होळी कसे साजरी करतात आदिवासी - Marathi News 24taas.com

होळी कसे साजरी करतात आदिवासी

www.24taas.com, जळगाव
होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याची जोरदार तयारी राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. जळगावातल्या सातपुड्यातल्या आदिवासी भागात सध्या भोंगऱ्या बाजार भरला आहे, तर खानदेशात होळीनिमित्त घालण्यात येणाऱ्या साखरेच्या दागिन्यांनी बाजार फुलले आहेत.
 
पारंपरिक वेशभूषा आभूषणांनी सजलेले आदिवासी स्त्री-पुरुष आणि आदिवासी संगीताच्या साथीनं सध्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या वैजापूरमध्ये भोंगऱ्या बाजार भरला आहे. वर्षातून एकदाच भरणाऱ्या या बाजारात वर्षभर काबाडकष्ट करणारे आदिवासी स्त्रीपुरुष बेभान होऊन पारंपरिक तालावर नाचतात. या बाजारात मध्यप्रदेश आणि राज्यातील अनेक आदिवासी सहभागी होतात. या बाजारात हे आदिवासी होळीला लागणारं साहित्य विकत घेतात.
 
तर खानदेशातही होळीचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. त्यानिमित्तानं नातेवाईकांमध्ये साखरेचे दागिने वाटण्याची पद्धत आहे. दरवर्षी होळीनिमित्त शेकडो क्विंटल दागिन्यांची निर्मिती होत असते. मात्र महागाईच्या दिवसात या दागिन्यांची किंमत वाढत असली तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. अगदी नक्षीदार दागिन्यांना इथं अधिक मागणी आहे. प्रसाद म्हणूनही या दागिन्यांचं वाटप केलं जातं. होळीचा सण राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो मात्र सगळीकडेच या आनंदोत्सवाच्या निमित्तानं उत्साहाला उधाण आल्याचंच चित्र पहायला मिळतं.
 
 
 
 

First Published: Monday, March 5, 2012, 21:29


comments powered by Disqus