Last Updated: Friday, March 2, 2012, 12:18
www.24taas.com, शिर्डी 
अंध साईभक्तांना साईचरित्राची ओळख व्हावी, या हेतुने शिर्डीच्या साईबाबा संस्थानने एक अनोखं पाऊल उचललं आहे. साईचरित्राची आता ब्रेल लिपीमध्ये निर्मिती होणारं आहे. आंध्र प्रदेशातल्या देवनार ब्लाईंड ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला आहे. साईबाबांच्या चरित्राचा जगभरात प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी साईबाबा संस्थानने आतापर्यंत मराठीबरोबरच ऊर्दू, हिंदी, तेलगू, नेपाळी, पंजाबी, मल्याळी अशा विविध भाषांमध्ये साईचरित्राची निर्मिती केली आहे.
आता जगभरातल्या अंध भक्तांसाठी उपयुक्त ठरेल, असं ब्रेल लिपीतील साईचरित्र तयार होतं आहे. आंध्र प्रदेशातल्या सिकंदराबादमधील देवनार ब्लाईंड ट्रस्टने प्रायोगिक तत्वावर ब्रेल लिपीतील हे साईचरित्र तयार केलं आहे. या संस्थेत ४५० अंध विद्यार्थी शिक्षण घेतात. या ट्रस्टनं हिंदी आणि तेलगू भाषेत ब्रेल लिपीतलं हे साईचरित्र तयार केलं आहे. याला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं, यासाठी साईबाबा संस्थानने आता पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ट्रस्टने व्यक्त केली आहे.
साई संस्थानतर्फे दरवर्षी विविध राज्यांमध्ये साईसंमेलन आणि साईचरित्राच्या पारायणाचं आयोजन केलं जातं. ओरिसा, गोवा, उत्तर प्रदेशबरोबरच लंडनमध्येही साईसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रेल लिपीतल्या या साईचरित्रामुळे साईंचं जीवनकार्य जगभरातल्या अंध भक्तांसाठी एक अनोखा आनंद देणारं ठरेल, यात शंका नाही.
First Published: Friday, March 2, 2012, 12:18