Last Updated: Monday, March 12, 2012, 23:57
www.24taas.com, कराड
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कराड इथल्या त्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. आज प्रीतीसंगमावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री रामराजे निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आनंदराव पाटील यांनीही चव्हाणांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केलं. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण १२ मार्च १९१३ साली कराडमधल्या देवराष्ट्रे या गावातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. आपल्यातल्या गुणांच्या बळावर साध्या कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय नेत्यापर्यंत अशी गरूडझेप त्यांनी घेतली. महाराष्ट्रीतील संतपरंपरा आणि समाजसुधारकांनी दिलेल्या शिकवणीचा मेळ घालून त्यांनी नव्या महाराष्ट्राचा कळस उभारला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्ररूपी मंगल कलश आणण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केलं. सुशासन आणि राजकारणातील आदर्श मापदंड हे त्यांचं खास वैशिष्ठ्य.
व्यक्तीगत आणि प्रादेशिक विचारांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचं राजकारण त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासोबत, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असतांना त्यांच्या कार्यकाळात पंचायत राज व्यवस्थेला सुरूवात झाली. पंचवार्षिक योजना असोत वा सहकार तत्वाला चालना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तठिकठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहेत.
First Published: Monday, March 12, 2012, 23:57