकत सर्वात मोठा पक्ष म्हणून पसंती दिली. मनसेन 122 पैकी 40 जागा मिळाल्यानं मनसे पदाधिकारी महापौर आपलाच होईल, अशा आर्विभावात फिरु लागले. राज ठाकरे यांनीही निकालानंतरच्या नाशिक भेटीत मनसेचा पहिला महापौर नाशिकमधून असेल, असं सांगितलं होतं. भाजपच्या 14 जागांचं गणित जमेला धरत मनसे सत्तेचं जाळं टाकून होती. फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत पक्षानं सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठवून दिलं. मनसेची अशी सावध भूमिका असताना शिवसेनेकडून राजकीय हालचाली सुरु झाल्या. भाजपला दटावलं गेलं. थेट मातोश्रीवरुन भाजप नेत्यांना तंबी देण्यात आली. दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ तरी गप्प कसे बसणार.... बहुमतानं आघाडीची सत्ता येणार, अशी वल्गना करणारे भुजबळ निकालानंतर जमिनीवर आले. महापौरपदाचं गणित आघाडीसाठीही कठीण असल्याचं दिसताच त्यांनी रामदास आठवलेंचा महापौर करण्याचा गुगली टाकला आणि चर्चेत रंगत आणली.... पण काँग्रेसनं मात्र भुजबळांच्या खेळीला विरोध केल्यानं सत्तेचा तिढा कायम राहिला.
पण भुजबळांचा रामदास आठवलेंशी झालेला संपर्क, आरपीआयला महापौरपदाची ऑफर अशा बातम्यांमुळे हातातोंडाशी आलेला सत्तास्थापनेचा घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती मनसे नेत्यांना आहे. म्हणूनच राजकीय वितुष्ट बाजूला ठेवून शिवसेना-भाजपनं मनसेला पाठींबा द्यावा, असं आवाहन केलं जातंय.मनसेनं 12 जागांवरुन 40 जागांवर उडी घेतलीये. याशिवाय 14 उमेदवार कमी फरकानं पराभूत झालेत. लोकसभेतही निसटता पराभव झाला होता. त्यानंतर मात्र नाशिकमधून तीन आमदार निवडून आले. एकूणच जनाधार मनसेच्या बाजूनं असल्याचं स्पष्ट होतंय. महापौरपदाच्या शर्यतीत मनसेवर विरोधकांनी मात केली तरी आगामी विधानसभेत मनसेच बाजी मारणार असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंच्या आणखी एक-दोन सभा झाल्या असत्या तर विजयाचा आकडा वाढला असता असंही बोललं जातंय. मनसेला रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतायेत. कारण मनसेचा सत्तेमध्ये शिरकाव म्हणजे इतर पक्षांना धोक्याचा इशारा वाटतोय. त्यामुळं मनसे प्रेमात वाहवत जाणा-या भाजपला 'मातोश्री'वरुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यात आली. त्यानंतर भाजप नेत्यांचाही नूर पालटलाय. महायुतीचा महापौर होईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलाय. त्यामुळे सत्तेच्या या सारीपाटात तिरंगी लढत सध्या दिसतंय.
शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंचा नाशिकवर विशेष जीव होता. आता मनसेचा झेंडा महापालिकेवर फडकावण्यासाठी ते आतूर आहेत. त्यात कुणी आडकाठी आणल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर राज आपल्या शैलीत देणार यात शंका नाही. पुढे राजकीय उणेदुणे काढण्यासाठी 2014 ची निवडणूक आहेच. पण तूर्तास नाशिकच्या सत्तेची कोंडी राज ठाकरे कशी फोडणार याची उत्सुकता आहे.... पुण्यात मनसेचा आलेख चढताच मनसेच्या स्थापनेनंतर लगेच झालेली महापालिका निवडणूक असो की 2009 ची विधानसभा ...किंवा आताची महापालिका निवडणूक...प्रत्येक वेळी पुण्यात मनसेच्या यशाचा आलेख चढता रहिलाय. त्यामुळं पुढच्या विधानसभेला इंजिन कुणाचे मनसुबे उध्दवस्त करणार याकडं लक्ष लागलय. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचं इंजिन जोरात धावल्यानं इतर पक्षांचे अंदाज साफ चुकले. गेल्या वेळी महापालिकेत एक आकडी संख्या असणारा मनसे आता २९ जागा जिंकत दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. मनसेची धास्ती युती बरोबर आघाडीलाही आहे. कोथरुड या भाजप सेना युतीच्या पारंपारिक गडाला मनसेनं यावेळी खिंडार पाडलय. कसब्यातही इंजिनच्या वेगानं भाजपची धावाधाव सुरु झालीय. काँग्रस आघाडीच्या प्रभावक्षेत्र असलेले मतदार संघही मनसेनं सामान्य कार्यकर्ते उभे करुन जिंकले. गेल्या महापालिकेला 75 हजार मते मिळवणा-या मनसेनं यावेळी पाच लाखांवर मतं मिळवत राजकीय विश्लेषकांना थक्क केलं. अनेक मतदार संघात दुस-या क्रमांकाची मतं मिळवतं प्रस्थापितांना धक्का दिला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात झालेल्या विराट सभेनं जनमताचा कल स्पष्ट केला होता. मनसेची घोडदौड जर अशीच सुरु राहीली तर पुणे शहरात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टर महत्त्वाचा असेल.
पुणेकर मनसेला असे भरभरुन मते देत असताना पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मात्र मनसेचे अस्तित्व फारसं नाही. महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेला केवळ 4 जागा मिळाल्यात. पुणे जिल्हा परिषदेत १ जागा जिंकत मनसेनं खातं उघडलंय. पुणे महापालिकेत मनसेला मिळालेल्या भरभरून जागा पाहता पुढच्या विधासभा निवडणुकीत आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी मनसे पुणे शहरावर लक्ष केंद्रीत कऱणार हे स्पष्ट आहे. मनसे अजून कुठचं सत्तेत आलेली नाही. त्यामुळे मनसेची पाटी कोरीच आहे. याचाही फायदा पक्षाला होतोय. पुण्याचा विचार केला तर राष्ट्रवादीबरोबर मागील पाच वर्षात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांनी सत्ता उपभोगली. त्यामुळे पाच वर्षात ख-या अर्थानं विरोधक म्हणून वावरले ते मनसेचे नगरसेवक...आता दुस-या क्रमांकाचा पक्ष म्हणून अधिक चांगल्या विरोधकाची भूमिका पार पडण्याची जबाबदारी पुणेकरांनी मनसेवर सोपवलीये. जबाबदार विरोधक म्हणून मनसेनं काम केलं तर पुण्यात पुढच्या विधानसभा निवडणुकीत इतरांच्या व्होट बँकेला खिंडार पाडण्याची क्षमता मनसेमध्ये निश्चित आहे.
First Published: Wednesday, February 29, 2012, 16:31